मराठी साहित्य – जीवन रंग ☆ खेळायची खोली भाग २ ☆ सुश्री सुमती जोशी

सुश्री सुमती जोशी

☆ जीवन रंग ☆ खेळायची खोली भाग २  ☆ सुश्री सुमती जोशी ☆

धुसफुसत शुकतारा उठली. “मला फक्त एवढंच म्हणायचंय की ते सगळं तुम्ही माझ्यावर सोपवा. उद्या जर असंच उकडत असलं तर तुम्ही…”

विषयांतर करण्यासाठी चंद्रोदयनं विचारलं, “पाखी कुठंय?”

“बबनूच्या घरी गेलीय. सारा वेळ फक्त खेळ आणि खेळ! म्हटलं टेप चालू करून देते, नाचाची प्रॅक्टीस कर. पोरीचं उत्तर – नाही. चित्र काढ – नाही. टॉम अँड जेरी बघ – नाही. सगळ्याला नाही म्हणण्यात पोर पटाईत. अगदी तुमच्यासारखी!”

शेवटच्या वाक्यातला खोचक भाव चंद्रोदयने सहन केला. स्वाभाविक होत चंद्रोदय म्हणाला, “पाखीला एकदा हाका मारून बघ ना. आली तर तिच्याशी थोडा वेळ गप्पागोष्टी करीन.”

अचानक भुवया उंचावून ठेच लागलेल्या माणसाप्रमाणे शुकतारा त्याच्याकडे पाहू लागली. शंकाकुल होत म्हणाली, “मी तिला घेऊन येते पण कृपा करून पोरीला बिघडवू नका.”

शुकतारानं हळूच डोळ्यातलं पाणी पुसलं. आज संध्याकाळी पाखीच्या नाचाची रंगीत तालीम. रंगीत तालमीसाठी प्रिटोरिया हॉलमध्ये पाखीला घेऊन जाणं तिच्या आजीला जमलं नसतं. कंबर धरल्यामुळे शुकताराला त्या दिवशी सरळ उभंही राहता येत नव्हतं. शुकताराच्या शरीरानं आज संप पुकारला होता. आजच्या महत्वाच्या दिवशी या दुखण्यानं डोकं वर काढलं नसतं तर चाललं नसतं का? आता पाखीला कोण घेऊन जाईल?

इतके दिवस घेतलेली मेहनत फुकट जाणार की काय, अशी भीती वाटली तिला! तसं झालं असतं तर चंद्रोदयला तोंड दाखवायची तिला लाज वाटली असती. तिला हार मानावी लागली असती. त्याच्यापाशी दूरदृष्टी होती. त्याचे विचारही पारदर्शी असत. एवढं समजत असलं तरी अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्याही बाबतीत पाखीने प्राविण्य मिळवावं असं काही त्याला वाटत नसे. स्वत: काही करत नाही, पण देहबोलीतून शुकताराच्या मार्गात अडथळे आणतो.

ए.सी. सहन होत नाही म्हणून नंदिता दुसऱ्या खोलीत झोपली होती. ताबडतोब आईशी बोलायला हवं. संध्याकाळ होण्याआधीच पर्यायी व्यवस्था करायला हवी. तितक्यात  शुकताराला दिपांजनाच्या आईची-रेणूची आठवण झाली. ‘रंगीत तालमीसाठी पाखीलाही घेऊन जा’ अशी तिला गळ घालता आली असती. तिने रेणूला फोन लावला. सगळी हकीकत ऐकल्यावर रेणू म्हणाली, “आज मी गडियात माझ्या माहेरी आलेय. आई-बाबांच्या लग्नाचा आज तिसावा वाढदिवस आहे. अनेक नातेवाईक येणार आहेत. ते सर्व सोडून बाहेर पडणं मला जमणार नाही.”रेणूने फोन ठेवला. शुकतारा आणखीच अस्वस्थ झाली.

श्री हर्ष दत्त यांनी लिहिलेल्या ‘पाखिदेर खेलाघर’ या बंगाली कथेचा भावानुवाद

अनुवाद – सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈