श्रीमती उज्ज्वला केळकर

☆पुस्तकांवर बोलू काही ☆ अंतर्बोल… सौ. राधिका भांडारकर ☆ परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर

अंतर्बोल : पुस्तक परिचय

नुकताच राधिका भांडारकर यांचा ‘अंतर्बोल’ हा कथासंग्रह पाहिला. त्यांचा तो चौथा कथासंग्रह. प्रथम मनात भरलं, ते मुखपृष्ठ. काहीसं प्रतिकात्मक वाटलं ते. अवकाशाच्या पोकळीत एक झाड. त्यावर बसलेले एक स्त्री. काही वाचते आहे. निरखते आहे. ते झाड मला त्या स्त्रीच्या मनाचं प्रतीक वाटलं. आत्ममग्न, मनस्वी अशी ती स्त्री आहे, असं वाटलं. कथा वाचत गेले, तसतशी मी माझ्या विचारावर अधीक ठाम होत गेले.

सौ. राधिका भांडारकर

जीवन प्रवाहात वहात जाताना अनेक अनुभव येतात. काही लक्षात रहातात. मनमंजुषेत साठवले जातात. या साठवणींचा आठव म्हणजे ‘अंतर्बोल’. या मनातल्या आठवणी जनात येताना कथारूप घेतात. सगळं कसं आनुभवलेलं. काल्पनिक काहीच नाही, याची प्रचिती देतात. आठवणी जाग्या होतात, तेव्हा त्याच्या मागोमाग काही वेळा विचार येतात, कधी आत्मसंवाद होतो. कधी इतरांशी संवाद होतो. कधी तिची निरीक्षणे येतात. कधी विचार, कधी काही तथ्य.

यातली पहिलीच कथा,’ त्यांचं चुकलं’. ही कथा म्हणजे, टिन्केंचं शब्दचित्र. टिन्के म्हणजे तीन के. केशव काशीनाथ केसकर. टिन्के म्हंटलं तर एकाकी आहेत. पत्नी नाही  म्हणून. म्हंटलं तर मुलगा, सून, नातवंडांच्यात आहेत. तसे एकाकी नाहीत.  म्हंटलं तर स्वावलंबी आहेत. स्वत:चं सगळं स्वत: करतात. म्हंटलं तर परावलंबी. कसे? सुनेला दोन वर्ष जपानला जायची संधी मिळालीय. तिच्याबरोबर नवरा-मुले जाऊ शकतात, पण मग टिन्केंचं काय? घरी एकटे रहाणे, किंवा मग काही काळासाठी कम्युनिटी सेंटरमध्ये रहाणे, हे पर्याय होतेच की. पण म्हणजे स्वावलंबी असलेल्या टिन्केंचं परावलंबनच की!

राधिकेला एकदम आठवतं, आपण परदेशी मुलीकडे जाणार असलो, की प्रश्न पडतो, झाडांचं काय? मैत्रीण मुलाकडे कॅनडाला जाणार असते. पण तेव्हा प्रश्न येतो, त्यांनी सांभाळलेल्या कुत्र्याचं काय? ती मोठ्या सूचकतेने एक निरीक्षण समोर मांडते,

‘झाडं, कुत्रा आणि टिन्के….’

मुलीकडून परत आल्यावर तिला कळतं, ‘झोपच्या गोळ्या घेऊन टिन्केंनी आपलं आयुष्य संपवलं. त्यावर विचार करत करत ती पुन्हा पुन्हा म्हणते, ‘त्यांचं चुकलंच….’ तिच्या मनात येत रहातं, दुसरे पर्याय होतेच की त्यांच्यापाशी.

टिन्केंप्रमाणे सदाशिव, गुलाबामावशी, विहंग अशी आणखीही काही शब्दचित्रे यात आहेत. अशी शब्दचित्रे, अशी वर्णने की आपण काही वाचतो आहोत, असं वाटतच नाही. आपण त्यांना प्रत्यक्ष बघतो आहोत, त्यांच्या भोवतीचे वास्तव, घटना, प्रसंग प्रत्यक्ष अनुभवतो आहोत, असंच वाटतं. सदाशिवसंबंधीच्या आठवणी सगळ्या कडूच. त्या मांडण्याला निमित्त आहे, त्याचा आलेला फोन. त्याला नानीला म्हणजे त्यांच्या आजीला भेटायचय. पण पुढे काय झालं, याबद्दल त्रिलोक म्हणजे कथेचा निवेदक उदासीन आहे. तो म्हणतोय, ‘काळाची पानं पुसता येत नसली, तर ती बंद करून ठेवलेलंच चांगलं.... उघडतील कदाचित नवी दारं… तेव्हा पानं कोरी असावीत, आणि शब्दही नवीन असावेत.’.… आशा तर्‍हेची भाष्य विविध कथांमध्ये अनेक ठिकाणी आहेत.

गुलाबमावशी सुंदर. अतिशय देखणी. पण कायमच दीनवाणी. बापुडवाणी. आधी नवर्‍याच्या आणि नंतर नवर्‍याबरोबर मुलांच्याही दबावाखाली असलेली. नवर्‍याच्या अव्यवहारीपणामुळे संसाराची दैना झालेली, पण हे दैन्य अनुभवणारीही तीच आहे. बाकी आपआपल्या ठायी मजेत आहेत. नवरा गेला तेव्हा त्याच्या पायाशी पोत, बांगड्या ठेवून ती कुंकू पुसते. डोळ्यात पाण्याचा ठिपूसही नाही. बिंबा म्हणते, ‘त्याच्याशी कुंकवाचं, मंगळसूत्राचंच नातं होतं फक्त. ते तिनं त्याच्या आयुष्यापर्यंत वाहीलं आणि परत केलं. बिंबाच्या स्वप्नात मात्र ती वेगळंच रूप घेऊन येते. तिला गुलाबमावशी जशी वागावी असं वाटत होतं, तसं. त्यात ती तेजाची शलाका होऊन आप्पांशी भांडत असते. आप्पा तिच्या तेजोमय आकृतीपुढे विनम्र होऊन खालमानेने उभे असतात. तिच्या प्रत्येक शब्दाने अधीकच जखमी होऊन त्यांचा पार लोळागोळा झालेला असतो.

‘तो’ मध्ये पौगंडावस्थेतील भरकटलेल्या विहंगाचे चित्रण आहे.

‘आराखडा’ आणि ‘डॉल्फिन’ या कथा काहीशा प्रातिनिधिक म्हणता येतील. विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबातल्या. सर्वसामान्य मध्यमवर्गीयाला सवय असते, आपल्या वर्तमान आणि भावी योजनांचा आराखडा तयार करायची. तो करताना बहुधा बायको-मुलांना गृहीत धरलं जातं. पिढीतलं वैचारिक अंतर, व्यक्तीगत आवडी-निवडी. इच्छा-आकांक्षा, यांचा वडीलधार्‍यांकडून विचार केला जात नाही. मग आराखडा विस्कटण्याची वेळ येते. मन निराशेनं भरून जातं. या सार्वत्रिक दिसणार्‍या वास्तवावर ‘आराखडा’ या कथेत लेखिकेनं नेमकं बोट ठेवलं आहे. या वस्तुस्थितीनं निराश न होता, त्यांचं स्वातंत्र्य त्यांना देऊन आपण मजेत राहू’ असं, आयुष्यभर नवर्‍याच्या मुठीत राहिलेली बायको सुचवते आणि त्यालाही ते पटतं. कथेचा शेवट –  मनाच्या या कोपर्‍यात काही तरी कोसळलं होतं. पण त्याच वेळी दुसर्‍या कोपर्‍यात एक नवाच अंकुर हळू हळू उलगडत होता.’ असा सुखद आशावादी आहे.

‘डॉल्फिन’मध्ये मुला-नातवंडांपर्यंत संसार झालेल्या आणि आता परिस्थितीने परदेशात मुलाकडे राहावं लागणार्‍या, सुशिक्षित, सुसंस्कृत वयस्क स्त्रीचं एकाकीकपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे. आजच्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातलं, हे चित्र प्रातिनिधिक म्हणायला हरकत नाही यातील नायिकेला आपण एकाकी आहोत, असं सतत वाटत असतं.   पण एका प्रसंगाने नायिकेच्या मनातले मळभ दूर होतं. आपल्या नातवंडांना आपली किती काळजी आहे, हे तिच्या लक्षात येतं. मग तिचा स्वत:च्या मनाशीच संवाद सुरू होतो.

‘उगीच वाटतं आपल्याला आपण एकटे आहोत म्हणून… कुणा ना कुणाशी आपण सतत कुठल्या ना कुठल्या अदृश्य पण चिवट धाग्यांनी जोडलेले असतो…. मग जगाच्या पाठीवर कुठे का असेना…’

मला उमगलेले राधिकेचे ‘अंतर्बोल’ मी आपल्या पुढे प्रगट केले. शब्दमर्यादेमुळे  इतर चांगल्या कथांवर लिहिता आले नाही आणि त्यातल्या लावण्यस्थळांची उकल करता आली नाही. शेवटी एवढेच म्हणेन, प्रत्येकाने राधिकेचे ‘अंतर्बोल’ ऐकावे…. म्हणजे वाचावे… त्या बोलांचा नाद वाचताना कानात उमटेलच आणि न जाणो… कित्येक ठिकाणी ते आपल्याला आपलेही ‘अंतर्बोल’ वाटतील.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments