श्री अरविंद लिमये
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘बिटवीन द लाईन्स’ (एकांकिका संग्रह) – डाॅ. मिलिंद विनोद ☆ परिचय – श्री अरविंद लिमये ☆
जगण्याचा नाट्यपूर्ण वेध ! – बिटवीन द लाईन्स (एकांकिका संग्रह)
लेखक : डॉ. मिलिंद विनोद.
प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन, मुंबई.
डॉ. मिलिंद विनोद यांचा ‘बिटवीन द लाईन्स’ हा दहा एकांकिकांचा संग्रह. या सर्वच एकांकिका,नोकरी व्यवसायानिमित्त लेखकाचे विविध परदेशांमधील प्रदीर्घकाळचे वास्तव्य त्याच्या अनुभवांचा पैस विस्तारित करणारे ठरल्याचा प्रत्यय देणाऱ्या आहेत.
या एकांकिका विषय-वैविध्य आणि आशय यादृष्टीने लक्षवेधी आहेत. तसेच त्यातून डाॅ.मिलिंद विनोद यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती, जगण्यातली विसंगती न् कालातीत तसेच कालपरत्त्वे बदलणाऱ्या प्रश्नांचे बोचरेपण अधिकच तीव्र करीत असल्याचेही जाणवते.
‘मा सलामा जव्वासात’ व ‘वेसोवेगल सिनकाॅप’ अशी वरवर अनाकलनीय तरीही अर्थपूर्ण शीर्षकांसारखीच ‘बिटवीन द लाईन्स’ , ‘विजिगिषा’ यासारखी सुबोध वाटणारी बाकी एकांकिकांची शीर्षकेही रसिकांची उत्सुकता वाढवणारी आणि या एकांकिकांचे वेगळेपण अधोरेखित करणारीही आहेत.
‘मा सलामा जव्वासात’ आणि ‘विजिगिषा’ या एकांकिकांमधील नाट्य अनुक्रमे दुबई व अमेरिकेच्या पार्श्वभूमीवर आकाराला येते. ‘मा सलामा जव्वासात’ मधील जीवनसंघर्ष अस्वस्थ करणारा आहे. आपलं कुटुंब, आपला देश यापासून दूर परदेशी कामधंद्यासाठी जाऊन तिथे वर्षानुवर्षे असह्य कष्टप्रद आयुष्य व्यतीत करावं लागलेल्या मजूर- कामगारांचं उध्वस्त भावविश्व आणि त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीतला भ्रमनिरासांती व्यथित करणारा अखेरचा प्रवास वाचकांच्या मनाला चटका देऊन जातो !
‘विजिगिषा’ ही एका सत्यघटनेवर आधारलेली, ‘अॅराॅन’ नावाच्या इंजिनिअरच्या, एका अनपेक्षित वळणावर सुरु झालेल्या घुसमटीमधील उलघालीचा नाट्यपूर्ण वेध घेणारी एकांकिका आहे.
या दोन एकांकिकांचा हा ओझरता परिचयसुध्दा इतर एकांकिकांचा कस आणि जातकुळी यांचा अंदाज येण्यास पुरेसा ठरावा असे वाटते.
इतर सर्व एकांकिकांची पार्श्वभूमी भारतीय असून त्यांच्या आशय-विषयांचं वेगळेपणही गुंतवून ठेवणारे आहे. अर्थशून्य अशा निरस मराठी मालिकांचं उपरोधिक चित्रण (‘टी आर पी’ अर्थात ‘थर्ड रेटेड पब्लिक’), गीतरचना,संगीत आणि गायन यापैकी कोणती कला श्रेष्ठ असा पेच पडलेला नायक आणि गीतकार,संगीत-दिग्दर्शक आणि गायिका या रुपात त्याच्या सहवासात आलेल्या तीन स्रियांपैकी कुणा एकीची निवड करावी हा त्याला पडलेला प्रश्न (‘त्रिधा’ द म्युझिकल), सरोगेट मदरची मानसिक ओढाताण, अस्वस्थता, दुःख आणि परिस्थितीशरणता (ओव्हरी मशीन), दयामरणाचा प्रश्न (वेसोवेगल सिनकॉम), संगीतप्रेमींची कालानुरुप बदललेली अभिरुची आणि त्यामुळे जुन्या संगीताचा वारसा प्राणपणाने जपू पहाणाऱ्या एका बुजूर्ग कलाप्रेमीची होणारी मानसिक कुतरओढ (रुखसत विरासत), विडी-कामगार स्त्रियांचं शोषण (पॅसिव स्मोकर), ‘वेड (अन)लाॅक’ मधे विभक्त जोडप्याला अनपेक्षित अल्पसहवासात झालेला हरवलेल्या प्रेमाचा साक्षात्कार, ‘बिटवीन द लाईन्स’ मधलं समाजापासून तुटलेलं किन्नरांचं वेदना आणि वैफल्यग्रस्त जगणं…..! ही या संग्रहातील एकांकिकांची ओझरती झलक !!
या सर्व एकांकिकांचं सादरीकरण अर्थातच दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांचाच कस पहाणारं ठरणार असलं, तरी लेखक-दिग्दर्शकाच्या योग्य समन्वयातून तयार होणाऱ्या या एकांकिकांच्या रंगावृत्ती प्रेक्षकांना उत्कट नाट्यानुभव देण्यास पूरक ठरतील असा विश्वास वाटतो.
पुस्तक परिचय – श्री अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈