पुस्तकावर बोलू काही
☆कवितासंग्रह : “नाही उमगत ‘ती’ अजूनही“ – डाॅ. सोनिया कस्तुरे ☆ परिचय – डाॅ.स्वाती पाटील ☆
कवयित्री – डॉक्टर सोनिया कस्तुरे
प्रकाशक – मनोविकास प्रकाशन, पुणे.
पृष्ठसंख्या – १६०
किंमत – रु. ३००/-
अतिशय सुंदर मुखपृष्ठ, ,,’ती ‘च्या स्वप्तरंगी मनोविश्वाचे जणु प्रतीकच, तिच्या भरारीच्या अपेक्षेत असणारे आभाळ आणि झेप घेणारी पाखरे, तिच्या मनात असणारे पंख लावून केव्हाच ती आकाशात स्वैर प्रवाहित होत आहे परंतु त्याचवेळी जमिनीवरील घट्ट बांधून ठेवणाऱ्या साखळ्या आणि पर्यायाने बेडीमध्येही तिने ‘ती’ चं अस्तित्व टिकवून ठेवले आहे. अतिशय अर्थवाही असं हे या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ असून संग्रहाच्या नावाप्रमाणेच सखोल आणि विचार प्रवृत्त करायला लावणारे आहे.
अतिशय संवेदनशीलतेने लिहिलेल्या या संग्रहाला प्रस्तावना ही तेवढीच वस्तुनिष्ठपणे, तरलतेने, आणि अतिशय अभ्यासपूर्ण व डोळसपणे लिहिलेली आहे ती प्राध्यापक आर्डे सरांनी.
डॉ सोनिया कस्तुरे
मनोगतामध्येच कवयित्री डॉक्टर सोनिया यांनी या कवितांची जडणघडण कशी झाली आहे हे सांगितले आहे. अत्यंत उत्कृष्ट प्रतीचे सामाजिक मूल्य असणाऱ्या या कविता लिहिताना त्यांना त्यांच्या वैद्यकीय व्यवसायातील अनुभवांचा, आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचा, तात्कालीक घटनांचा खूप उपयोग झाला आहे. तरीही कवयित्रीची मूळ संवेदनशील वृत्ती, समाजाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी आणि केवळ स्त्री म्हणून नाही तर एकूणच माणसांकडे पाहण्याची समदृष्टी ही जागोजागी आपल्याला ठळकपणे जाणवते. म्हणूनच केवळ स्त्रीवादी लाटांमध्ये आलेले आणखी एक साहित्य असे याचे स्वरूप न राहता यापेक्षा अतिशय दर्जेदार ,गुणवत्तापूर्ण, उच्च सामाजिक मूल्य व अभिरुचीपूर्ण असा हा वेगळा कवितासंग्रह आहे.
हा कवितासंग्रह जरी पहिला असला तरी तो पहिला वाटत नाही. प्रत्येक कवितेमागे असणारी विचारधारा ही गेली अनेक वर्ष मनात, विचारात ,असणारी वाटते. सजगतेचे भान प्रत्येकच कवितेला आहे, म्हणूनच त्यांच्यामध्ये फार अलंकारिकता नाही परंतु जिवंतपणा 100% आहे. या कविता वाचणाऱ्या सर्व वयोगटातील स्त्रियांना ती आपली वाटणारी आहे. कारण या सर्वच जणी वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या आहेत , ठरत आहेत आणि ही विषमता दूर झाली पाहिजे, समाजव्यवस्था बदलली पाहिजे, याचं भान जवळपास प्रत्येक कवितेत आहे. स्त्री आणि पुरुष यापलीकडे जाऊन व्यक्तीकडे एक माणूस म्हणून बघण्याची किती गरज आहे, हे हा कवितासंग्रह जाणवून देतो. स्त्रीवादी म्हणाव्या अशा या कविताच नाही, तर त्या आहेत एक उत्तम समाजव्यवस्था कशी असली पाहिजे. त्यामध्ये माणूस हा माणसाप्रमाणे वागला पाहिजे न की रुढी परंपरा, लिंगभिन्नता, दुय्यमतेच्या ओझ्याखाली वाकलेल्या, जातीपाती, धर्म अधर्म, सुंदर कुरुपतेच्या स्वनिर्मित काचामध्ये अडकून स्वतःचे आणि इतरांचे जीवन असह्य बनवलेल्या राक्षसाप्रमाणे– सुंदर कोण या कवितेत या सगळ्या जीवन मूल्यांचा त्यांनी मागोवा घेतला आहे. अतिशय सोप्या, सुबोध आणि छोट्या शब्दांमध्ये सुंदर या शब्दाचा अर्थ सांगताना सध्या समाजात जे समज झाले आहेत सुंदरतेचे, त्यावर त्यांनी अचूकपणे भाष्य केले आहे आणि ते अगदी आपल्याला तंतोतंत पटतेही .
‘मिरवू लागले’, या कवितेत ‘पुरोगामी’ या आजकाल प्रत्येकाने स्वतःला लावून घेतलेल्या बिरुदाचा फोलपणा दर्शवून दिला आहे. प्रत्येक स्वतःला विसरलेल्या बाईने वाचलाच पाहिजे असा हा संग्रह आहे. ‘ती’च्या उपजत निसर्गदत्त शक्तीचे यथायोग्य वर्णन कोणत्या न कोणत्या स्वरूपात प्रत्येक कवितेत वाचायला मिळते. उदाहरणार्थ :-
एक वाट सुटली तिची तरी
दुसरी तिला मिळत राहते
तिच्या उपजत कौशल्याने
ती वळण घेईल नव्याने जिकडे
नवी वाट तयार होते तिकडे…!
समतेचे धडे शिकवण्याची तीव्र गरज या कविता व्यक्त करतात. ते ही अतिशय सौम्य शब्दात. स्त्री पुरुष समानता या विषयावर कोणीही हल्ली उठून सवंग लिहीत असतो परंतु मुळात हा विषय समजून एक उत्तम सहजीवन कसं असावं आणि त्यामध्ये पुरुषांनी कसा पुढाकार घेतला पाहिजे ही शिकवणारी कविता म्हणजे,’ शब्दाबाहेर’ अर्थात ती तुम्ही स्वतःच वाचली पाहिजे. याबरोबरच तडजोड आणि स्वतःत बदल या दोन गोष्टीचे महत्त्व ही ‘प्रपंच ‘ नावाच्या कवितेत व्यक्त करून कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व त्या निर्विवादपणे स्वीकारतात. तिची आय. क्यु. टेस्ट कराल का? ही कविता तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय वाचून पूर्ण होतच नाही. कारण आपल्या भारतातली प्रत्येक बाई यातल्या कोणत्या आणि कोणत्या ओळीत स्वतःला पाहतेच. यापेक्षा अधिक संवेदनशीलता काय असते ?’आरसा ‘ही कविता तर सर्वांनाच डोळ्यात अंजन घालणारी आहे. समान हक्क आणि वागणूक न देता, सन्मानांच्या हाराखाली जखडून ठेवणारी ही समाजव्यवस्था कधी कधी ‘ती’च्याही लक्षात येत नाही आणि हे स्वभान जागवण्याचं काम ही कविता करते. म्हणूनच ‘माणूस ती’ या कवितेत त्या म्हणतात :–
लक्ष्मी ना सरस्वती। ना अन्नपूर्णा।
सावित्रीची लेक। माणूस ती ।
दुर्गा अंबिका। कालिका चंडिका।
देव्हारा नको। माणुस ती…
सावित्रीचे ऋणही त्यांनी अगदी चपखल शब्दात फेडले आहे. जनावरांपेक्षा हीन,दीन लाचार होतो माणूस, आम्ही झालो माई तुझ्यामुळे । –या शब्दांची ओळख करून देणाऱ्या माईला शब्दफुलांच्या ओंजळीने कृतज्ञता वाहिली आहे, आपल्या सर्वांच्याच वतीने.
‘जोडीदार’ या कवितेत तर प्रत्येक स्त्रीला हा माझ्याच मनातला सहचर आहे असे वाटावे इतपत हे वर्णन जमले आहे आणि शेवटी या कल्पनाविलासातून बाहेर येत ‘हे सत्यात उतरवण्याचा कायम प्रयत्न करत राहतो तो खरा जोडीदार’ असे सांगून एक आशादायक वास्तव शेवटी आपल्यापुढे मांडतात.
तर एका लेकीच्या नजरेत बाप कसा असावा हे बाप माणूस– हे तर मुळातूनच वाचण्यासारखं. अशी ही कवयित्री विठ्ठलाला सुद्धा जाब विचारायला घाबरत नाही. सर्व जनांचा, भक्तांचा कैवारी पण त्याला तरी जोडीदाराची खबर आहे का? खरंतर रूपकात्मकच ही कविता. ज्याने त्याने जाणून घ्यावी अशी. ‘मैत्री जोडीदाराशी’ या कवितेत सुद्धा एक खूप आशादायी चित्र त्या निर्माण करतात, जे खूप अशक्य नाही . क्षणाची पत्नी ही अनंत काळची मैत्रीण तसेच क्षणाचा नवरा हा अनंत काळचा मित्र झाला तर नाती शोधायला घराबाहेर जाण्याची गरजच पडणार नाही असं आदर्श सहजीवन त्या उभं करतात. आणि शेवटी अतिशय समर्पक असा शेवट करताना कवयित्री म्हणते—-
‘तिचं शिक्षण बुद्धिमत्ता शक्ती युक्तीचीच गाळ करून चुलीत कोंबले नसते ….
लग्नानंतर त्याच्या इतकं तिच्या करिअरचा विचार झाला असता…. वांझ म्हणून हिणवलं नसतं, विधवा म्हणून हेटाळलं नसतं… तिच्या योनीपावित्र्याचा बाऊ झाला नसता… तर कदाचित मी कविता केली नसती.
हा कदाचित खरोखर अस्तित्वात येण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाचे योगदान येथे गरजेचे आहे .आपल्या बरोबरीने जगणाऱ्या एका माणसाला केवळ समाजव्यवस्था म्हणून रूढी परंपरा, जाती व्यवस्था, इत्यादी विषमतेच्या जोखडाखाली चिरडून टाकून ‘पुरोगामी’ म्हणून शिक्का मारून घेण्याचा कोणालाच अधिकार नाही. किमान याचे भान जरी समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये अल्प प्रमाणात का होईना जागे करण्याचे बळ या संग्रहामध्ये आहे. त्याबरोबरच जिच्या पंखांना ताकद देण्याची गरज आहे , जिच्या पंखावरचे जड ओझे भिरकावून द्यायची गरज आहे, अशा सर्व ‘ती’ ना आणि सर्व जगातल्या ‘ती’च्यावर आईपण व बाईपण याचे ओझे वाटू देणाऱ्या व्यवस्थेवर लेखणीने प्रहार करणारा हा कविता संग्रह निश्चितच समाजमन जागे करणारा आणि मानवतेच्या सर्व मूल्यांची जोपासना करण्याची शिकवण देणारा आहे, असे थोडक्यात याचे वर्णन करता येईल. बऱ्याच दिवसातून काही आशयसंपन्न वाचल्याचे समाधान देणारा कवितासंग्रह.
मी अभिनंदन करते कवयित्रीच्या शब्दभानाचे, सौम्यवृत्तीचे, माणूसपण जपणाऱ्या भावनेचे आणि विवेकपूर्ण संयमी विचाराचे.
© डॉ.स्वाती पाटील
सांगली
मो. 9503628150
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈