श्री प्रसाद साळुंखे  

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “फिनिक्सच्या राखेतून उठला मोर” (कथासंग्रह) – लेखक : श्री जयंत पवार ☆ परिचय – श्री प्रसाद साळुंखे  ☆

पुस्तक : फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)

लेखक – श्री जयंत पवार

प्रकाशन – लोकवाङ्मय गृह

मागे एक एकांकिका लिहित होतो. चाळीत घडणारी कथा होती. आणि त्याला गिरणी संपाचा चुटपुटता स्पर्श होता. तेव्हा वाचन वाढव असा सल्ला देणाऱ्या मित्रांमध्ये ‘ फिनिक्सच्या राखेतून उठला मोर ‘ या जयंत पवारांच्या कथासंग्रहाचं नाव वारंवार येत होतं. मी मात्र आपलं घोडं दामटवून अधाशासारखी एकांकिका खरडली. मित्राला पहिला खर्डा दाखवणार तोपर्यंत त्याचा अपघातात दुर्दैवी अंत झाला, मग इतर कोणाला द्यायची नाही असं ठरवलं.

हे सगळ पटपट उफाळून यायचं कारण म्हणजे त्या दिवशी किताबखानाला हा कथासंग्रह पाहिला. डोक्यात हे सारं घोळत असताना आपसूकच हात या कथासंग्रहाकडे गेले आणि मी तो पदरी पाडून घेतला. जयंत पवार हे नाव नाट्यरसिकांच्या परिचयाचं. पण कथासंग्रह वाचल्यावर आपल्याला कथाकार म्हणूनही ते तितकेच भावतात. म्हणजे नाट्यसंहिताच थोडी उणी अधिक वाक्य टाकून कथेचं लेबल लावून पेश केलीय असे नाही. कथा रचनेचा समर्थ वापर जयंत पवार यांनी केलेला आढळतो. कथाकार म्हणून त्यांची कथाकथनाची शैली अफलातून आहे.

पुस्तकाची पहिली आवृत्ती जुलै २०१० ला प्रकाशित झाली. या कथासंग्रहात २००२ पासून २००९ पर्यंतच्या जयंत पवारांच्या वेगवेगळ्या अंकात प्रसिद्ध झालेल्या सात कथा आहेत. यातूनच समजते की कथालेखन अभ्यासूपणे आणि गांभीर्याने केलेलं आहे. केवळ दिवाळी अंकांच्या आग्रहाखातर केलेलं हे लिखाण नाही. तसंही असं लिखाण आतून स्फुरावं लागतं. अनुभवाची सरमिसळ त्यात असते, वाचनाचा व्यासंग असतो, मग त्यावर कोणाचाही आग्रह चालत नाही अगदी स्वतःचाही. तर अशा फार गडबडीने न लिहिता संवेदना वेचत, आयुष्याच्या अनुभवांच्या, कल्पनांच्या हलक्या धगीवर निवांत मुरू देत बनलेल्या ताज्या कसदार कथा आहेत.

‘टेंगशेंच्या स्वप्नातील ट्रेन’ या पहिल्या कथेपासून हा प्रवास सुरू होतो. या कथेत जगण्यातलं बोटचेपं धोरण, व्यवस्थेच्या दडपणात अंकुरलेला आणि फैलावलेला मध्यमवर्गी षंढपणा आपल्याला दिसतो. ज्यावर कथा, ललित काही लिहिलं किंवा आजच्या भाषेत फेसबुकवर किंवा अन्य सामाजिक प्रसार माध्यमावर माफक हळहळलो म्हणजे “मी त्यांचा भाग नाहीए हं” हा भंपकपणा अधोरेखित होतो.

नंतर आपण ‘साशे भात्तर रुपयांचा सवाल अर्थात युद्ध आमचे सुरू! ‘ कथा वाचतो. ज्यात एका हिशोबाच्या गैरसमजामुळे दोन समाज एकमेकांना हिशोबात ठेवण्याचं प्रयत्न करतात, पण त्याच्या या कुरघोडीत कोणाचा फायनल हिसाब होतो हे वाचणं रंजक वाटतं.

नंतर ‘ फिनिक्सच्या राखेतून उठला मोर ‘ ही कथा आपण वाचतो ही कथा गिरणी संपावर बेतली आहे. ज्यात गिरणी कामगारांच्या कुटुंबावर भाष्य आहे. फिनिक्स मॉलचा झगमगाट यांच्या आयुष्यातला अंधार घालवू शकणार आहे का? तिथला एसी भूतकाळातील जखमांवर थंडावा देईल का? तो चकचकीतपणा स्वप्नांवरची वास्तववादी धूळ फुंकेल का? अशा कोंदटवाण्या प्रश्नांवर आपल्याला विचार करायला ही कथा भाग पाडते. भूतकाळ आणि वर्तमानकाळ अशी कथा सफाईने फिरत राहतो त्यामुळे पात्रपरिचय, पात्राचे निरनिराळे पैलू आपल्याला पाहता येतात.

‘जन्म एक व्याधी’ नावाची एक कथा आहे. ज्यात कथेचा निवेदक घरातले छोटे मोठे कलह काही त्याच्या डोळ्यासमोर घडलेले तर काही घरातल्यांकडून ऐकलेले सांगत राहतो. हे सांगणं फार नाट्यपूर्ण आहे. एखादा सुधारणाप्रिय माणूस आपल्या चुकांवर मात करून सुधारु शकतो का? का त्याची भूतकाळाची लेबलं लोक आपल्या सोईसाठी वापरतात, असे बरेच विचार ही कथा वाचताना येतात.

मग पुढची गोष्ट म्हणजे ‘ चंदूच्या लग्नाची गोष्ट अर्थात सड्डम में टढ्ढुम ‘ ही माझी या कथा संग्रहातील सगळ्यात आवडती कथा. ही कथा खुसखुशीत आहे. कथानायक (? ) चंदू जवळपास मन जिंकून घेतो आहे. त्याच्या वात्रटपणाकडे आपण सुरुवातीला डोळेझाक करतो. पण कथा जसजशी पुढे सरकत जाते तसतसं आपलं मतपरिवर्तन होतं. आपण जवळपास चंदू होऊन जातो. एवढे गुंतून जातो की कपाळावरच्या आठ्या चंदूला ‘अरे नको करू’ असं बजावत राहतात. या कथेवर कोणी चित्रपट काढला तर धमाल होईल, म्हणजे कलाकारांची उत्तम भट्टी जमली तर फर्स्ट हाफ तरी अफलातून होईल.

नंतर सुरू होतो ‘एका रोमहर्षक लढ्याचा गाळीव इतिहास’ थेट पुन्हा गिरणी संपाची पाश्र्वभूमी. बाहेर गिरणी संपाचा लढा तर चाळीत चाळीतल्या संडासावर ताबा मिळवण्याच्या कुरघोड्या अशा दोन घटना आपण समांतर पाहतो. संपाच्या लढ्याचा वेदनादायी निकाल बहुतेकांना माहितीच आहे पण या चाळीतल्या दुसऱ्या तुंबळ युद्धाचं नेमकं काय होतं यासाठी ही कथा वाचावी लागेल.

सातवी म्हणजे अगदी शेवटची कथा म्हणजे

‘छटाकभर रात्र आणि तुकडा तुकडा चंद्र ‘ आयुष्याच्या छटाकभर रात्री ज्यांनी बारमध्ये घालवल्या त्यांना तुकड्या तुकड्यात दिसलेल्या एका चंद्राविषयी हे लिहिलं आहे. तीन कवी आणि एका गूढ कथा लेखकाच्या आसपास ही कथा फिरते. एकच गोष्ट त्यांना निरनिराळी दिसते, सत्याचा शोध घेत घेत अंतिम सत्य उरते ते म्हणजे मृत्यू. या कथेत नेमका निवेदक कोण याचा गल्लत होते आणि तळटीप वाचून तर गुंता अधिकच वाढतो. ही कथा वाचून मी प्रस्तावनेकडे वळलो काही तिरबागडं लिहिलं जाऊ नये म्हणून.

निखिलेश चित्रे यांची प्रस्तावना अत्यंत अभ्यासूपणे लिहिली आहे. आणि खरोखर वाचतांना किंवा वाचल्यानंतरही आपल्याला उमगलेल्या अर्थाचा पडताळा करण्यासाठी ही विस्तृत आणि मुद्देसूद प्रस्तावना कथेतल्या वास्तवाच्या भावनिक दाहावर फिरणारं हळुवार मोरपीस ठरतं.

सात कथांचे सात सूर वेगवेगळ्या संवेदनांना हात घालतात. पण सूरांना घट्ट पकडून ठेवलेल्या या कथा एका भन्नाट मैफलीचा आपल्याला आनंद देतात. या राखेतून उठलेल्या मोरपिसाऱ्यात आयुष्याच्या वेगवेगळ्या छटा दिसतात, ज्यामुळे कधी विचारांचं काळोखं मळभ दाटतं, तर कधी आतल्या पडझडीत काहीतरी संततधार चिंब कोसळत राहतं.

परिचय : श्री प्रसाद साळुंखे

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9664027127

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments