सुश्री सुमती जोशी
☆ जीवन रंग ☆ विधाता (अनुवादित कथा) ☆ सुश्री सुमती जोशी ☆
वाघांचा फार त्रास होता. लोक अस्वस्थ झाले. गायीगुरं, माणसांपर्यंत सगळी वाघाच्या तावडीत सापडून मारली जाऊ लागली. तेव्हा सगळ्यांनी लाठ्याकाठ्या, बंदुका बाहेर काढून वाघाला यमसदनाला पाठवलं. एक वाघ मेला पण दुसरा आला. शेवटी माणसाने विधात्यापाशी एक निवेदन सादर केलं –
“देवा, वाघांच्या तावडीतून आमचं रक्षण कर.”
विधाता म्हणाला, “ठीक आहे.”
काही दिवसांनी विधात्याच्या दरबारात येऊन वाघांनी तक्रार नोंदवली, “माणसांमुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झालाय. जीव वाचवण्यासाठी एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जावं लागतं. शिकारी आम्हाला शांतपणे जगू देत नाहीत. याचा काहीतरी बंदोबस्त करा.”
विधाता म्हणाला, “ठीक आहे.”
तेवढयात नेडाच्या आईने विधात्यापाशी मागणं मागितलं, “देवा, माझ्या नेडाला सुंदर बायको मिळवून दे. मी तुला पाच पैशांचे साखरफुटाणे देईन.”
विधाता म्हणाला, “होय.”
हरिहर भट्टाचार्य खटला करायला निघाला होता. विधात्याला उद्देशून तो म्हणाला, “आयुष्यभर तुझी पूजा करत आलोय. उपवास करून देह शिणवलाय. मेहुणा आणि भाच्याला मला धडा शिकवायचा आहे. तुम्ही मला मदत करा.”
विधाता म्हणाला, “अवश्य करीन.”
सुशीलची परीक्षा होती. तो रोज विधात्याला म्हणत असे, “देवा. मला पास कर.” आज तो म्हणाला, “देवा, मला जर स्कॉलरशिप मिळवून दिलीत तर पाच रुपये खर्च करून मी महाप्रसाद करीन.”
विधाता म्हणाला, “चालेल.”
हरेनला कायस्थ डीस्ट्रिक्ट बोर्डाचं चेअरमन व्हायचं होतं. कालीच्या पुजाऱ्यांमार्फत त्यांनी विधात्याची मनधरणी केली, “मला अकरा मतं मिळायला हवीत.” काली पुरोहिताने भरपूर दक्षिणा वसूल करून संस्कृत मंत्र म्हणून विधात्याला भंडावून सोडलं. ‘व्होटम् देही… व्होटम् देही…’
विधाता म्हणाला, “मिळतील, मिळतील.”
शेतकरी हात जोडून म्हणाला, “देवा, पाणी दे.”
विधाता म्हणाला, “देतो.”
आजारी बालकाची माता देवाला म्हणाली, “मला एकुलता एक मुलगा आहे. देवा, त्याला दीर्घायुषी कर.”
विधाता म्हणाला, “ठीक आहे.”
शेजारी राहणारी म्हातारी आत्या वर नमूद केलेल्या मातेच्या संदर्भात म्हणाली, “देवा, मागी फार मिजाशीत असते. रोज नवनवीन दागिने घालून मिरवत असते. हे दयाघना, पोराचा घसा पकडलायत हे फार छान केलंयत. मागीला थोडी शिक्षा होऊ द्या.”
विधाता म्हणाला, “करतो.”
तत्त्वज्ञ म्हणाला, “हे देवा, तू कसा आहेस हे मला समजून घ्यायचंय.”
विधाता म्हणाला, “ठीक आहे.”
चीन देशातून चित्कार ऐकू आला, “देवा, या जपान्यांपासून वाचवा.”
विधाता म्हणाला, “वाचवतो.”
बांगला देशातला एक तरुण धरणं धरून बसला, “कोणताही संपादक माझं लेखन छापत नाही. ‘प्रवासी’ मासिकात माझं लेखन छापून यावं अशी माझी इच्छा आहे. रामानंदबाबूंना कृपा करायला सांगा.”
विधाता म्हणाला, “ठीक आहे.”
जराशी सवड मिळाल्याबरोबर विधाता पाठीमागे उभ्या असलेल्या ब्रह्माला म्हणाला, “आपल्या घरी सरसूचं शुद्ध तेल आहे का?”
ब्रह्मा म्हणाला, “आहे. कशाला हवंय?”
विधाता म्हणाला, “मला हवंय. द्याल का?”
ब्रह्मा म्हणाला, “अवश्य, अवश्य.”
ब्रह्माच्या घरून सरसूचं शुद्ध तेल मिळालं. ताबडतोब त्या तेलाचे दोन थेंब नाकात घालून विधाता निद्राधीन झाला.
त्या गाढ झोपेतून तो अजूनही उठला नाही.
श्री वनफूल यांनी लिहिलेल्या ‘विधाता’ या बंगाली कथेचा भावानुवाद.
भवानुवाद – सुश्री सुमती जोशी
मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈