सुश्री प्रज्ञा मिरासदार

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ — श्रीमद् भागवत पुराण कथा ज्ञानयज्ञ… भाग-5 ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

मी आज श्रीमद् भागवत कथेचा जो भाग लिहीत आहे तो सर्वांच्या अत्यंत आवडीचा विषय आहे. आपण एकूण नऊ स्कंध वाचले. आजचा हा दशम स्कंध म्हणजे भागवत पुराणाचा आत्मा आहे. हा भाग पूर्णपणे श्रीकृष्णाच्या लीलांनी व्यापलेला आहे. रासक्रीडेचेही वर्णन रसभरीतपणे यात आहे. या पुस्तकाची सुरुवात लेखकाने गोपीगीताने केली आहे. हे गोपीगीत म्हणजे गोपींना श्रीकृष्णाच्या सहवासाचा गर्व झाला होता, तो दूर करण्यासाठी व त्यांना शुद्ध भक्तीचा धडा देण्यासाठी भगवंत गुप्त झाले. मग मात्र गोपी विराहाने वेड्या झाल्या. सर्व चराचरसृष्टीत श्रीकृष्ण कोठे आहे म्हणून विचारीत फिरत राहिल्या. निराशेने कालिंदीकाठी बसून श्रीकृष्णाची त्यांनी आर्त विनवणी केली. दशम स्कंधातील हा भाग गोपीगीत म्हणून प्रसिद्ध आहे. तो कृष्णा वरील अनन्य भक्तीचा एक उत्तम ठेवा आहे. एकूण एकोणीस संस्कृत श्लोकांच्या, गेय असणाऱ्या गोपीगीताने या पुस्तकाची सुरुवात होते.

पुढे मात्र संपूर्ण श्रीकृष्ण चरित्र आहे. पहिली कथा वसुदेव देवकीच्या विवाहाची आहे. मागील स्कंधात शुकाचार्यांनी परीक्षित राजाला यदुवंशाचा विस्तार सांगितला होता. तेव्हा परीक्षिताने पुढील वृत्तांत जाणून घेण्यासाठी शुकाचार्यांना काही प्रश्न विचारले की, माझे आईच्या गर्भात अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून संरक्षण कसे झाले? कंसाला देवाने का मारले? त्याचे आयुष्य, पत्नी वगैरे वगैरे!! त्यानंतर शुकाचार्य परीक्षिताला श्रीकृष्ण चरित्राचे कथन करतात. दानवांच्या भाराने पृथ्वी व्यथित झाली.. ती गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवांकडे गेली. सर्वांनी मिळून भगवान श्रीविष्णूंची प्रार्थना केली. तेव्हा आकाशवाणी झाली की शेष आदिमाया यांच्यासह भगवंत स्वतः वसुदेवाच्या पोटी अवतार घेणार आहेत.. सर्व देवांनी व देव स्त्रियांनी यदुकुलात गोपगोपींच्या रूपात अवतार घ्यावा, असे ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले.

वसुदेव देवकीचा विवाह झाला. त्यांच्या रथाचे सारथ्य देवकीचा बंधू कंस मोठ्या आनंदाने करीत होता. एवढ्यात आकाशवाणी झाली की “याच देवकीचा आठवा गर्भ तुझा काळ बनणार आहे” हे ऐकून कंसाने ताबडतोब वसुदेव व देवकीस बंदीवासात ठेवले.  त्यांची मुले जन्मतःच कंसाला आणून द्यायचे वचन कंसाने वसुदेवाकडून घेतले. पहिल्या मुलाचा जन्म झाला तेव्हा प्रामाणिकपणे वसुदेव मुलाला घेऊन कंसा कडे आला. पण कंसाने सांगितले की “या मुलाला घेऊन जा परत. तुझा आठवा मुलगा मला मारणार आहे.” वसुदेव आनंदाने परत गेला. पण मग कंसाचे सगळे अपराध भरणे आवश्यक होते. म्हणून नारद मुनी त्याला म्हणाले की “देवकीच्या पोटी येणारा कोणताही मुलगा विष्णूचा  अंश असू शकतो”. मग मात्र कंसाने देवकीची मुले जन्मतःच मारून टाकली. अशी सहा मुले त्याने मारली.. सातव्या वेळी योगमायेने यशोदेच्या गर्भात प्रवेश केला. शेषाने रोहिणीच्या पोटी अवतार घेतला. तो बलराम!!

आठव्या वेळी मात्र भगवंताने देवकीच्या पोटी जन्म घेतला त्या वेळचे सृष्टीतील बदलांचे सर्व रम्य वर्णन लेखकाने केले आहे. ते प्रत्यक्ष वाचायलाच हवे.. वसुदेवाने तो अंश गोकुळात नंदाघरी नेऊन ठेवला व यशोदेची नवजात मुलगी देवकी पुढे आणून दिली. तिला धरून कंस तिला शिळेवर आपटणार इतक्यात ती योगमाया त्याच्या हातून निसटली. कंसाला उपदेश करून ती अंतर्धान पावली. नंतर श्रीकृष्ण यशोदेच्या मायेत गोकुळात वाढू लागला. असंख्य लीलांनी त्याने गोकुळाला तोषविले. ते सर्व वर्णन पुस्तकात आले आहे. कंसालाही समजले की आपला शत्रू कुठेतरी अवतीभवतीच्या गावात वाढतो आहे. त्याने पूतना या राक्षसीला सर्व गावातील लहान मुले मारून टाकण्याची आज्ञा दिली. ती रूप पालटून गोकुळातच आली. श्रीकृष्णाने तिचे स्तनपान करताना तिचे रक्त व प्राणही प्राशन केले. तिला नंतर मुक्ती ही दिली. यानंतर शकटासूर तृणावर्त वगैरे राक्षसांचे वध ही कृष्णाने युक्तीने केले. पुढची कथा बलराम व कृष्णाच्या नामकरणाची आहे. ती अगदी रसाळ कथा आहे.

यशोदेने खोड्या करणाऱ्या कृष्णाला उखळाला बांधले. त्याच उखळांना दोन झाडांच्या मधून ओढत नेऊन कृष्णाने शापित रुद्र सेवकांचा उद्धार केला. ते वृक्ष म्हणजे नारदांच्या शापाने वृक्ष बनलेले रुद्र सेवक- कुबेराचे मुलगे होते. पुढची कथा सर्व गोकुळ वासियांचे वृंदावनात स्थलांतर, अघासुराचा वध यासंबंधी आहे. ब्रह्मदेवांनीही कृष्णाची परीक्षा पाहण्यासाठी गाई गुरांना व गोपांना पळवून नेले. तेव्हा कृष्णाने जेवढी गाई गुरे व गोपाळ होते तेवढी रूपे धारण केली. याआधी  सर्व  गोपाळांसमवेत  बलराम व कृष्णाने केलेल्या गोपाळकाल्याचा व भोजनाचा  अतिशय  सुंदर कथाभाग  लेखकाने  वर्णन  केला आहे.  पुढे ब्रहमदेवानेही  श्रीकृष्णाची परीक्षा  पाहण्याचे  ठरविले. गाई वासरे व गोपाळ परत पाठवले आणि त्यांनी श्रीकृष्णाची स्तुती केली धेनुकासुर या दैत्याच्या वधाच्या नंतर देवांनी कृष्णावर पुष्पवृष्टी केली, ती कथा आली आहे.

यानंतरचे कालिया मर्दनाचे अतिशय सुंदर वर्णन लेखकाने केले आहे. कालियाचा पूर्वेतिहासही पुढे आला आहे. प्रलंब राक्षसाचा वध, श्रीकृष्णाने जंगलातील वणवा प्राशन केला, गोपींनी श्रीकृष्णाचे गुणवर्णन केले, गोपींनी कृष्ण हा पती म्हणून लाभावा म्हणून केलेले कात्यायनी व्रत, विप्रस्त्रियांवर श्रीकृष्णाने अनुग्रह केला वगैरे छोट्या कथा आल्या आहेत. यापुढची कथा मात्र इंद्राचा क्रोध, गोवर्धन पूजा, श्रीकृष्णाने गोवर्धन उचलून इंद्राचे गर्वहरण केले. ही रसाळ कथा लेखकाने सुंदररीत्या वर्णिलेली आहे. कृष्णाने महावृष्टीतून ब्रज स्त्रियांचे, व्रजवासीयांचे रक्षण केले तेव्हा इंद्राने कृष्णाची क्षमा मागितली. इंद्राने आकाशगंगेच्या जलाने व कामधेनूने दुग्धाने कृष्णाला सर्वाधीश म्हणून अभिषेक केला व त्याला गोविंद असे नाव दिले.

पुढचा कथा भाग हा रासक्रीडेचे रसभरीत वर्णन आहे. गोपींचे गर्वहरण, गोपी गीत, या कथा फारच छान आहेत. शंखचूडाच्या वधाची कथा त्यातच आहे.वृषभासुर,केली, व्योमासुर इत्यादी कंसाने पाठवलेले दैत्य कृष्णाने मारले. त्यामुळे कंस अस्वस्थ झाला. त्याने अक्रूराला पाठवून कृष्णाला मथुरेत पाचारण केले. अक्रूर बलराम, कृष्णाला घेऊन गेला. तिथे कृष्णाने कुब्जेचा उद्धार केला. या कथा सतत वाचत राहाव्या असे वाटते. कृष्णाने कंसाच्या निमंत्रणानुसार आखाड्यात प्रवेश करून प्रथम कुवलयापीड या मत्त हत्तीचा वध केला. मुष्टिक, चाणूर यांचाही वध केला आणि सर्वात शेवटचे वर्णन आहे ते कंसवधाचे!!!! प्रत्यक्ष वाचायलाच हवे .

मग श्रीकृष्ण आपल्या जन्मदात्या मात्यापित्यांना भेटले. मातामह उग्रसेन यांना कृष्णाने राज्यावर बसविले. मग ते दोघे बंधू सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिक्षणासाठी गेले . चौसष्ट दिवसात चौसष्ट विद्या आत्मसात करून त्या दोघांनी गुरुदक्षिणा म्हणून गुरूंना त्यांचा प्रभासक्षेत्री समुद्रात बुडून मेलेला मुलगा परत आणून दिला. हा ही कथा भाग खूपच छान आहे. तसेच अक्रूराला त्यांनी गोकुळात पाठवले. तिथली अवस्था काय आहे हे जाणून घेतले ..तेव्हाचे कृष्ण नसलेल्या गोकुळाचे वर्णन अगदी व्यथित करणारे आहे. नंतर कृष्णाने उद्धवावर अनुग्रह केला. ती कथा आहे. नंतर कुंतीची व धृतराष्ट्राची हस्तिनापुरला जाऊन भेट घेतली. तिथे त्याने धृतराष्ट्राला कृष्णाचा उपदेश सांगितला की “सम बुद्धीने वागावे” वगैरे!! पण धृतराष्ट्राने ते ऐकले नाही. तेव्हा अक्रूर परत मथुरेला गेला आणि त्याने धृतराष्ट्राचे वर्तन श्रीकृष्णाला सांगितले. इथे दहावा स्कंध समाप्त होतो. तसाच पाचव्या दिवसाचा कथा भागही संपतो.

पाचव्या दिवसाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर श्री विष्णूंच्या रत्नखचित किरीटाचे चित्र आहे. किरीट व मुकुट वेगळे असतात किरीट हा निमुळता, शिखरासारख्या आकाराचा तर मुकुट त्रिकोणी असतो. श्रीविष्णूंच्या मस्तकी दोन्ही दिसतात. त्याचे वर्णन श्री शंकराचार्यांनी केले आहे.

यत्र प्रत्युप्तरत्नप्रवरपरिलसद्भूरिरोचिष्प्रतान –

स्फूर्त्यां  मूर्तिर्मुरारेर्द्युमणिशतचितव्योमवद्दुर्निरीक्ष्या |

कुर्वत्पारेपयोधिज्वलदकृशशिखाभास्वदौर्वाग्निशंकाम्

शश्वन: शर्म  दिश्यात्  कलिकलुषतम: पाटनं  तत्किरीटम्  ||

सारांश — 100 सूर्यांच्या तेजाप्रमाणे तेज असलेले, संसार सागरातून बाहेर काढणारे आणि कलिकालाचा अंधार दूर करणारे श्री विष्णूचे हे किरीट आम्हाला शाश्वत सुख  ( मोक्ष )देवो.

|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments