श्री सुहास रघुनाथ पंडित
पुस्तकावर बोलू काही
☆ “बोल बच्चन” – लेखक : श्री रूपेश दुबे – अनुवादिका – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : बोल बच्चन
लेखक : रुपेश दुबे
अनुवाद : सौ. मंजुषा मुळे
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठे : १८८
मूल्य : रु. २५०/_
यशाची शिखरं गाठत जावं आणि तिथे कायम टिकून रहाव असं कुणाला वाटत नाही ? पण यश मिळवणं सोपं असतं का ? त्याचा पाठलाग करताना, ध्येय गाठताना अपयश आलं तर ? यशाचा मार्ग सोडून द्यायचा की खंबीरपणे पुढे जायचं ?
सौ. मंजुषा सुनीत मुळे
या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायचा पारंपारिक मार्ग म्हणजे उपदेश करणे. पण उपदेश ऐकून घेणार कोण ? त्यामुळे तेच कडू औषध आवडत्या गोड पदार्थांबरोबर दिल तर ? औषध सहज पचनी पडेल ना? नेमका हाच विचार श्री. रूपेश दुबे यांनी केला आहे.
श्री रुपेश दुबे यांनी सुमारे वीस वर्षे टेलिकॉम कंपनीत व्यवस्थापन क्षेत्रात उच्च पद भूषवून आता ते स्वतःचा व्यवसाय करत आहेत. ‘बोल बच्चन ‘ हे हिंदी भाषेतील पुस्तक त्यांनी लिहीले आहे. या पुस्तकाचा अनुवाद मराठीत सौ. मंजुषा मुळे यांनी केला आहे. हे अनुवादित पुस्तक अलिकडेच वाचून झाले. त्या पुस्तकाविषयी थोडसं.
काय आहे या पुस्तकात ?
अनुभवातून आलेले शहाणपण, सकारात्मकता आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम म्हणजे हे पुस्तक. यशाचा मार्ग दाखवणारा आणि अपयश पचवायला शिकवणारा मार्गदर्शक म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. मग इथे बच्चन म्हणजे अभिताभ बच्चन यांची काय संबंध असे वाटणे स्वाभाविक आहे. पण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कटू औषध पचवण्यासाठी, त्यावर गोड आवरण लावण्यासाठी बच्चनजींना आमंत्रित केलं गेलं आहे. अमिताभ बच्चन माहित नाहीत असा माणूस सापडणे विरळाच. त्यांचे चित्रपट व त्यातील भूमिका या तर प्रचंड गाजल्याच पण त्यांचे अनेक संवाद रसिकांना तोंडपाठ आहेत. त्यांच्यासाठी गायली गेलेली गीतेही लोकप्रिय झाली आहेत. याच लोकप्रियतेचा फायदा उठवून आपण जर काही सांगितले तर लोक सुरूवातीला उत्सुकतेपोटी आणि मग अधिक रस घेऊन वाचू लागतील असा विश्वास वाटल्यामुळेच लेखकाने हे तंत्र अवलंबले आहे. अमिताभजी यांनी प्रत्यक्ष जीवनात अनेक वेळेला अपयश पचवून यशाचे शिखर गाठले आहे. चित्रतटातील त्यांच्या बहुसंख्य भूमिका या संघर्षमय आहेत. त्यामुळे त्यांच्या तोंडून आलेले उद्गार, त्यांचे संवाद वाचकाला अधिक जवळचे वाटतात व मनाला जाऊन भिडतात.
लेखकाने या पुस्तकात यशाची १८ सूत्रे सांगितली आहेत. प्रत्येक सूत्र सांगण्यासाठी एक एक प्रकरण लिहिले आहे. या प्रकरणाला त्यांनी बच्चनजींचे प्रसिद्ध गीत किंवा संवाद शिर्षक म्हणून वापरले आहे. तेच शिर्षक का ठेवले आहे याचा उहापोह केला आहे. आपल्या प्रत्यक्ष जीवनात ते कसे लागू पडते हे उदाहरणे देऊन रंजकतेने पटवून दिले आहे. बोधकथेला तात्पर्य सांगावे त्याप्रमाणे लेखाच्या शेवटी लेखकाने चौकटीमध्ये एक अर्थपूर्ण असे वाक्यही दिले आहे. या वाक्याव्यतिरिक्त लेखातील अनेक वाक्ये सुभाषिताप्रमाणे वापरावीत अशी आहेत. त्यामुळे प्रत्येक लेख ज्ञान आणि मनोरंजन यांनी परिपूर्ण असा आहे.
फक्त एक उदाहरण पाहू. एका लेखाचं नाव आहे ‘ देखा एक ख्वाब ‘. अमिताभ बच्चन यांच्या सिलसिला या चित्रपटातील एका गीताचे सुरुवातीचे बोल. या गीताचा आधार घेऊन लेखकाने स्वप्न आणि सत्य यात असणारी तफावत कशामुळे असते त्याची कारणे शोधली आहेत. वास्तविकता काय असते त्याची जाणीव करून दिली आहे. मेहनतीशिवाय स्वप्ने पुरी होत नसतात. असामान्य यश मिळवणारी माणसं स्वप्नही असामान्य बघतात. उच्च बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रम
यामुळे ते स्वप्न पूर्ण करू शकतात. शेवटी वर उल्लेख केल्याप्रमाणे एका चौकटीत लिहीतात ” स्वप्न बघा, मोठी मोठी स्वप्नं बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःचा विचार, सामर्थ्य आणि सकारात्मकता या सगळ्या गोष्टींना एकाच दिशेने म्हणजे अर्थातच तुमच्या ध्येयाच्या दिशेने कार्यान्वित करा. “
अशाप्रकारे लेखाची मांडणी करून अठरा लेखांमधून यशाची अठरा सूत्रे सांगितली आहेत.
हे पुस्तक आपण मराठीतून वाचतो. पण सौ. मंजुषा मुळे यांनी अनुवाद करताना वापरलेली भाषा इतकी नैसर्गिक वापरली आहे की हा अनुवाद आहे असे वाटतच नाही. मराठीत वेगळ्या विषयावरचे पुस्तक आणल्याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.
सर्वांनीच, विशेषतः युवकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे असे वाटते. आयुष्याची जडण घडण करण्यासाठी ते नक्कीच उपयुक्त ठरेल.
पुन्हा एकदा अनुवादकर्त्या सौ. मंजुषा मुळे यांना धन्यवाद !
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈