सुश्री सुमती जोशी

☆  पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘उपरे विश्व. वेध मानवी स्थलांतराचा.’  – श्री शेखर देशमुख ☆ सुश्री सुमती जोशी  ☆ 


पुस्तकाचे नाव : उपरे विश्व. वेध मानवी स्थलांतराचा.

लेखक  : श्री शेखर देशमुख

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

मूल्य : रू 299/-

पृष्ठ संख्या – 268 

ISBN : 978-93-90060-15-3

मनोविकास प्रकाशन लिंक >> उपरे विश्व. वेध मानवी स्थलांतराचा

पुस्तक परिचय : सुश्री सुमती जोशी 

उपरे विश्व

२०२० साल करोना महामारीचं. मार्च अखेरीस लॉकडाऊन झाला. पोटासाठी शहराकडे धाव घेतलेले हजारो कष्टकरी दोन पायांवर भिस्त ठेवून सामानाची पोटली डोक्यावर घेत गावी परतू लागले. माझ्यासारखी शहरी मंडळी घरात बसून दूरदर्शनवर हे सारं बघत होती. या दृश्याचा जबरदस्त प्रभाव मनात खोलवर असतानाच ‘उपरे विश्व’ हे शेखर देशमुख यांनी लिहिलेलं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक हाती आलं.

शेखर देशमुख गेली कित्येक वर्षे पत्रकार म्हणून काम करत आहेत. एच.आय.व्ही.-एड्स आणि मानवी स्थलांतर या विषयावरील संशोधनासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फौंडेशनची शिष्यवृत्ती, ‘लीडरशिप इन स्ट्रॅटेजिक हेल्थ कम्युनिकेशन’या अभ्यासासाठी जॉन हॉपकिन्स शिष्यवृत्ती मिळालेले आणि बहुविध जबाबदाऱ्या सहजी पेलून धरणारे शेखर देशमुख याना सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारही(२०११) मिळाला आहे. शेखर देशमुख यांची ‘पॉझिटीव्ह माणसं’, लेखन सहभाग-दि प्राईस स्टोरीज, पन्नाशी सामाजिक महाराष्ट्राची’ ही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

‘वेध मानवी स्थलांतराचा’ हे उपरे विश्व या पुस्तकाचं उपशीर्षक. आकाशाला गवसणी घालणारा हा व्यापक विषय २७० पानात बंदिस्त करणं, हे एक आव्हान होतं. ते त्यांनी अतिशय समर्थपणे पेललं आहे. हा विषय त्यांनी सहा प्रकरणात विभागला आहे.

‘अस्तित्व टिकवण्यासाठी’ या पहिल्या प्रकरणात अनादी अनंत कालापासून संघर्ष करत, लढा देत माणूस कसा स्थलांतर करत आलाय त्याचा आढावा घेतला आहे. अन्नपाणी आणि सुरक्षित निवारा या गरजा भागतील तिथे माणूस स्थलांतर करून राहू लागला. रोगराई, दुष्काळ, पूर, भूकंप यासारख्या अस्मानी संकटांपासून सुटका करून घेण्यासाठी माणसांनी जगभर स्थलांतर केलं. ब्रिटिशानी इथल्या शेतकऱ्याना भूमिहीन करून जावा सुमात्रा या बेटांवर मजूर म्हणून स्थलांतर करण्यास भाग पाडलं. १८४६ ते १९४० या कालखंडात जगभरात सामूहिक स्थलांतर कसं घडलं याचा लेखाजोखा इथे वाचायला मिळतो. त्या काळी उत्तर प्रदेश हा स्थलांतराचा केंद्रबिंदू होता. आज दोनशे वर्षानंतरही परिस्थिती बदललेली नाही, हे वाचून वाईट वाटलं. मला सर्वात भावला तो ‘स्त्री आणि स्थलांतर’ या विषयाचा उहापोह. लग्न झाल्यावर माहेर सोडून सासरी जाणं हे विधिलिखित स्थलांतर स्त्रीला टाळता येत नाही. पण परिस्थितीनं लादलेलं स्थलांतर स्त्रीला उद्ध्वस्त करणारं असतं.

‘खेडयाचं मूळ आणि शहराचं कूळ’ या दुसऱ्या प्रकरणात उत्तर प्रदेशातल्या खेडयांची स्थिती विस्तारानं सांगितली आहे. सवर्ण लोक ‘राजा’ आणि बहुजन-दलित ‘प्रजा’. सरंजामशाही मुरलेली. मालकाच्या लाथा खाण्यापेक्षा रोजी रोटीसाठी शहरात गेलेलं बरं, असा विचार करून होणारं स्थलांतर. त्यांना रहावं लागतं उघडी गटारं, कचरा कुंडया याच्या आसपास झोपडया बांधून. माणसांची ही फरपट वाचून मन उद्विग्न होतं.

‘आगीतून फुफाट्यात’ या तिसऱ्या प्रकरणात या स्थलांतरितांमुळे मुंबई. दिल्ली, कोलकाता यासारख्या शहरांची कशी वाताहत झाली त्याचं सविस्तर वर्णन आहे. ऑफिसच्या चार भिंतीत बसून केलेलं हे लेखन नाही. धारावी, प्रेम नगर, इंदिरा नगर यासारख्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधून केलेलं हे लेखन वाचकांना खिळवून ठेवतं.

‘धड आणि धडगत’ हे चौथं प्रकरण. स्थलांतरामुळे प्रगती होते असं म्हणतात, पण उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी केलेलं दिशाहीन स्थलांतर कसं घटक ठरतं, हे या प्रकरणात विस्तारानं मांडलंय. मनुष्यबळाचा विचार केला तर लोकसंख्यावाढ फायदेशीर ठरते, पण निरक्षरता हा शाप ठरणार आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही बाबतीत आपल्या देशातील परिस्थती किती चिंताजनक आहे, हे आकडेवारी देत सांगितलं आहे. हवामानात होणाऱ्या बदलामुळे बांगला देशातल्या स्थलांतरितांचा प्रश्न आपल्यासाठी जाचक ठरणार आहे.

काटेरी वाटा आणि मानवी चेहरे या पाचव्या प्रकरणात पुष्कर येथे असलेल्या ब्रह्मदेवाच्या एकमेव देवळातल्या उत्सवाचं उदाहरण घेत धर्माच्या नावाखाली होणारी लोकांची लूट, फसवणूक, मसाज पार्लरच्या नावावर सेक्स आणि ड्रग्ज यांचा व्यापार करणारे स्वार्थी या संबंधी विवेचन केलं आहे. जागतिक स्तरावर स्त्रियांची चाललेली फसवणूक आणि ससेहोलपट लेखकांनी सोदाहरण दाखवली आहे.

आजचे वास्तव आणि उद्याची बात या शेवटच्या प्रकरणात २०३० साली काय परिस्थिती असेल याचा अंदाज व्यक्त केला आहे.

एकंदरीत स्थलांतराचा एक फार मोठा दस्तऐवज तयार करण्याचं शिवधनुष्य लेखकांनी पेललं आहे. भविष्यात या विषयावर संशोधन करणाऱ्यांना हे पुस्तक दिशादर्शक ठरेल.

 

सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_printPrint
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments