श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ काव्य संग्रह “समईच्या वाती” – कवी : सुभाष कवडे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

काव्यसंग्रह   : समईच्या वाती

कवी           : श्री.सुभाष  कवडे

प्रकाशक    : शब्दवेल प्रकाशन, कोल्हापूर 

पृष्ठे            : 72

मूल्य          : 80/_

सांगली जिल्ह्य़ातील  भिलवडी येथील  ज्येष्ठ  साहित्यिक  श्री.सुभाष  कवडे यांचा ‘ समईच्या वाती ‘ हा पाचवा काव्यसंग्रह. काव्यसंग्रह  संपूर्ण  वाचल्यानंतर  समजते की या संग्रहाचे नाव किती सार्थ  आहे  ! समईच्या मंदपणे तेवणा-या  वातीत प्रखर दिव्याचं सामर्थ्य  नसत.पण या वातींत  संस्कारांशी नातं जोडून शांतपणे तेवत राहण्याचं  सात्विक  तेज आहे.या संग्रहातील कविता म्हणजे काव्यरुपी  समईची एक एक वातच आहे.प्रत्येक पानावरील एक कविता म्हणजे मनाचा एक एक कोपरा उजळून टाकणारी वातच आहे . ते ही अगदी सहजपणे.दाहकता नाही पण तेज आहे.भडकत नाही पण विचारांचा वन्ही चेतवते.सात्विक ,संयमी आणि समर्पक  शब्दांमुळे तिचे सामर्थ्य  अधिकच वाढलेले दिसते.कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता सौम्य शब्दात  पण अचूकपणे केलेली कानउघाडणी श्री.कवडे यांच्यातील जातिवंत शिक्षकाचे दर्शन  घडवते.

या संग्रहातील कवितांमध्ये विषयांची विविधता आहे.इथे निसर्गाच्या निरनिराळ्या रुपांच दर्शन  होते.ग्रामीण  आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या संस्कृती पहायला मिळतात.इथे उपदेश आहे पण बोचरी टीका नाही.इथे कानउघाडणी आहे पण कुत्सित  निंदा नाही.इथे मातीशी इमान आहे आणि बेईमानीला थारा नाही.इथे सात्विकतेला मुजरा आहे पण दांभिकतेवर  प्रहारही आहे.शब्दांचे अवडंबर  नाही पण ह्रदयाला घातलेली साद आहे.सु विचारांची पेरणी करत संस्कारांचे मळे फुलवणारी श्री.कवडे यांची कविता मनाला सात्विक  आनंद देऊन जाते,जी सात्विकता फक्त समईच्या वातीतच असू शकते.समईची जागा देवघरात असते.या संग्रहातील कविता प्रत्येक  रसिकाच्या मनाच्या घरात वास करून राहील याबद्दल  शंकाच नाही.आधुनिकतेच्या नावाखाली छानछोकीने नटलेल्या गर्दीत,एखाद्या स्त्रीने पारंपारिक  वेषात प्रवेश करावा तशी श्री.सुभाष  कवडे यांची कविता अवतरते.समईला साजेल अशा अभंगस्वरुप रचना मनाच्या गाभा-यात विचारांचा घंटानाद  केल्याशिवाय रहात नाहीत.म्हणूनच ….. 

        “आरती शब्दांची

        वाटे आनंदाची

        मजला सुखाची

        नित्य  नवी “

असं ते म्हणतात  ते योग्यच वाटते..

मनातील भाव व्यक्त  करताना सर्वप्रथम  त्यांना आठवण होते ती माणसांची.ते म्हणतात  

              ” माझीया मनात

                माणूस उरात

                आवाज  कानात 

                माणसांचा “

हाच माणूस  जेव्हा चुकीच्या मार्गाने जाताना दिसतो तेव्हा ते हळहळतात आणि लिहून जातात

             ” दिवस धनाचे

              नाहीत घामाचे

              जगणे फुकाचे 

              हवे  हवे

              गुणांचा पाचोळा

              बघवेना डोळा

              आपसात खेळा

              खेळ नवे “

अशा दिखाऊ जगात म्हणून  तर …. 

            ” माणूस वाचावा

              अंतरी जाणावा

              शब्द  पारखावा

              येता जाता”

असा इशाराही ते देतात.

            ” कसे दिस आले

              गाभारे सजले

              विठूचेही शेले 

              पळविले ”      

हे खरे असले तरी आपण मात्र 

             ” दीप असे व्हावे

                जग उजळावे 

                उरी मिरवावे 

                माणसांनी “

जगण्याचे सार हरवत चाललेले असताना निसर्गानेही साथ देऊ नये यासारखे संकट अन्य कोणते असणार ? दुष्काळाची तीव्रता,पाण्याचा अभाव,त्यामुळे सोन्यासारख्या मातीतून अंकूर फुटू शकत नाही .हे दुःख कुणाला सांगावे.?

       ” मातीवरी पाय

         करपली साय

         सांगू कुणा काय

         बोलवेना “

अशा अवस्थेत 

         ” मेघांचा सोहळा

           मातीचा उमाळा

           तुझा कळवळा

           प्रकटावा “

एवढीच कविची  प्रार्थना आहे.ती ऐकून  कधी मेघ बरसतो आणि मग करप्या मातीलाही साज चढू लागतो.

            “जग आता सारे

            आनंदाचे वारे

            श्रीरंग भरे

            अंतरात “

अशा या माणसाच्या सुखदुःखाशी समरस होणा-या कविता.माणूस  आणि निसर्ग  यांच्यातील नाते उलगडून दाखवणा-या.संकटातून मुक्त  होण्यासाठी प्रार्थना करणा-या.निसर्गाची रुपे रंगवणा-या.आणि शब्द  हेच कविचे खरे धन आहे हे सांगणा-या.

                 शब्द  माझे धन

                  दिधला सन्मान

                  आनंद निधान

                  जीवनात ”  

…. असे कवी निःसंदिग्ध पणे म्हणत आहे.

प्राचार्य  डाॅ.सयाजीराव मोकाशी यांची लाभलेली प्रस्तावना  ही सुद्धा अत्यंत  वाचनीय आहे.या निमित्ताने त्यांनी मराठी कवितेचा परामर्ष घेत घेत अत्यंत  काव्यात्म  शब्दांत संग्रहातील  कवितांची बलस्थाने दाखवली आहेत.’ कल्पकतेने काव्याची कोवळीक कलापूर्ण बनली की कवितारुपी केवड्याचे कणीस कौतुकास पात्र ठरते.’ यासारख्या काव्यात्मक वाक्यातून दिसणारे शब्दलालीत्य  अनुभवल्यावर  ‘प्रस्तावना’ विषयीच्या कल्पनाच बदलून जातात.अशा प्रस्तावनेमुळे  काव्यसमईच्या  वाती अधिकच लखलखीत  झाल्या आहेत.अंतरंगाप्रमाणेच श्री.अविनाश  कुंभार यांनी सौम्य  रंगसंगतीतील रेखाटलेले मुखपृष्ठ  मन शांत करणारे आहे.

या वातींच्या प्रकाशात श्री.सुभाष  कवडे यांचा लेखनप्रवास  अखंडपणे चालू राहो , ही सदिच्छा !

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments