सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही ?

☆ श्रीविठ्ठल आणि क्षेत्र पंढरपूर – संशोधनातून… लेखक व संपादक : वा ल मंजूळ ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

पुस्तक : श्रीविठ्ठल आणि क्षेत्र पंढरपूर – संशोधनातून

लेखक व संपादक : वा ल मंजूळ

प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन

वर्षानुवर्ष आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमणारा वैष्णवांचा मेळावा… ठिकठिकाणाहून निघणाऱ्या संतांच्या पालख्या… हे आपण पाहत आलो आहोत. कुठल्याही प्रकारचा खंड न पडता एखादी परंपरा जेव्हा अविरतपणे चालू राहते. तेव्हा त्यामागे निश्चितच काहीतरी अलौकिक शक्ती कार्यरत असते. मात्र ती शक्ती नक्की कशामुळे कार्यरत आहे ? हे समजण्यासाठी आपल्याला त्या परंपरागत स्थानाचे, आणि त्या परंपरेतील अनेक प्रचलित पद्धती, प्रार्थना, पूजा यांचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

मात्र यासाठी संशोधन आणि अभ्यास याची गरज आहे. एवढ्या वर्षाची परंपरा असलेल्या एखाद्या स्थानाचे तेथील परंपरांचे अभ्यास करणे हे येरा गबाळ्याचे काम नव्हे. आणि कोणा एकाचेही नव्हे. म्हणूनच अल्पकाळात आपल्या या परंपरेविषयी तीर्थक्षेत्राविषयी ज्या जिज्ञासूंना ही माहिती हवी आहे ती देण्यासाठी उत्कर्ष प्रकाशनाने

“श्री विठ्ठल आणि क्षेत्र पंढरपूर: संशोधनातून” हे वा.ल. मंजूळ लिखित आणि संपादित पुस्तक प्रकाशित केले आहे. महाराष्ट्रातील ‘वारी’ या दीर्घ परंपरेचे आकर्षण असणाऱ्या, कुतूहल असणाऱ्या  अनेक वाचकांना अगदी संक्षिप्त स्वरूपात आवश्यक ती सर्व माहिती पुरवणारे, अतिशय मार्गदर्शक असे हे पुस्तक आहे. 

या पुस्तकात एकूण 26 प्रकरणं आहेत. साधारणपणे प्रत्येक प्रकरणाची हजार ते दीड हजार शब्द संख्या आहे. दोन-तीन प्रकरणं कदाचित यापेक्षा विस्तृत असतील. पण ही सर्व प्रकरणं पंढरपूर क्षेत्र, त्याचं ऐतिहासिक कालापासूनचे महात्म्य, विठ्ठल आणि व्यंकटेश यांचा एकमेकांशी असलेला संबंध , साम्य आणि निरनिराळ्या संतांचा या क्षेत्राशी आलेला संबंध, भाविकांची या क्षेत्राकडे बघण्याची दृष्टी, परदेशी भाविक आणि त्यांचे पंढरपूरबद्दलचे मत, पंढरपूर क्षेत्रातला विकास आणि त्यासाठी असलेली आव्हानं, निरनिराळ्या ठिकाणाहून निघणाऱ्या वारी, वारीचा नकाशा, विठ्ठलाच्या वेगवेगळ्या कथा उपकथा, अशा निरनिराळ्या दृष्टिकोनातून लिहिली गेलेली आहेत.

प्रत्यक्षात वा.ल. मंजूळ यांनी घेतलेल्या मुलाखतींचं हे काहीसं संपादित लघुरूप आहे असं म्हणता येईल. यामध्ये कै. सेतू माधवराव पगडी, डॉक्टर रा. चिं. ढेरे, डॉ. शं. गो. तुळपुळे आणि म.म. पा.वा.काणे, डॉ. गुंथर सोन्थायमर, डॉ. अॅन फेल्डहौस अशा अनेक विद्वानांचा समावेश आहे. 

श्री विठ्ठल आणि व्यंकटेश यांचे मूळ एकच ? या सेतू माधवराव पगडी यांच्या मुलाखतीतल्या  संपादित प्रकरणात “श्रीविठ्ठल आणि व्यंकटेश” यांचं एकत्त्व सांगताना असं म्हटलं आहे की, “तमिळमध्ये पर्वताला ‘वेंडगम् ‘ म्हणतात आणि कानडीमध्ये ‘बेट्टा’ अगर ‘बेट्टर’ असे म्हणतात. तमिळ यात्रेकरू तिरुपतीच्या स्वामीला वेंगडेश म्हणायचे तर इतर यात्रेकरू विशेषतः कन्नड त्याचा उल्लेख ‘बेट्टरेश-बेट्टलेश (विठ्ठलेश)’असे करीत असावेत, यातूनच व्यंकटेश आणि विठ्ठल हे दोन्ही शब्द प्रसार पावलेले दिसतात. असा उल्लेख आहे. हे सांगताना विष्णुपुराण, स्कंदपुराण यांचा उल्लेखही केलेला आहे. 

“श्री क्षेत्र पंढरपूरचा इतिहास” या म.म.पां.वा.काणे यांच्या मुलाखतीतल्या प्रकरणात पंढरपूरच्या देवळाच्या स्थानाबाबत आणि रचनेबाबत उल्लेख आहे. यात असं सांगितलं आहे की, “पंढरपूर येथील मुख्य देवालय विठोबाचे असून ते पंढरपूर येथील पवित्र मानल्या जाणाऱ्या भागाच्या मध्यभागी आहे. विठोबाच्या देवालयाच्या मागील बाजूला विठोबाची पत्नी रुक्मिणी हिचे देवालय आहे. विठोबाच्या अनेक सेवेकऱ्यांपैकी मुख्य सेवेकऱ्यांना ‘बडवे’ म्हणतात. आणि न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ते देवालयाच्या मिळकतीचे आणि देवाच्या दागिन्यांचे विश्वस्त आणि संरक्षक आहेत. इतर सेवाधार्‍यांमध्ये पुजारी, बेगारे, परिचारक, हरिदास, डिंगरे, दिवटे, डांगे असे निरनिराळे प्रकार असून त्यांनी करावयाची कामे ठरवून दिलेली आहेत. रुक्मिणीच्या सेवेकऱ्यांचा एकच वर्ग असून त्यांना ‘उत्पाद’ असे म्हणतात. 

विठोबाच्या मूर्तीबाबतही येथे माहिती आहे, ती पुढील प्रमाणे- “विठोबाची मूर्ती सुमारे तीन फूट नऊ इंच उंचीची असून ती बैठकीसह एकाच अखंड दगडापासून घडवली असावी असे दिसते. विठोबाची मूर्ती हाताचे कोपरे वर करून आणि कमरेवर हात ठेवून उभी आहे. मूर्तीच्या मस्तकावर उंच आणि वरती वाटोळा असणारा मुकुट आहे. पुजारी आणि सामान्य लोक ते शिवलिंग असल्याचे मानतात.”

याच प्रकरणात हेमाग्रीच्या ग्रंथातील तीर्थाविषयीच्या कथेचा उल्लेख केला गेला आहे. त्यात विठोबा आणि कृष्ण यातील संबंध दाखवला आहे. ती कथा अशी, “भैमी नदीच्या दक्षिणतीरावर एक अतिउत्तम तीर्थ आहे. आणि त्या ठिकाणी एक अत्यंत दुर्मिळ अशी उत्कृष्ट मूर्ती आहे. त्या तीर्थाला पौंडरीक क्षेत्र म्हणतात आणि त्या ठिकाणी सर्व देवातील श्रेष्ठ पांडुरंग वास्तव्य करितो. पुंडरीकाने 28 व्या कल्पामधील व्यापार युगाच्या अखेरीला घोर तपश्चर्या केली आणि आपल्या मातापित्याची अत्यंत भक्तीपूर्वक सेवा केली. भगवान कृष्ण गोवर्धन पर्वतावर गाई चारीत होता. तो पुंडलिकाच्या पितृभक्तीने संतुष्ट झाला. त्यावेळी कृष्णाने गायी हाकण्याकरिता हातात काठी घेतली होती. त्याच्या मस्तकावर मुकुट होता. हातात एक गोफण होती. दंडात रत्नखचित बाहुभूषणे होती, कंबरेला गुह्यसूत्र वेष्टलेले होते आणि तीन पदरी कंबरपट्टा होता. त्याने आपले दोन्ही कोपरे वर करून हात कमरेवर ठेवलेले होते. त्याच्या पोटाला तीन वळ्या असल्याचे दिसत होते. ” असे उल्लेखलेले आहे. 

“पांडुरंगा संबंधी संशोधनातील काही नवी माहिती” या प्रकरणात डॉक्टर रा. चिं. ढेरे यांच्या मुलाखतीतली एक गोष्ट मला विशेष रंजक वाटली. ती म्हणजे, “पंढरपुरात भाजी मार्केटजवळ ताकपिठ्या विठोबा देवस्थान आहे. पूर्वी बडव्यांपैकी एक स्त्री भक्त श्रद्धेने श्री विठ्ठलाला लाह्यांचे पीठ व ताक कालवून नियमाने नेऊन देत असे. पुढे त्या भक्ताच्या सोयीसाठी श्री विठ्ठल तिच्या घरी आला तोच हा ताकपिठ्या विठोबा!” हे विठोबाचे स्थान विशेष महत्त्वाचे आहे. 

“विठ्ठल गजरी दुमदुमली पंढरी” या संतांनी अभंग रूपे गायलेल्या पंढरीचे महात्म्य अतिशय सुंदर शब्दांत वर्णिलेले आहे. यामध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत चोखोबा, संत कान्होबा, संत भानुदास, संत सावता माळी, संत सोपान देव अशा निरनिराळ्या संतांनी त्यांच्या लेखी असलेले पंढरीचे माहात्म्य आणि त्यांचे पंढरीशी असलेले नाते भक्ती याचे सुरेख वर्णन केले आहे. 

“पंढरपुरातील नवरात्र आणि दसरा” या प्रकरणांमध्ये पंढरपुरातील पद्मावती, यमाई, तुकाई, अंबाबाई इत्यादी देवालयांचे स्थान महात्म्य आणि तेथील सणासुदीचे स्वरूप सांगितलेले आहे. 

“श्रीविठ्ठलाचे नित्योपचार” हे प्रकरण मला अतिशय रंजक वाटले याचे कारण यामध्ये विठ्ठलाची पूर्ण पूजा, ती पूजा करणाऱ्या सेवाकऱ्यांचीच सर्व माहिती इत्थंभूत पणे दिलेली आहे. या सेवेकरांबद्दलची थोडक्यात माहिती अशी, “विठ्ठलाची सेवा करणारे सात प्रकारचे सेवाधारी आहेत. त्यांच्या पिढ्या आलटून पालटून वर्षाच्या अंतराने सेवा करतात. त्यांना ‘सालकरी’ म्हणतात.”

आता आपण या सालकारांची नावे व कामे पाहू… देवाच्या पूजेसाठी गरम-गार पाणी आणणारे ‘परिचारक’, देवापुढे पंचपदी गाऊन आळवणारे देवाचे भाग ‘हरिदास’, देवाचा पोशाख झाल्यावर देवास आरसा दाखविणारे ‘डिंगरे’, देवाच्या समोर कायम हाती रुप्याची काठी घेऊन चोपदाराप्रमाणे उभा राहणारा देवाच्या भालदाराला ‘डांगे’, हातामध्ये तेलाची दिवटी बुधली घेऊन देवाच्या उपचाराचे पूजा स्नानाच्या वेळी दिटीने प्रकाश दाखविणारे ‘दिवटे’, देवाची पूजा मंत्र युक्त उपचाराने वेळी मंत्र म्हणणारे ‘बेणारे’ असे हेच सात सेवाधारी दिवसभर विठ्ठलासमोर असतात. विठ्ठला शेजारी बसून उत्पन्न घेणारे बडवे ‘दिवसकरी’ होत. श्री विठ्ठलाची दिवसभरात एकूण सहा वेळा पूजा केली जाते यालाच नित्य उपचार किंवा राजभोग म्हणतात. या पूजेचे साद्यंत वर्णन या प्रकरणात वाचायला मिळते. जणू आपण पूजास्थानी उपस्थित असल्याचा भास होतो. 

“पंढरपूर वारी समाजशास्त्रीय अभ्यास” या डॉक्टर वसुधा ठाकूर यांच्या प्रबंधातील प्रस्तावने मधील काही भागही या पुस्तकात समाविष्ट केला आहे त्यामध्ये निरनिराळ्या मराठी आणि इंग्रजी साहित्यिकांनी वारीबद्दल केलेले उल्लेख आणि तिचे माहात्म्य अगदी संक्षिप्त स्वरूपात सांगितलेले आहे. 

यातील प्रा. जॉन स्टॅन्ले यांचा पांडुरंगाबद्दलचा उल्लेख मला विशेष जिव्हाळ्याचा वाटला. ते म्हणतात, “जो देव आपल्या घरीही स्थिर नव्हता. तोही मनुष्य भक्ती पाहून स्थिर झाला आणि युगानुयुगे तिष्ठत राहिला.” याखेरीज दुर्गा भागवत, दिलीप चित्रे, भानुदास महाराज देगलूरकर यांचे वारीबद्दलचे मत यात दिले आहे. 

एकूण पंढरपूर महात्म्य आणि श्रीविठ्ठल यांबद्दल आपली जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देते. 

सर्व प्रकरणांचा उल्लेख आणि त्यातील काही निवडक गोष्टी लेखाच्या विस्तार भयामुळे इथे देता येत नाही. परंतु या पुस्तकाची अनुक्रमणिका मात्र मी इथे मुखपृष्ठाबरोबर शेअर करत आहे. 

ज्यांना वारीला जाण्याची इच्छा आहे. ज्यांना विठ्ठल भक्तीबद्दल उत्सुकता आहे. अशा सर्व आस्तिकांनी आणि या सर्व परंपरांकडे कानाडोळा करणाऱ्या नास्तिकांनी देखील आवर्जून वाचावे, विचार प्रवृत्त व्हावे असे हे संशोधनात्मक लेखन आहे. 

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने हे पुस्तक वाचून याबद्दलची थोडी माहिती विठ्ठल सेवा म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. 

धन्यवाद ! 

परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments