मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘राधेय’ – श्री रणजीत देसाई ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

अल्प परिचय पत्र

नाव – श्री. गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

पदनाम – उपशिक्षक, केंद्रशाळा मसुरे नं.1

परिचय – प्राथमिक शिक्षक म्हणून 18 वर्षे सेवेत आहे.

माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ, ग्रंथालय येथे सचीव म्हणून कार्यरत आहे. माळगाव एज्युकेशन सोसायटी, साने गुरुजी कथामाला मालवण, कोमसाप मालवण या संस्थांचा सक्रीय सभासद आहे. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, तालुका मालवणचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.

प्राप्त पुरस्कार –

  • साने गुरुजी कथामाला मालवणचा “आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2015”
  • राज्यमंत्री दिपकभाई केसरकर मित्रंडळ, सावंतवाडीचा “आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2020”
  • कोकण मराठी साहित्य परिषद, मालवणचा “कलागौरव पुरस्कार सन 2021”

 

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘राधेय’ – श्री रणजीत देसाई ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆ 

पुस्तक – राधेय

लेखक – श्री रणजीत देसाई 

प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाउस 

पृष्ठ संख्या – 272

मूल्य – 230 रु 

ISBN – 9788177667462

मेहता पब्लिशिंग हाउस लिंक – >> राधेय

 

पुस्तक परिचय – गुरुनाथ ताम्हनकर

“राधेय” हे कर्णचरीत्र नव्हे. लेखक रणजीत देसाई म्हणतात, “प्रत्येकाच्या मनात एक दडलेला कर्ण असतो. माझ्या मनातील कर्णाची ही कहाणी! भावकहाणी! याची सत्यता शोधायची झाली, तर यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही. कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल.”

शत्रू जरी याचक म्हणून आला, तरी दान देत असता खेद वाटू नये, यासाठी नेहमी सावधगिरी बाळगणारा कर्ण, मित्रत्व निभावण्यासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रसंगी दु:ख, अवहेलना झेलणारा कर्ण या पुस्तकात रेखाटला आहे.

कादंबरीची सुरुवात कर्ण व कृष्ण यांच्या भेटीच्या प्रसंगाने केली आहे. कृष्ण भेटीवेळी कर्ण आपली व्यथा कृष्णासमोर मांडतो, “ज्या कवचकुंडलांची साक्ष जन्मदात्या मातेला सहन झाली नाही, जन्माला येताच कोणत्या अपराधास्तव त्या अज्ञात मातेने मला जलप्रवाहात सोडून दिले? ती कोण होती?” हा गहन प्रश्न तो कृष्णाला विचारतो. त्यावेळी कृष्णही त्याच्याकडे आपले कारुण्य व्यक्त करतो. “कुणाला नदीप्रवाहावर सोडून दिलं जातं, कुणाला नदी ओलांडून पैलतीर गाठावा लागतो. कुणी गवळ्याचं पोर म्हणून नंदा घरी वाढतं, तर कुणाला सूतकुलात आश्रय लाभतो. मातृवियोग दोघांच्याही भाळी सारखाच लिहिलेला.”

संपूर्ण कादंबरीत कर्णाच्या मनात चाललेली घालमेल वाचकांच्या लक्षात येते.

दुर्योधनाच्या मैत्रीचा कर्णाला शेवटपर्यंत अभिमान वाटतो. कारण शस्त्रस्पर्धेच्या वेळी कर्णाच्या कुलाचा उल्लेख करुन त्याचा तेजोभंग केला गेला. मात्र दुर्योधनाने अंगदेशाचा अभिषेक करुन त्याला राज्य दिले.

‘राधेय’ म्हणजे कर्णाच्या जीवनातील प्रत्येक बारीक सारीक प्रसंग हुबेहुब रेखाटल्यामुळे महाभारतातील अनेक दृश्ये डोळ्यासमोर तरंगू लागतात.

द्रौपदी स्वयंवर, राजसूय यज्ञ, कुंतीची कर्णाशी झालेली भेट, महाभारत युद्धप्रसंग आणि युद्धानंतरचे भावनिक प्रसंग अगदी जीवंत रेखाटले आहेत.

खांडवप्रस्थामध्ये पांडवांनी उभारलेली राजधानी लेखकाने हुबेहुब साकारली आहे.

या पुस्तकातील कर्णाच्या मनातील खदखद वर्णन करतानाच लेखकाने कर्णाच्या गुणदोषांवरही प्रकाश टाकला आहे. शकुनी मामांचा द्युत आयोजनाचा डाव त्याला आवडत नाही. जुगार आणि चारित्र्य अशा दोन गोष्टी आहेत की यात पाय टाकण्याआधी विचार करावा. नंतर पाय माघारी घेता येत नाहीत, हे कर्णाचे विचार लेखकाने अधोरेखित केले आहेत.

मात्र द्रौपदीने आपला केलेला अपमान मात्र तो विसरत नाही. तो सुडाग्नी त्याच्या मनात कायम धुमसत असतो, याचे वर्णन लेखकाने केले आहे.

कृष्ण उपदेशाचे शब्द समर्पक भाषेत लेखकाने मांडले आहेत. जय पराजयातील अर्थ ज्यानं आधीच गमावला, पण तरीही कर्तव्यावर जो अखेरपर्यंत दृढ राहिला, त्या भिष्माच्या मनातील भावनाही लेखकाने या पुस्तकात मांडल्या आहेत.

कर्ण व वृषाली यांच्यातील पतीपत्नीच्या भावनांचे चित्रणही लेखकाने उत्तम रेखातले आहे. द्रौपदी स्वयंवराला जाताना न संकोचता राजकन्येचे स्वागत करण्यास तयार असणारी वृषाली, स्वयंवरानंतर कर्णाच्या अपमानाबद्दल संताप व्यक्त करते. कर्णाने आपली कवचकुंडले इंद्राला दिल्यावर वृषालीच्या डोळ्यात अश्रू येतात, हे प्रसंग लेखकाने हळुवारपणे पुस्तकात उतरविले आहेत.

महाभारत युद्धप्रसंगातील कर्णाच्या मनातील भावभावनाही लेखकाने मांडल्या आहेत. मानवी जीवनाचे वास्तवही वाचकांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे.

“राधेय” ही एक भावस्पर्शी कादंबरी आहे. ती वाचकांना नक्कीच आवडेल.

 

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606

संपर्क – 9420738375

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈