मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘स्वानंद’ – श्री अवधूत जोशी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘स्वानंद’ – श्री अवधूत जोशी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆ 

पुस्तकाचे नाव           : स्वानंद

लेखक                     : श्री अवधूत जोशी, मिरज.

मुद्रक व प्रकाशक    : परफेक्ट प्रिंटर्स.

यंत्रांच्या खडखडाटात बोललेले शब्दही ऐकू येणार नाहीत अशा इंजिनियरींग व्यवसायात अडकलेल्या श्री.अवधूत जोशींना शब्दांचे वेड कसे लागले कुणास ठाउक ? आपली मूळ आवड जोपासत त्यानी त्यातून आनंद मिळवला आणि तो स्वतः एकट्याने चाखण्यापेक्षा सर्वांनाच त्यात सामावून घ्यावं या हेतूने त्यांनी त्याला पुस्तकाचं स्वरूप प्राप्त करून दिल.त्यामुळे ‘ स्वानंद’ हे शिर्षक अगदी योग्यच वाटते.

पुस्तक उघडल्यावर दिसते ती अर्पणपत्रिका.श्री.पु. ल. देशपांडे आणि व्यंकटेश माडगूळकर यांची नावे वाचून जरा आश्चर्यच वाटलं.पण पुस्तक वाचून झाल्यानंतर मात्र अर्पणपत्रिका योग्यच आहे असं वाटलं. कारण  या

पुस्तकात ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या कथा आहेत, व्यक्तीचित्रणे आहेत.त्याचबरोबर शहरी मध्यम वर्गीयांची सुखदुःखे आणि स्वप्ने  सुद्धा चित्रित झाली आहेत. त्यामुळे या दोन्हीःचा संगम साधताना पु.ल. आणि व्यंकटेश माडगूळकर यांसारख्या दोन्ही महातिर्थांपुढे नतमस्तक होणे अगदी स्वाभाविक आहे.

‘स्वानंद’ मध्ये काय आहे ? यात साधारणपणे सात कथा, दोन विनोदी लेख, एक व्यक्तीचित्र,

आणि दोन ललित लेख आहेत. संमिश्र प्रकार असल्यामुळे प्रत्येक नव्या कथेत, लेखात नाविन्य वाटते.

श्री.जोशी यांच्य लेखनशैलीचे  वैशिष्ट्य काय ?

मुख्य म्हणजे सूक्ष्म निरीक्षण हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.उदा ‘शेवटी एकटाच’ या कथेची सुरूवात  ; ‘ माझं काय चुकलं’? मधील मुलांचे खेळ व दुपारची वेळ यांचे वर्णन हे सर्व सूक्ष्म निरीक्षणामुळेच शक्य झाले आहे.साधी,सोपी व छोटी वाक्य रचना त्यांनी अगदी सहजपणे साधली आहे.मुद्दाम अलंकारीक  भाषा वापरण्याचा मोह त्यांनी टाळला आहे. मात्र अनेक ठिकाणी सहज सुलभ उपमा मात्र त्यांनी दिल्या आहेत.उदा.’ सफर खाद्यनगरीची”या लेखातील हे वाक्य पहा.

“बटाटा तर नववधूप्रमाणे सकाळी हळद खेळून जेवणात भाजी बनून येतो तर संध्याकाळी डाळीच्या पिठाच्या पूर्ण वस्त्रात लपेटला जाऊन वडा म्हणून समोर येतो.”

श्री. जोशी यांची भाषा विनोदप्रचूर आहे.ती खदखदून हसवणार नाही पण वार्याची झुळूक यावी त्याप्रमाणे त्यांचा नर्मविनोद मनाला गुदगुल्या करतो.मानवी स्वभावाच्या  वर्मावर बोट ठेवण्याच विनोदी लेखकाचं वैशिष्ट्य त्यांना साधलं आहे.काव्य हा आपला प्रांत नव्हे असं जरी ते एके ठिकाणी म्हणत असले तरी त्याच्या चारोळीवरील  लेखातून त्यांची काव्यप्रतिभा दिसून येते.केवळ एक झलक म्हणून एक रचना:

‘सचिनच्या बॅटला नमस्कार करते वाकून

सौरभरावांच नाव घेते चार गडी राखून ‘

या  कथासंग्रहात कष्टकरी,मध्यमवर्गीय,सरळमार्गी साध्या माणसांच्या कथा आल्या आहेत.बालपणीच्या आठवणी आहेत.तारूण्याची स्वप्ने आहेत.उपदेशाची भाषा न वापरता त्यांच्या कथा काय सांगायचं ते सांगून जातात.पुस्तकाचं मुद्रण,मांडणी,अक्षर,मुखपृष्ठ

असं अंतरंग बहिरंग आकर्षक.श्री.अवधूत जोशी यांचा हा पहिला प्रयत्न आहे.त्यांच्याकडून आणखी  लेखन अपेक्षित आहे.त्यासाठी शुभेच्छा.

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈