1

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘थांगपत्ता’ ☆ प्रा. रोहिणी तुकदेव

थांगपत्ता-Thangpatta by Rohini Tukdev - Aakar Foundation Prakashan - BookGanga.com

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘थांगपत्ता’ ☆ प्रा. रोहिणी तुकदेव ☆ 

पुस्तक : थांगपत्ता 

पुस्तक-प्रकार : कादंबरी

लेखिका : रोहिणी तुकदेव

प्रकाशक : आकार फौंडेशन प्रकाशन

पृष्ठ संख्या : 169 (पेपर बैक)

मूल्य : रू 150

प्रा. रोहिणी तुकदेव

प्रकाशित पुस्तके

  1. साधुदास तथा गो. गो. मुजूम्दारांच्या कादंबर्या
  2. बसवेश्वर
  3. ओवी छंद : रूप आणि आविष्कार
  4. भाषिक विनिमय : तत्व आणि व्यवहार (सहकार्याने)
  5. कमला (अनुवादित कादंबरी)
  6. मराठी कदंबरीचे प्रारम्भिक वळन (संशोधन)
  7. ध्यास प्रवास ( व्यक्तिविमर्श)
  • लघुपट : ओवी : रूप आणि छंद
  • आकार फ़ाउंडेशन या मानसिक रोग्याविषयी सेवा, प्रबोधन, संशोधन करणार्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारी मंद मंडळाची सदस्य
  • शैक्षणिक कमतरता असलेल्या विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रायोगिक प्रकलपाच्य कामात व्यस्त

मनोगत,

‘थांगपत्ता’ही ही कादंबरी प्रकाशित झाली याचा मला मनापासून आनंद झाला आहे ‘आकार फौडेंशन’ने ती अत्यंत देखण्या स्वरूपात वाचकांसमोर आणली आहे. या कादंबरीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा ‘विचलित मनोविभ्रमा’च्या (Disassociative Fugue) विकाराने ग्रस्त आणि त्रस्त आहे. पूर्वायुष्यात कोणत्यातरी असह्य अशा अनुभवाला तिला सामोरे जावे लागते. त्याचा तिच्या मनावर जबरदस्त आघात होतो. ती लज्जित अपमानित होते. झाली गोष्ट कोणाला कळू नये एवढेच नव्हे तर पुन्हा आपल्यालाही तिची आठवण राहू नये यासाठी ती गोष्ट मनाच्या आतल्या खोल कप्प्यात दाबून टाकण्याचा प्रयत्न करते. एका बाजूला हे चालू असतानाच दुसरीकडे आपल्याला नको असलेल्या गत गोष्टीपासून मुक्त होऊन,निर्भय, सर्वसामान्य जीवन जगावे अशी तिला ओढ असते. परस्परविरोधी भावनांच्या असह्य ताण तिच्या मनाचे स्थैर्य घालवून टाकतो. ती आपले नाव, गावा आणि पूर्वायुष्य विसरते आणि कुठेच स्थिरावू शकत नाही. यातूनच स्थलांतर, स्थानांतर, रूपांतर असे चक्र सुरू होते.

अमृता, गुंजा आणि माया अशी तिची तीन रूपे या कादंबरीत आहेत. या तिन्ही रूपात वावरताना तिच्या मनाची होणारी घालमेल कादंबरीत चितारली आहे.या प्रत्येक रुपात वावरताना तिच्या मनात सतत इतिहासाची धास्ती आहे. तो आपला पाठलाग करतो आहे,असे तिला वाटत राहते. तिच्या आजाराचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण असते. पूर्वायुष्याची विस्मृती झालेली असली तरी तिची अर्जित कौशल्ये मेंदूने टिकवून ठेवलेली असतात त्यांच्या जोरावर ती आपले आयुष्य सावरायचा प्रयत्न करते. या काळात ज्या समाजात तिला जगावे, काम करावे लागते तेथील अडचणींना संकटांना,दुरिताला तोंड द्यावे लागते. त्यातून ती कशी वाट काढते याचे चित्रणही या कादंबरीत आहे.

कादंबरीचे कथानक थोडक्यात सांगता येईल…अमृता कोल्हे या जिम चालवणाऱ्या एका पस्तिशीच्या मध्यमवर्गीय गृहिणीला अचानक घेरीयेते आणि तिची स्मृती हरवते.

नवऱ्याचा डोळा चुकवून ती घराबाहेर पडते पण बलात्कारासारखे संकट तिच्यावर धडकन कोसळतं. पोलीस तिला जिव्हाळा आधारगृहात नेऊन सोडतात. तिथून ती ‘कांचन यमकनबर्डी’ या लेखिकेकडे सहाय्यक म्हणून जाते. पण तिथेही ती फार काळ राहू शकत नाही. अचानक तिथूनही बाहेर पडते. त्यानंतरही तिच्या आयुष्यात दोन स्थित्यंतरे येतात. या सर्व काळातील तिच्या जीवनप्रवासाचे चित्रण कादंबरीच्या कथानकात केलं आहे.

कादंबरीचे कथानक घटनाप्रधान असले तरी त्याचा रोख वेगळाच आहे. आपलं अस्तित्व, आपली ओळख यांचं स्वरूप नेमकं काय असतं? जीवनाची अर्थपूर्णता हि रोखठोक वस्तुस्थिती आहे की तो माणसाने आपल्या समाधानखातर निर्माण केलेला भ्रामक फुगा आहे ? संपूर्ण विश्वचक्राच्या संदर्भात माणसाचं माणूस म्हणून काही स्थान आहे का ? या प्रश्नाच्या उत्तराची वाट अमृता उर्फ गुंजा उर्फ माया हिच्या जीवनानुभवातून शोधण्याचा प्रयत्न आणि प्रयोग मी केला आहे. तो किती यशस्वी झाला आहे, हे अर्थातच वाचक ठरवतील. तो अधिकार त्यांचा आहे.

एका विचलीत मनोविभ्रमग्रस्त स्त्रीच्या रहस्यपूर्ण जीवनाचा मागोवा घेणारी तसेच तिचा भावनिक अवकाश आणि तिच्या जगण्यात गुरफटून गेलेला सामाजिक अवकाश यांच्या परस्परसंबंधातील गुंतागुंतीचा वेध घेणारी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचकांना आवडेल, त्यांना गुंतवून ठेवले ठेवेल असा मला भरवसा वाटतो.

प्रा रोहिणी तुकदेव

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈