सौ. वीणा आशुतोष रारावीकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ 

☆ Energize Your Mind – लेखक – गौर गोपाल दास ☆ परिचय – सौ. वीणा आशुतोष रारावीकर ☆ 

पुस्तक – Energize Your Mind

लेखक – गौर गोपाल दास

पृष्ठ संख्या – ३०९

प्रकाशक – पेंग्विन इंडिया

किंमत – रुपये २९९

सध्याच्या काळात अध्यात्मिक, आयुष्याला प्रेरणा देणारे विचार विनोद बुद्धीने जगासमोर मांडणारा एक योगी पुरुष — अशी ज्याची जगभर ख्याती आहे असा आघाडीचा योगीपुरुष…. गौर गोपाल दास. स्वामी प्रभुपादजी यांच्या पंथाचा एक शिष्य. प्रभु गौर गोपाल दासजी सकारात्मक ऊर्जा देणारे,जीवनशैली प्रशिक्षक आणि प्रेरक वक्ते आहेत .

“Energize Your Mind“ हे त्यांचे दुसरे इंग्लिश पुस्तक. स्वतःच स्वतःचे विचार, मनाची अवस्था,  भावना यांवर ताबा कसा मिळवायचा आणि आयुष्यात यशस्वी कसे व्हायचे, यावर बाजारात अनेक पुस्तके, सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. असे असताना या पुस्तकाचे वैशिष्ट्य काय? 

“आपल्याला आनंदी राहायचे असेल तर आपण कसे बदलले पाहिजे?” हे सांगताना लेखक लोकांना पोकळ सल्ले देत नाही. तर त्या अनुषंगाने स्वतःला आलेले अनुभव तो कथन करतो. स्वतःच्या उदाहरणांवरून त्यांनी एक एक मुद्दा विशद केला आहे. त्यातून मी कसा घडत गेलो हे त्यांनी मांडले आहे. एका योगीचे जीवन आणि सर्व सामान्य माणसांना येणारे रोजच्या आयुष्यातील प्रश्न यात फरक आहे, याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच हे पुस्तक वाचताना, आपण आपल्या आयुष्याशी त्याचा संबंध सहजरित्या जोडू शकतो.

दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या पुस्तकाची भाषा. अतिशय साधी सरळ सोपी भाषा. भाषा इंग्रजी असली तरीही सर्व साधारण वाचकांना तितक्याच सहजपणे समजेल आणि आत्मसात होऊ शकेल, असे हे पुस्तक. प्रत्येक प्रकरणाची सुरवात एखादे सुंदर वाक्य उद्‌घृत करून केली आहे. तसेच प्रकरणाच्या शेवटी सारांश दिलेला आहे. यात आपल्याला अभ्यास करायला प्रश्न दिलेले आहेत. यातून आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेने बघू शकतो.

आपले आयुष्य, आपल्या मनात येणारे विचार, त्यामुळे होणारी मनाची स्थिती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावना याला कारणीभूत कोण असतो? यावर आधारित लेखकाने पुस्तकाचे चार विभाग पाडले आहेत. ते अतिशय चपखल आहेत. पहिला भाग, मी व  माझे मन. दुसरा भाग इतर व माझे मन. तिसरा, मी व इतरांचे मन आणि शेवटचा भाग म्हणजे हे चराचर विश्व व माझे मन. चार विभागात मिळून एकूण पंधरा प्रकरणे या पुस्तकात आहेत.

या पुस्तकाची सुरवातच अशी होते की , “आपण सोफिया नाही. आपण माणूस आहोत.” म्हणजे काय तर आपण रोबो नाही. मनुष्य आहोत. याचाच अर्थ आपल्याला भावना आहेत. त्याची जाणीव व अनुभव घ्यायला शिकले पाहिजे. त्यांच्याशी सामना करता आलं पाहिजे. त्यांना बरं करता आलं पाहिजे. आपल्या मनातल्या भीती, चिंता- काळजी, नैराश्य आणि सर्वात शेवटची व महत्वाची भावना म्हणजे अपराधीपणाची यातून बाहेर पडण्याची गरज असते. या भावना बऱ्या करताना गरज पडली तर बाहेरच्या समुपदेशनाची मदत घ्यायला काहीच हरकत नाही. हे स्वानुभवातून लेखकाने सांगितले आहे. एकाच भावनेला अनेक छटा असतात. त्याचा एक तक्ताच या पुस्तकात दिला आहे.

इतरांच्या वागण्याचा आपल्या मनावर किती परिणाम होऊ द्यायचा? यासाठी त्यांनी स्वतःबद्दल एक किस्सा सांगितला आहे. हा योगी पुरुष आयुष्यातील तत्व किंवा अध्यात्मिक विचार हलक्या फुलक्या रितीने आपल्या भाषणातून मांडत असतो. विनोद करत आयुष्यातील विरोधाभास उलगडून दाखवणे, ही त्यांची खासियत आहे. पण याच कलेवरून त्यांना त्यांच्याच आश्रमातील एक वरिष्ठ योगी उलट सुलट बोलून जातो, ते देखील पहाटेच्या वेळी ध्यानाला बसलेले असताना. अशावेळी योगी असला तरी लेखकाची काय अवस्था होते? ते या गोष्टीला कसा प्रतिसाद देतात? ही गोष्ट आपण वाचून समजून घेतली पाहिजे. लोकांच्या नकारात्मक वागण्याची यादी दुसऱ्या भागात दिली आहे. प्रत्येकामध्येच यातील गुण कमी-अधिक प्रमाणात असतात. ते प्रसंगानुरूप दिसून येत असतात. त्यापासून आपला बचाव करत स्वतःला शक्तिशाली करण्याची जबाबदारी आपली असते. वाईट आठवणी पुसून टाकायच्या व आयुष्यातील तीव्र दुःखाच्या वेदनेतून जातांना स्वतःला वृध्दिंगत करायचे असते. दुःखाचे पाच टप्पे असतात. नाकबूल असणे, राग, दुःखाचा सौदा, नैराश्य व नंतर त्याचा स्वीकार. दुःखाचे हे पाच टप्पे आपण कदाचीत परत परत अनुभवत असतो. पण त्याला सामोरे जायला आपण खंबीर झालेले असतो.

लोकांच्या वागण्या-बोलण्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल; तर आपल्या वागण्या-बोलण्याचा लोकांच्या आयुष्यावर परिणाम नाही का होणार? याचा सुध्दा विचार आपण केला पाहिजे. आपल्यामुळे लोकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होत आहे ना, याकडे थोडे लक्ष दिले पाहिजे. समोरच्या माणसाच्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आणि सुरी, खंजीर व बाण यापेक्षा शब्द हे किती धारदार अस्त्र आहे, याचा विसर पडता कामा नये.

भारतीय संस्कृती, रामायण-महाभारतातील दाखले देत, योगविद्येने या पुस्तकाचा शेवट होतो. आपल्या मनाचा अन्नमय कोषापासून सुरु होणारा प्रवास सरतेशेवटी आनंदमयकोषात कसा करता येईल, याचे सविस्तर वर्णन या पुस्तकात लिहिले आहे. आपण योगी नसून योग्यासारखे म्हणजे आनंदमय जीवन जगू शकतो. ही जाणीवच मनाला आनंद देते.

लेखकाने पुस्तकात अगदी थोडे संस्कृत श्लोक उद्धृत केले आहेत. संस्कृत श्लोक इंग्रजी लिपीमध्ये वाचायला आपल्याला थोडे कठीण वाटते. लेखकाने मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे. पुस्तकात अनेक ठिकाणी त्याचे संदर्भ दिले आहेत. त्याचबरोबर आपला मुद्दा सांगताना वेळोवेळी अनेक छोट्या- छोट्या गोष्टी लेखकाने सांगितल्या आहेत. कधी कधी त्या लांबवल्यासारख्या वाटतात.

असे असले तरी हे छोटे पुस्तक एकदा हातात घेतल्यानंतर आपण झपाटल्यासारखे वाचून पूर्ण करतो व मगच खाली ठेवतो.

© सौ. वीणा आशुतोष रारावीकर

चर्चगेट, मुंबई

मो ९८१९९८२१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
PRAMOD SURYABHAN GHATE

I want to purchase Energies Your mind