सुश्री विभावरी कुलकर्णी

अल्प परिचय 

पुणे महानगर पालिकेच्या शाळेत ३७ वर्षे प्राथमिक शिक्षिका व मुख्याध्यापक पदावरून २०२१ साली सेवा निवृत्त. सेवेत असताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नवनवीन कल्पना अमलात आणल्या. विविध प्रशिक्षणात मार्गदर्शन केले.

  • रेकी मास्टर असून मेडिटेशन व समुपदेशन करीत असते.
  • कलश मासिकात लेख व कविता प्रसिद्ध झाले आहेत.
  • विविध माध्यमातून समाजकार्य सुरू असते.

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ आकाशझुला… श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

निखळ वाचनाचा आनंद घ्या…

विश्वकर्मा प्रकाशन, पुणे यांनी विश्वास देशपांडे यांचं ‘आकाशझुला’ हे पुस्तक  प्रकाशित केलंय . या पुस्तकात विश्वास देशपांडे यांनी विविध विषयावर हलक्याफुलक्या भाषेत केलेलं ललित लेखन असलेले एकूण ५३ विविध लेख वाचायला मिळतात. सगळे लेख मनाला आनंद देणारे असे विविध विषयांवरचे आहेत. लेखकाची भाषा ओघवती, साधी सोपी आहे. कुठेही भाषेचं किंवा शब्दांचं अवडंबर नाही. त्यामुळे वाचताना निखळ आनंद मिळतो. प्रत्येक लेख अगदी दीड ते दोन पानांचा. साधारणपणे तीन मिनिटात वाचून होणारा. हे सरांचे दुसरे पुस्तक आहे. आधीच्या पुस्तकाप्रमाणेच या पुस्तकातील कोणतेही पान काढून आपण वाचू शकतो.

सरांचे अनुभव विश्व समृद्ध आहे हे वाचताना विशेष जाणवते. जोडीला तरल निरीक्षणशक्ती आहे. आणि समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेणारी लेखनशैली आहे. निसर्ग हा त्यांच्या अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळयाचा विषय आहे. त्यांच्या पुस्तकातील आकाश के उस पार भी … या पहिल्याच लेखातील ही काही वाक्ये पहा

‘हिवाळा संपण्याच्या उंबरठ्यावर आणि उन्हाळा सुरु होण्याच्या प्रतीक्षेत होता. असा हा काळ. छानपैकी वारा सुटला होता. वाऱ्याच्या झुळकीत हिवाळ्याचा सुखद गारवा होता. अंगाला मुलायम, रेशमी मोरपिसाचा स्पर्श व्हावा, तसा तो अंगाला स्पर्शून जात होता. काही न करता येथे असंच बसून राहावं आणि हे सुखद वारं अंगावर घ्यावं असं वाटत होतं .’ जीवनातील विविध प्रसंग, घटना त्यांच्या मनाला स्पर्शून जातात. आणि त्यातील चिंतनातून उमटत राहते, ती विविध प्रकारची तरल संवेदना.

या पुस्तकातील सगळे लेख वाचकाला सकारात्मक दृष्टिकोन देणारे आहेत. सरांना संगीताची सुद्धा विशेष आवड आहे आणि या पुस्तकातील काही लेख त्याची प्रचिती आपल्याला देतात. या गाण्यांच्याच आधारे जीवनातील सत्यावर मार्मिक भाष्य वाचायला मिळते. जीवन चलने का नाम यातून संकटावर मात करून दिव्यांग असून स्वयंदीप झालेल्या मुलीची प्रेरणादायी गोष्ट सांगितली आहे.

गाण्यातून संदेश देता देता लाख मोलाचा सूर्यप्रकाश,पाय जमिनीवर आहेत का? यातून आरोग्य कसे जपावे हा संदेश मिळतो.

निसर्ग नियमानुसार की निसर्गनियमा विरुद्ध यातून प्यारीबाई,प्रल्हाद जानी असे संत कित्येक वर्षे ईश्वर भक्तीत तल्लीन होऊन  अन्ना वाचून  जिवंत राहू शकतात ही अनोखी महती कळते.

मारुतीराया,रामराया यांचे भक्ती,श्रद्धा सांगणारे त्याच प्रमाणे संत रामदास,संत एकनाथ,गजानन महाराज,आद्य शंकरचार्य यांची संत वचने वाचू शकतो.

तर ज्ञानेश्वर  माऊलींची माऊली, राष्ट्रमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, भगिनी निवेदिता, किरण बेदी, मेरी  कोम, मलाला युसूफझाई  या महिलांची माहिती म्हणजे जणू स्त्री शक्तीला लेखकाने केलेले वंदन आहे !

या पुस्तकात जसा निसर्गावर प्रेम करणारा लेखक दिसतो, तसाच तो विविध विषयांवर सामाजिक बांधिलकीतून भाष्य करणारा एक जबाबदार नागरिक आपल्याला दिसतो. काही लेखातून पालक आणि शिक्षकांना आपल्या अनुभवाचे दोन शब्द सांगणारा अनुभवी शिक्षक दिसतो. या पुस्तकात काही व्यक्तीचित्रेही आहेत.

सखे सोबती हा लेख … झाडे बोलत नाही असे आपल्याला वाटते हे काही खरे नाही कारण जेव्हा तुम्ही झाडांशी बोलता तेव्हा ते देखील बोलतात वेगळ्या प्रकारे..

गांधी तीर्थ आणि अजिंठा लेणी ह्या लेखात व्यक्त केलेली खंत योग्यच आहे. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छ्ता ह्याचे महत्त्व आपल्या समाजात आणि प्रशासनात देखील अजून रुजले नाही हेच खरं.. मॉल स्वच्छ पण रेल्वे स्टेशन अस्वच्छ,गजानन महाराज मंदिर आणि तिथली स्वच्छ्ता इतर अनेक मंदिरात का नसते ? सामाजिक भान आणि तळमळीने कार्य करण्याची इच्छा शक्ती हे बदल करू शकतील.असो…

आणि आकाश झुला या लेखाचे शब्दांकन अप्रतिम, नितांत सुंदर. सुख, दुःख, संकटे हे सर्व आयुष्याचे अविभाज्य भाग आहेत आणि त्यांना अतिशय सकारात्मकेने सामोरी जाणाऱ्या सौ.सारिका ची वृत्ती नक्कीच प्रेरणा देणारी आहे.तसेच हार न मानता जिद्दीने आपले लक्ष्य साध्य करणे हे देखील कौतुकास्पद आहे. आपल्या पाशी असलेले संस्कार आणि सुसंस्कृतता हे देखील तिच्या जिद्दी आणि ध्येयनिष्ठ स्वभावाचे कारण आहे असे वाटते.

असे विविध विषयांना स्पर्श करणारे पुस्तक आपल्या संग्रही असावेच.तसेच स्नेही जनांना पुस्तकरूपी उत्तम भेट देऊ शकतो.

या पुस्तकांचे मला जाणवलेले एक वैशिष्ठ्य असे आहे पुस्तकांचे आभावलाय ( ऑरा ) खूप उत्तम आहे. त्यातून नेहेमी सकारात्मक लहरी बाहेर पडतात.ज्या वेळी लेखक अत्यंत उत्तम,आनंदी व सकारात्मकतेने लेख लिहितो त्याच लहरी वाचक अनुभवतात.

त्या मुळे लेख वाचताना सुद्धा आपण ट्रान्स मध्ये जातो.

सर्वांनी हा अनुभव घ्यायलाच हवा. असे मी आग्रहाने सांगेन.

या आणि त्यांच्या इतर पुस्तकातील लेखांचे सादरीकरण दर मंगळवारी व शुक्रवारी रेडिओ विश्वास वर या सुखांनो या या कार्यक्रमात स्वतः लेखक करतात.ते ऐकणे ही एक पर्वणी असते.

परिचय – विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments