सुश्री सुमती जोशी
☆ जीवन रंग ☆ दांपत्य स्वप्न.. अनुवाद ☆ सुश्री सुमती जोशी ☆
एक
सुधीर आला होता. त्याच्या हातात गुलाछडीच्या फुलांचा गुच्छ. चेहऱ्यावर हसरा भाव. पंख पसरून मन जणू उडू उडू पहात होतं.
आल्याबरोबर सुधीर म्हणाला, “हासी, आज एक खुशखबर आहे. काय देशील सांग. नाहीतर सांगणार नाही.”
हासी म्हणाली, “सांगा ना प्लीज.”
“मला काय देशील ते आधी सांग.”
“मी आणखी काय देणार? तुमच्या रुमालावर छान कशिदा काढून देईन. मला एक सुरेख नमुना मिळालाय.”
“नाही, ते मला पसंत नाही.”
“मग काय हवंय तुम्हाला? चॉकलेट आहे. ते देऊ शकेन.”
“चॉकलेट घेऊन संतुष्ट व्हायला मी लहान बाळ आहे का?”
हासी हसू लागली. म्हणाली, “मला ऐकायचं नाही. कशिदा काढून द्यायला तयार होते, चॉकलेट द्यायची इच्छा होती, त्यामुळे जर आपलं…”
सुधीर म्हणाला, “आता मी निघतो.”
हासीनं पुन्हा विचारलं, “सांगत का नाही?”
“एक वस्तू मिळाली तर सांगू शकेन. तीच, जी त्या दिवशी मागितली होती.” असं म्हणून अर्थपूर्ण नजरेनं तो हासीकडे बघू लागला.
हासी लाजली पण तिने सावरून घेतलं. म्हणाली, “आपल्याला सांगून ठेवतेय, ते जमणार नाही.”
सुधीरच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर तिला भीती वाटली. सुधीर म्हणत होता, “मला वाटलं होतं हसत हसत मी बातमी सांगेन. पण जमलं नाही. मला क्षमा करा. तुझं लग्न साँतरागाछीच्या त्या तरुणाशी ठरलाय.”
असं सांगून सुधीर निघून गेला.
हासीनं पुन्हा हाक मारली, “सुधीरदा ऐकून जा.”
सुधीर परत आला नाही.
दोंन
अलका आलीय.
तीच अलका जिला भेटण्यासाठी अजय दिवसभर वाट बघत राही – केव्हा संध्याकाळ होईल आणि ती येईल!
अलका येऊन म्हणाली, “अजयदा इंग्लिशमध्ये ‘पेट’ या नावाची एखादी कथा आहे का?”
अजय म्हणाला, “आहे. पेट म्हणजे माथा.”
“खरं आहे का हे?”
“डिक्शनरी काढून बघ. पेट म्हणजे माथा.”
“आमची वरुणादी बरोबर सांगतेय ना!”
अजय म्हणाला, “ठीक आहे, मुंडकं याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात?”
अलका डोळे मिचकावत म्हणाली, “हेड.”
“हेड म्हणजे माथा.”
“मुंडकं म्हणजेही माथा.”
अजय हसून म्हणाला, “हेच का तुझं बांगला भाषेचं ज्ञान! माथा आणि मुंडकं म्हणजे एकच वस्तू!”
अलकानं हसून विचारलं, “फरक काय?”
गंभीर होत अजय म्हणाला, “तुझ्यात आणि पाँची धोपानी यांच्यात काही फरक आहे का सांग पाहू. दोघीही मुलीच आहेत.”
अलका विचारू लागली, “पाँची धोपानी कोण?”
“तुझ्या गल्लीच्या वळणावर धोब्याची मुलगी आहे ना! लहान वयाची – तुझ्याच वयाची असेल.”
तिरकसपणे अलका म्हणाली, “अलीकडे बघतेय अजयदा सगळ्याच गोष्टी बारकाईने बघू लागलेयत. धोब्याची मुलगीही सोडली नाही!”
अजय म्हणाला, “होना! स्वत:ची वस्तू चांगली आहे याची खात्री करून घ्यायला नको का?”
“स्वत:ची वस्तू कोणती?”
“आहे एकजण.”
अलका अचानक अस्वस्थ होऊन जवळचं टेबल आवरू लागली.
काहीही कारण नसताना अजय खिडकीतून बाहेर बघत राहिला.
****
दोन स्वप्नं दोघांनी बघितली.
दोघं घनिष्ठ होत शेजारी शेजारी झोपलेयत.
हासीचा हात अजयच्या छातीवर.
हासी आणि अजय – नवरा-बायको.
वनफूल यांनी लिहिलेल्या ‘युगल स्वप्न’ या बंगाली कथेचा भावानुवाद सुमती जोशी.
अनुवाद – सुश्री सुमती जोशी
मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈