प्रो. भारती जोगी
पुस्तकावर बोलू काही
☆ काव्यसुधा (काव्यसंग्रह) – कवी : चिंतामणी ज. भिडे ☆ परिचय – प्रो. भारती जोगी ☆
पुस्तक : काव्यसुधा (काव्यसंग्रह)
कवी : चिंतामणी ज. भिडे
मुद्रक— आसावरी इंटरप्रायझेस, ठाणे.
मूल्य– ₹ १००/-
‘काव्य सुधा ‘ हा श्री. चिंतामणी ज. भिडे लिखित, काव्यसंग्रह माझ्या हाती आला तो आंतरजालाच्या माध्यमातून! एका समूहावर नेहमीच होणाऱ्या, एका खास बाजाच्या, वैशिष्ट्यपूर्ण लहेजातल्या, काव्य सुधा सिंचनाचा आनंद घेणारी मी! मला सतत तो सुधाघट काठोकाठ भरलेला बघण्याची इच्छा! आणि एक दिवस तो काव्यसुधा संग्रह, अचानक माझ्या हाती आला… तो ही हवेतून… स्पीड पोस्टाने (मारूत तूल्य वेगम् ) असाच!
हा काव्यसंग्रह हाती आला. सवयीने आधी मुखपृष्ठावर नजर गेली. कारण मुखपृष्ठ आरसा असतं त्या-त्या साहित्य कृतीचा! माझ्या दृष्टीस पडलं ते एक सुंदर असं… पूर्ण विकसित, उन्मिलित झालेलं… कमल पुष्प! आणि शीर्षस्थानी ‘ काव्यसुधा ‘ हे शीर्षक, एकेरी अवतरण चिन्हांत, मोठ्या दिमाखात विराजमान झालेलं!
वाटलं की… नक्कीच श्री. भिडे यांच्या मनातील विविध रंगी विचारांच्या पाकळ्या, त्यांच्या शब्दांतील, काव्य अमृताच्या सिंचनाने, अंग-प्रत्यंगाने उमलून आल्या असाव्यात. आणि मग त्याचाच हा अमृत कलश… काव्यसुधा!!
पुस्तकाच्या प्रस्तावनेला लाभलेला ; श्री. वामन देशपांडे यांचा शब्द स्पर्श अतिशय अभ्यास पूर्ण !! अर्वाचीन मराठी कवितेच्या आजवरच्या प्रवासाची वळणं थेट नव्या रूपापर्यंत आणून… चिंतामणी भिडे या कविच्या कविता लेखनाचं सुंदर रूप विशद करणारा!! तसेच… प्रा. डॉ. अनंत देशमुख यांचं… कवीच्या निवडक अशा, मनात ठसलेल्या, मनाला भिडलेल्या कवितांचं भाव भरलं असं अभिप्रायी मनोगत वाचायला मिळतं. तसेच प्रदीप गुजर यांचंही… भिडे यांच्या कवितेतले, मन तृप्त करणारे पैलू उलगडणारा अभिप्राय ही आस्वादायला मिळतो.
संग्रहाची… मलपृष्ठावरील पाठराखण केलीयं… श्री. प्रभाकर शंकर भिडे यांनी! ‘ अल्पाक्षर रमणीयता ‘ अगदी भिडेंच्या मैत्रीच्या रंगात रंगून, एकरंग झालीये जणू!!
‘काव्यसुधा’ या काव्यसंग्रहात जवळपास ६५ कविता समाविष्ट आहेत. त्यात “फुल्ल कुसुमितं, द्रुमदल शोभिनिम्! ” हीच अनुभूती येते. कवीने रोजच्या जगण्यात, आसपासच्या जगतात, जे जे संवेदनशील मनाने आणि वृत्तीने बघितलं, अनुभवलं, जाणवलं, टिपलं… ते ते सगळं त्यांच्या कवितांमध्ये स्पष्ट, नितळ आणि पारदर्शीत्व घेऊन उमटलयं!
त्यांच्या कवितांमध्ये, राजकीय, सामाजिक, पौराणिक, राष्ट्रीय अशा विषयांवरील उपहासात्मक, उपरोधिक भाष्य, मातृभाषा प्रेम, यावरील तळमळीची व्यक्तता दिसून येते. त्या-त्या वेळी घडलेल्या, चर्चा रंगलेल्या, न्यूज चॅनेलचा टी. आर. पी. वाढविणा-या घटना, त्यावर कवीने केलेलं भाष्य अगदी… स्पष्ट, परखड!
कवीच्या लेखन शैलीचं… अगदी खास, त्यांचंच म्हणावं लागेल, ज्यावर त्यांचीच नाममुद्रा ठसवावी… इतकं वैशिष्ट्यपूर्ण, वैशिष्ट्य… म्हणजे.. त्यांच्या कवितांची शीर्षके आणि श्लेषात्मक अनुभूती देणारे शब्द!!
कवी ते-ते शब्द () कंसात विराजमान करून, त्यांचा योग्य तो अर्थ लावून, यथोचित सार्थकता प्रदान करण्याचं स्वातंत्र्य मात्र, सुजाण, समजदार वाचकांवर सोपवून टाकतात. ही सूचकता भिडेजींच्या कवितेत, ठायीं-ठायी आढळते.
ऑक्टोबर हीट ही पहिलीच कविता… मी टू च्या चर्चेनं तापलेल्या वातावरणाची धग थेट पोहोचवणारी. आणि… सहावं इंद्रिय जागृत असलेल्यांना विचारलेल्या प्रश्नातल्या उपरोधाने बोच ही अगदी जाणवणारी….
“शोषण झालं हे कळायला,
त्यांना इतकी वर्षे लागली?… ! “
मतदार ( राजा )? या रचनेतली एका संवेदनशील मनाची तळमळ बघा…
” सत्तेची आसुरी लालसा, पैशांचा सारा खेळ,.. शेतक-यांचे अश्रू पुसायला आहे कुणाला वेळ? “
बळी (राजा) ची हार या कवितेतही, शेतकरी बांधवांविषयीचा कळवळा जाणवलेल्या ओळी…
“अनीती, अधर्म, कपटाने
पुन्हा अभिमन्यु ला घेरला।
जिंकले गलिच्छ राजकारण
गरीब शेतकरी मात्र हरला. “
कोविड काळातील सत्य घटनेवर आधारित रचना, ख-या समर्पणाची किंमत न ओळखणा-या पत्रकारितेवर उपरोध किती बेधडकपणे बघा…
“रुग्णशय्या आपुली देती एका गरजू तरूणाला,
वयोवृद्ध ते नारायणराव, कवटाळिती मृत्यूला!
समर्पणाच्या भावनेची मांडलिकांना काय महती?
मिंधी झाली पत्रकारिता, अनीती हीच असे नीती! “
कवीने … उपेक्षित, सपूत… यांसारख्या रचनांतून, लालबहादूर शास्त्रीजींच्या कार्याचा गौरव करून, ते सपूत असूनही, एकाच तारखेला जन्मले असूनही, महात्मा गांधींच्या तुलनेत कसे दुर्लक्षित, उपेक्षित राहिले याची खंत ही व्यक्त केली आहे…
जन्मले दोघे एकाच दिवशी,
मृत्यू ही तितकाच अनपेक्षित।
आजही जयजयकार एकाचा
दुसरे कायम उपेक्षित|
देवपण या कवितेत तर… एक काळा दगड आणि विठ्ठल यांत संवाद दाखवून…
“एकदा एक दगड काळा, गेला विठ्ठलाच्या देवळात…
म्हणे,
” अरे विठ्ठला, दोघे आपण काळे कुठे आहे फरक?
मला बी उभं रहायचयं इथे, जरा तू सरक! “
मग पुढे काय झाले, ते कवितेत वाचण्यातंच खरा आनंद! आणि मग मिळालेला बोध… “सोसल्याविना टाकीचे घाव, कधी मिळतं का देवपण!
काही रचनांमध्ये कवीची गाव, गावपण, बारा बलुतेदार, यांविषयीची आस्था, कळकळ, हळूहळू ओस पडत गेलेली गावं, याचं ही अतिशय भावपूर्ण चित्रण बघायला मिळतं.
” गावाचं ‘गावपण’ गेलं,
‘हायवे’ वरून पुढे,
पहिली, दुसरी पिढी
आता मनातच कुढे. “
तसंच… बारा बलुतं या रचनेत.. कालौघात गडप होत चाललेल्या बारा बलुतेदारांतील, सुतार, लोहार, न्हावी, मोची, शिंपी… यांच्या भेटीची कल्पना करून, त्यांच्या मनातल्या भावना जाणून घेत… आपल्या खास… शाब्दिक कोटी करण्याच्या शैलीचा साज चढवून, जो एक वेगळाच बाज आणलायं ना, तो खरंच वाचनीय!
बघा की… सुतार म्हणतोय…
थोडीच आहेत कामं,
पण करवतच नाही.
रेडिमेड मुळे संपत चाललेला शिंपी म्हणतोय…
आभाळंच फाटले
किती लावू ठिगळं?
असे शब्दच्छल आणि त्यातला मतितार्थ,… कवी जणू सांगतो… शोधा म्हणजे सापडेल.
भिडेंच्या काही कविता मिश्किलीच्या रुपांत ही वावरत आहेत संग्रहात!
कवी आणि कविता या कवितेत…
कवीने मित्राशी संभाषण दाखवून… विनयशील आणि जमिनीवर असण्याचा छान पुरावा दिलायं..
म्हणतोयं… “आम्ही म्हणजे उगीच आपलं वासरात लंगडी गाय शहाणी”!
कवीची वैशिष्ट्ये सांगतांना म्हंटलयं…
” खरे कवी ते, व्यासंग फार ज्यांचा, अन् नाचे जीभेवर सरस्वती।
ओघळती शब्द त्यांचे, जसे तुटल्या सरातून मोती! “
असे त्यांचेच शब्द मोती झरतांना बघायला मिळतात त्यांच्या मैतर नावाच्या पंचाक्षरी कवितेत. असेही काही टपोरे, पाणीदार मोती ओवले आहेत त्यांनी!
कवी सांगतोयं… मैत्रीचं नातं, ना त्यापेक्षा ही पुढं, सहज आणि…
नात्याहून ही मैतर खोल!! फक्त खोली ओळखता आली पाहिजे.
कवितेबद्दल च्या भावना आणखी एका कवितेत व्यक्त करून कवी म्हणतोयं,
” साहित्य देई मुक्त प्रांगण,
शब्दांची करा अशी गुंफण
कविता व्हावी मनी गोंदण
कवी भिडे यांनी निसर्गाचे भानही राखलयं! त्याच्या निसर्ग प्रेमाला फुटलेली पालवी, आलेला बहर, आणि झालेला वर्षाव चिंब भिजवतो आणि…
” विविध रंगांनी
नटली अवनी
फुटते पालवी
वठलेल्या मनी|”
‘मातृभाषा *दीन…’ ही कविता, कवीला मातृभाषा दीन झाल्याचं दु:ख, वैषम्य, याची भावपूर्ण जाणीव करून देणारी!
“करंटे आम्ही असे, केले मातृभाषेस दीन
तरीही दरवर्षी सजतो आमचा मराठी भाषा दिन!
हे आणि असे विडंबन विविध रचनांमध्ये आढळते आणि आपण ही मग विचार करायला प्रवृत्त होतो. कवीच्या सहज, सोप्या पण परिणामकारक शब्दांमध्ये हे सामर्थ्य सतत जाणवंत रहातं.
आम्ही कोण?, मुक्ताफळे, अहिंसेचा खिडकी, स्वातंत्र्याचे मोल… यांसारख्या विडंबनात्मक रचना, त्यातल्या उपहासाची बोच ; त्यामागचा उद्देश, नंतरही लक्षात रहाणारा!
निवृत्ती नंतर… या कवितेत, कवीच्या मिश्किलीला, वात्रटिकेची झालर जोडलीयं! निवृत्ती नंतर…
” लवकर उठावे, चहा करावा,
आपलाच नव्हे तर सर्वांचा ठेवावा
चहा घेऊन बाहेर पडावे
मोबाईल ही जवळ ठेवावा
धडपडल्यास उपयोग व्हावा
सौंदर्य दर्शन जरी कां घडेल,
वळून न पहावे, मान अवघडेल!”
किती सहज, हलक्या फुलक्या शब्दांत दिलेला हा इशारा, आणि निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखाचं जावं म्हणून सांगितलेले सूत्र! हे असे, वरून अगदी साधे वाटणारे, हसत-खेळत घेतलेले चिमटे, दिलेल्या कानपिचक्या… भिडेंच्या कवितेत अगदी… भीडेचीही, भीड न बाळगता, निर्भिडपणे घेतलेल्या आढळतात… आणि आपण ही मग, अगदी उगीचच भिडस्तपणा दाखवत, गालातल्या गालांत हसत…
“आपण नाही बुवा! “… असं म्हणंत पुढे जातो. इथेच तर कवीच्या काव्यलेखनाची जीत होते, उद्देश पूर्ण होतो. लिखाणाचं चिज होतं!
कवीने, ” अध्यात्मास थोडे स्थान द्यावे ” म्हणत… काही रचनांना अध्यात्माचा स्पर्श देत…
“मना पहावे, ‘आपणांसी आपण’
न लागे तयाला कोणताही दर्पण
घेता रामनाम मनी वा वैखरी
आत्माराम शोधू मनाच्या गाभारी”
असं म्हणत… नाम महात्म्यही विशद केले आहे.
पुढे त्यांनी मुक्तीचा मार्ग ही शोधून काढला…
” भजतो तव सगुण रूपा,
निर्गुण निराकारा!
तुझ्या विना कोण सोडवी,
जन्म-मृत्यू चा फेरा? “
शेवटी… “अव्याहत चालला तुझाच शोध,
द्यावी मुक्ती मज, व्हावा आत्मबोध! “
असाही एक सुंदर विचार रचनांमध्ये आढळतो.
विविधतेतलं सौंदर्य, त्यातलं लावण्य मांडतांना कवी, कव्वालीचाही वाली झालाय ;हे विशेषच ना!!
आईचं ऋण ही व्यक्त केलयं आणि भावपूर्ण जाणीव करून दिली आहे…
“नको तिला कौतुक सोहळे,
नको तिला मातृदिन!
ऋणात निरंतर रहावे तिच्या,
प्रेमाविना ती होईल दीन… “
शेवटी मनाचे यान आत्मबोधाकडे वळवत… “मन हारता होई हार, मन जिंकता जीत! “… हे सुवचन रूजवत, स्थिरावलयं!!
असं हे काव्यसुधा सिंचन, त्यातल्या प्रत्येक थेंबातलं, नितळ, स्वच्छ, पारदर्शी असं साधेपणातलं, एक वेगळंच सौंदर्य लेऊन झालयं! त्या-त्या वेळी मनांत आलेल्या विचार किरणांच्या परावर्तनाने, त्या थेंबांना, जे… कविता, वात्रटिका, विडंबन, पंचाक्षरी, षडाक्षरी, उपहास, उपरोध, देशभक्ती, मातृभाषा प्रेम, अध्यात्म, निसर्ग भान, मैत्री भावाची जाण, राजकीय हालचालीं चा उहापोह, त्याबद्दलचा उद्वेग,…. हे आणि असे… इंद्रधनूचे रंग, त्याच्या विविध छटांचा आनंद घेण्यासाठी आणि, साध्याही विषयांत आढळलेला मोठा आशय, गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी… यांतलं अर्थाचं मोठेपण आणि खोली, जाणून घेण्यासाठी तरी एकदा हा काव्यसंग्रह वाचायलाच हवा.
श्री. चिंतामणी भिडे यांना या निवडलेल्या, वेगळ्या वाटचालीसाठी, पुढील अशाच, तैल विनोद बुद्धीच्या, सूक्ष्म निरीक्षणातून, शब्दच्छलाचा निर्भेळ आनंद देणा-या रचनांचे सृजन करण्यासाठी शुभेच्छा!
परिचय – प्रा. भारती जोगी
पुणे
मो ९४२३९४१०२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈