श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “राजधुरंधर ताराराणी” -लेखक : श्री राजेंद्र घाडगे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : राजधुरंधर ताराराणी
लेखक: राजेंद्र घाडगे
पृष्ठ: २५२
मूल्य: ३७५ ₹
छत्रपती शिवरायांच्या ज्येष्ठ स्नुषा महाराणी ताराबाईसाहेब यांनी आपल्या कुशल नेतृत्वाच्या बळावर मोगल सम्राट औरंगजेब याच्याविरुद्ध दिलेला लढा हा जगाच्या इतिहासातील एक देदीप्यमान लढा म्हणून ओळखला जातो. ताराबाईच्या या कामगिरीस जगाच्या इतिहासात खरोखरच तोड नाही. परकीय शत्रू मुगल सम्राट औरंगजेब, त्याचबरोबर स्वकीय शत्रू छत्रपती संभाजीपुत्र शाहूराजे आणि नानासाहेब पेशवा यांच्याविरुद्ध ताराबाईंचा झालेला राजकीय संघर्ष हा खरोखरच अभ्यासाचा विषय आहे.
महाराणी ताराबाईंनी हिंदवी स्वराज्यरक्षणासाठी केलेला संघर्ष, त्यांचे बौद्धिक गुणकौशल्य, धैर्य, राजनीतिकौशल्य, स्वराज्यनिष्ठा, नेतृत्वगुण आदी गोष्टी इतिहासप्रेमींना या पुस्तकातून जाणून घेता येतील सध्याच्या काळात भले तलवारींच्या जोरावर लढाया होत नसतील; परंतु राजकीय, सामाजिक आणि प्रसंगी कौटुंबिक परिस्थितीवर मात करतानासुद्धा मनुष्याचे नीतिधैर्य किती मजबूत असले पाहिजे, तसेच आपण आपला स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा, नैतिकता कशी जोपासली पाहिजे, याची शिकवण ताराबाईंच्या या जीवनचरित्रातून आत्मसात करता येईल आणि म्हणूनच महाराणी ताराबाईंचे हे चरित्र घराघरांत आणि मनामनांत पोहोचले पाहिजे, असे वाटते.
ठळक वैशिष्ट्ये
१) दुर्मीळ अशा असंख्य संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून लिहिलेले पुस्तक.
२) लेखकाचे अभ्यासात्मक विवेचन,
३) ताराबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा निपक्षपातीपणाने घेतलेला आढावा.
४) एक पराक्रमी स्त्री म्हणून ताराबाईच्या व्यक्तिमत्त्वाला आणि प्रतिभेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयन.
५) नव्या जुन्या पिढीतील सर्व इतिहासप्रेमीसाठी एक अतिशय वाचनीय असा हा खास ग्रंथ.
लेखकाविषयी…….
राजेंद्र घाडगे हे एका नामांकित विमा संस्थेतून प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. इतिहास लेखनाच्या अनुषंगाने पाहायचं झालं, तर ते नव्या पिढीतील एक प्रतिभावंत इतिहास अभ्यासक म्हणून ओळखले जातात. या ग्रंथासह इतिहासविषयक त्यांची एकूण पांच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तसेच राजेंद्र घाडगे हे राज्य पुरस्कार प्राप्त लेखक असून, ते उत्तम व्याख्याते म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहेत
इतिहास संशोधकांनी, अभ्यासकांनी आणि चिकित्सक वाचकांनी ताराबाईंचा हा अद्भुत असा जीवनप्रवास समजून घ्यावा आणि आपल्या गावागावांतील शाळा, महाविद्यालये व इतर संस्थांना, ग्रंथालयांना तसेच आपल्या जवळच्या स्नेही, मित्र, नातेवाईक मंडळींना वाढदिवस, विवाह समारंभ आदी विशेष निमित्ताने हा ग्रंथ भेट द्यावा. त्यानिमित्ताने ताराबाईंचे कार्यकर्तृत्व घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात पोहोचेल.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈