सुश्री संगीता कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘! प्रेमाची परिभाषा !’ – अँड्रो लिंकलेटर ☆ परिचय – सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

!! प्रेमाची परिभाषा !!

मूळ लेखक— अँड्रो लिंकलेटर 

अनुवाद— मेघना जोशी 

मेहता पब्लिशिंग हाऊस 

प्रेमाची परिभाषा…प्रेम , विरह, वेड आणि युद्ध यांची एक अतिशय हृदयस्पर्शी कहाणी..” द कोड ऑफ लव्ह ” या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद मेघना जोशी यांनी सहज सोप्या हळूवार शब्दांमध्ये आणला आहे. या पुस्तकाचे मूळ लेखक अँड्रो लिंकलेटर यांनी ही सत्यकथा अतिशय कौशल्याने आणि संवेदनशीलतेने लिहिली आहे. असे हे पुस्तक माझ्या वाचनात आले..

1939 सालचा वसंत ऋतू…सुंदर तरुणी पामेला किराज व देखणा पायलट डोनाल्ड हिल याला भेटते व पाहताच क्षणी कलिजा खलास झाला या उक्तीनुसार ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण दुस-या महायुद्धामुळे त्यांचा विवाह लांबणीवर पडतो. आनंद, दुःख, नैराश्य, चैतन्य अश्या अनेक रूपांमधून तिने प्रेमाचा अनुभव घेतला. पण हे प्रेम मात्रं तिला सहजासहजी मिळाले नाही. पण तिच्या या प्रेमावरच्या एकनिष्ठेनेच त्या एकमेव बंधनाला एक खोली आणि उत्कटता प्राप्त करून दिली. महायुद्धाने त्यांना परस्परांपासून वेगळे केले. त्यांचे युद्धा नंतर परत येणे हेच एवढे वेगळे होते की नंतरच्या पिढीमध्ये अश्या प्रकारचा वेगळेपणा सापडणे केवळ अशक्यच होते. हे स्पष्ट पुस्तक वाचताना जाणवते. 

डोनाल्डची नेमणूक हाँगकाँगला होते आणि तेथे भविष्यातला संभाव्य धोका लक्षात घेऊन तो डायरी लिहायला सुरुवात करतो. डायरी मधील सुरुवातीच्या शब्दांमध्येच त्याने स्पष्ट लिहिले आहे की त्याला त्या क्षणांपासून सर्व घटनांची नोंद का ठेवावीशी वाटली?  पण त्याने त्यातला मजकूर मात्रं सांकेतिक भाषेत लिहिला आणि ती भाषा मात्र रहस्यमय आकड्यांची असते. डायरी मधील पहिल्याच ओळीमधून डायरी लिहिणा-याची दूरदृष्टी दिसून येते. डोनाल्डचा दृष्टीकोन मात्रं वेगळा होता. त्याच्या बाबतीत जे काही घडेल त्याच्या तो नोंदी ठेवायचा. त्याच्या स्वभावाची आणखी एक खासियत होती ती म्हणजे काही घटना गोष्टी लपवण्याकरता सांकेतिक भाषेची मदत घेतली होती. सुरूवातीला त्याने गुपिते लिहिण्याकरता शाॅर्टहँडचा वापर केला  पण काहीच महिन्यानंतर त्याला आपला मजकूर वाचली जाण्याची भीती वाटू लागली तेव्हा त्याने त्यावर सांकेतिक शब्दांचे वेष्टण चढवले व मजकूरा भोवती एक गूढ वलयं निर्माण केलं त्यामुळे तो खूपच गुंतागुंतीचा बनला. फक्त त्याला एकट्यालाच तो वाचणे शक्य होते. पण त्याचे शेवटचे शब्द हे तिच्या नावाभोवतीच गुंफले होते…तर ती होती फक्त आणि फक्तच पामेला..!! ती डायरी म्हणजे त्याचे गुपित..

हाँगकाँगचे युद्ध अश्या प्रकारे सुरू झाले होते की ते फार काळापर्यंत टिकणारेही नव्हते. त्याचे दूरगामी परिणाम डोनाल्डच्या उभ्या आयुष्यावर कायमचे झाले. त्याला प्रत्यक्ष युद्धानंतर युद्ध कैद्यांच्या छावणी मध्ये नेण्यात आले. आणि हा माणूस सर्वच बाबतीत कायमचा आणि पूर्णपणेबदलून गेला. युद्धा पूर्वीचा आणि युद्धा नंतरचा डोनाल्ड यामध्ये एक महत्त्वाचा दुवा होता तो म्हणजे त्याची ती डायरी आणि त्याचे पामेलावरचे प्रेम….या दोन गोष्टी मरेपर्यंत त्याच्या जवळ होत्या..

डोनाल्ड युद्धाहून परत येतो पण युद्ध कैदी असताना त्याचा अतोनात शारीरिक व मानसिक छळ झालेला असतो. त्याचा परिणाम त्याच्या मनावर व आयुष्यावरही होतो. त्या आठवणी आयुष्यभर त्याचा पिच्छा पुरवतात…पामेलाला मनापासून वाटते की डोनाल्डला समजून घेण्यासाठी त्याच्या डायरीतील रहस्ये समजून घेतली पाहिजे. हे रहस्यमय आकडे पामेलाला उलगडता येतील?  त्याची सांकेतिक भाषा तिला जाणून घेता येईल?..

आपल्या प्रेमाला जाणून घेण्याची एका शोधाची ही सत्यकथा…त्याच्या या डायरीचे रहस्य त्याच्या मृत्युनंतरही काही वर्षे तसेच होते…!!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
2 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments