श्रीमती माया महाजन

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ आत्मकथ्य – “इंद्रधनुष्य” – श्रीमती माया महाजन – श्रीमती उज्ज्वला केळकर सोबत ☆

(सुश्री नरेंद्र कौर छाबडा या हिंदीतील नामवंत लेखिका. त्यांच्या निवडक लघुतम कथांच्या अनुवादीत कथांचे पुस्तक ‘इंद्रधनुष्य’ नागपूर येथील चंद्रकांत प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.)

इंद्रधनुष्य  : भावनांचे  रंगीबेरंगी आविष्कार

जे मला आवडते ते इतरांनाही सांगावे अशी माझी तीव्र इच्छा असते. म्हणूनच उत्तम दर्जाचे लिखाण वाचले की जो आनंद मिळतो तो इतरांनाही मिळावा या हेतूने, या इच्छेनेच मला अनुवाद क्षेत्राविषयी जवळीक वाटते.

माझी मैत्रीण नरेंद्रकौर छाबड़ा हयांच्या लघु कथा माझ्या वाचनत आल्या आणि त्या उत्तम कथा तुम्हालाही सांगाव्याशा वाटल्या. छाबड़ाजीना ही कल्पना आवडली आणि मी अनुवाद केला . जसजशी मी एकेक काथेचा अनुवाद करीत गेले  तसतशी मी स्तिमित होत गेले. नरेन्द्रकौरजींची दृष्टी केवळ सामान्य गृहिणीची नाही. पाहिलेल्या – अनुभवलेल्या घटनेचे बरे-वाईट प्रतिसाद त्यांच्या मनात उमटतात आणि त्यांच्यातील लेखिका अस्वस्थ होते . मग ते प्रतिसाद शब्दरूप धारण करून अवतरतात आणि वाचकालाही त्यात सामील करून  घेतात . प्रत्येक घटनेचा  विचार मात्र त्या समाज-कल्याणाच्या दृष्टीतून करताना दिसतात . त्या श्रध्द्धाळू देखील आहेत हे त्यांच्या समर्पण पत्रिकेवरूनच जाणवते . परमेश्वराच्या कृपादृष्टीवर त्यांचा नितांत  विश्वास आहे. अशा श्रद्धाळू आणि समाजहितैषी मनाच्या व्यक्तिच्या लेखणीतून तितक्याच भावगंभीर कथा जन्म घेतात – हेच नरेंद्रजिंच्या बाबतीत म्हणता येईल.मुळात मनुष्यजात ही गोष्टीवेल्हाळ आहे . काय घडले हे जाणण्याची उत्सुकता माणसाला ऐकायला, सांगायला आणि वाचायला भाग पाडते. मग हे पद्धतशीर  लिहिणे सांगणे कथेचे रूप घेते.

कथा हा साहित्य-प्रकार सर्वात जास्त लोकप्रिय आहे. कथेचे स्वरूप दीर्घ, मोठे, सर्व-साधारण , लघु आणि अतिलघु असे आपोआपच होते. त्याचेच आपण कादंबरी, दीर्घकथा, कथा, लघुकथा  आणि अतिलघुकथा  (अलक) असे वर्गीकरण करतो. माझ्या मते लघुकथा आणि त्यात अलक लिहिणे हे सर्वात आव्हानात्मक काम आहे. लेखनाची सर्व वैशिष्ट्ये-भाषा सौन्दर्य, घटनेची मांडणी, पात्रांचे मनोव्यापार, संवाद  आणि वाचकांना खिळवून ठेवण्याची कला – ह्या सर्वाचा वापर कादंबरी वगैरे प्रकारात सहजपणे केला जाऊ शकतो आणि लघुकथा लेखकाचा इथेच कस लागतो. उत्तम आणि प्रभावी लघुकथा तीच असते जिच्यात हे सर्व गुण आढलतात.  नरेन्द्रकौर जींची कथा या निकषावर यशस्वी ठरते – म्हणूनच ती  वाचनीय झाली आहे. लघुकथेतील आशय नेमकेपणाने पण थोडक्यात मांडला गेला तरच ती प्रभावी ठरते.

नरेद्रकौरजींच्या काही वेचक कथांचा परामर्श इथे उदाहरणदाखल घेणे इष्ट ठरेल.

समाजातील काही  अनिष्ट चालीरीतींना नरेंद्रकौरजीनी आपल्या कथेत असे काही मांडले आहे की वाचक अंतर्मुख होऊन त्या सोडून देण्याच्या निर्णयाप्रत येऊन पोहोचतो. या कथा आहेत – भोज, समाजरीत, अपशकुनी, फालतू, चपराक  वगैरे.

बाई, पान, तिचा आनंद, महिला दिवस , युक्ति  या कथा स्त्रीत्वाची घुसमट साकारतात.  लेखिकेच्या मते  केवळ शिकल्याने  महिला स्वतंत्र होत  नाही तर शिक्षनाने तिच्यात  चूक गोष्टीना ‘नाही‘ म्हणण्याची हिंमत आली पाहिजे. उदा. ‘दुहेरी मानसिकता’ मधे लेक व सून यांच्याशी वागताना बाई कशी फरक करते ते रंगविले आहे; तर ‘पान‘ मधे स्त्रीवर पतिचा प्रभाव किती पराकोटीचा असू शकतो हे दाखविले आहे.’चपराक’ मधे मात्र स्त्री स्वतःच कशी सामाजिक चालीरितींना बळी पड़ते याचे प्रभावी चित्रण आहे. ’महिला दिवस’ या दिवसाची महिलेलाच किती व कशी किमत मोजावी लागते हे एक ज्वलंत वास्तवाचे चित्रण केले आहे ‘महिला दिवस’ या कथेत .

माणूसकी हे सभ्यतेचे दूसरे रूप आहे. नरेन्द्रकौर  यांच्या कथा माणूसकीचे दर्शन घडवताना  थेट आपल्या विचारांचाच कब्जा घेतात. यामधे ‘माणूसकी’  आणि ‘शिक्षा’ या दोन कथा तर जबरदस्त  धक्का देणार्‍या आहेत.’ माणूसकी ‘मधील आतंकवादी  स्वत:च रक्षक होतो तर  ‘शिक्षा‘ मधे एका मुलीची किन्नर कशी सुटका करतात – हे अतिशय प्रभावीपणे मांडले आहे.

काही सामाजिक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न काही कथामधे लेखिकेने केलेला दिसतो. उदा. परिणाम, युक्ति, महिला दिवस, आधुनिकता, फैसला, नात  वगैरे.

माणूस परिस्थितीने लाचार होतो याचे हृदयद्रावक चित्रण आहे ‘मजबूरी, भोज, तडजोड़’ वगैरे कथांमधे.

एकंदरित नरेंद्रकौरजींच्या कथेचे विषय  सर्वत्र संचार करणारे आहेत ;त्याबरोबरच त्यांचे भाषाप्रभुत्वदेखील तितकेच प्रभावी आणि सफाईदार आहे . आजच्या धावपळीच्या दुनियेत लोकाना चटपट मनोरंजन हवे असते – ही जनमानसाची नस त्यानी अलकमधून बरोबर पकडली  आहे. पण ते केवळ मनोरंजन नसून जनजागृतिचे , लोक कल्याण विचारात घेणारे, आणि समाजहितैषी विचार मांडणारे आहे. म्हणूनच मलाही त्यांच्या कथांचा अनुवाद करावासा वाटला. अपेक्षा करते की मी त्याना पूर्ण न्याय दिला आहे, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटला, ते पुस्तक वाचून मला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत   – माया महाजन

©   सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
3.3 3 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
अंजली

उत्तम अनुवाद जमलाय .