मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “सिद्धार्थ” ☆ सौ. राधिका भांडारकर

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “सिद्धार्थ” ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव: सिद्धार्ध

लेखिका : स्मिता बापट जोशी

प्रकाशक: राजहंस प्रकाशन 

पहिली आवृत्ती : २१ मे २०१९

किंमत : रु.१६०/—

सिद्धार्थ  हे पुस्तक वाचल्यावर पहिली प्रतिक्रिया द्यायची म्हणजे हे पुस्तक मातृत्वाच्या कसोटीची एक कहाणी सांगते. हा एक प्रवास आहे. सिद्धार्थ आणि त्याच्या आई वडीलांचा. या प्रवासात खूप खाचखळगे होते. आशा निराशेचे लपंडाव होते. सुखाचा नव्हताच हा प्रवास. सुखदु:खाच्या पाठशिवणीची ही एक खडतर वाटचाल होती.  वेदना, खिन्नता, चिंता, भविष्याचा अंधार वेढलेला होता.

सिद्धार्थच्या ह्रदयाला जन्मत:च छिद्र होतं. २६/२७ वर्षापूर्वी विज्ञान आजच्याइतकं प्रगत नव्हतं. शिवाय सिद्धार्थची समस्याच मूळात अवघड आणि  गुंतागुंतीची होती.

एका हसतमुख, गोर्‍या ,गोंडस बाळाला मांडीवर घेऊन प्रेमभरे पाहताना,या असाधारण समस्येमुळे त्याच्या आईचं ह्रदय किती पिळवटून गेलं असेल याचा विचारच करता येत नाही. त्या आईची ही शोकाकुल असली तरी सकारात्मक कथा आहे.

सिद्धार्धच्या आई म्हणजेच स्वत: लेखिका स्मिता बापट जोशी. सिद्धार्थला, त्याच्या शारिरीक, मानसिक त्रुटींसह मोठं करताना आलेल्या चौफेर अनुभवांचं, भावस्पर्शी  कथन या पुस्तकात वाचायला मिळतं..

सिद्धार्थच्या अनेक शस्त्रक्रिया, त्यातून ऊद्भवलेल्या इतर अनेक व्याधी..जसं की,त्याच्या मेंदुच्या कार्यात आलेले अडथळे…पर्यायाने त्याला आलेलं धत्व, बाळपणीचे लांबलेले माईलस्टोन्स.. चोवीस तास, सतत त्याच्यासाठी अत्यंत जागरुक, सावध राहण्याचा तो, भविष्य अवगत नसलेला काळ भोगत असाताना झालेल्या यातनांची ही चटका लावणारी जीवनगाथाच…

पण असे जरी असले तरी सकारात्मकपणे स्मिता बापट जोशी यांनी एक आई म्हणून दिलेली ही झुंज खूप ऊद्बोधक, या वाटेवरच्या दु:खितांसाठी, मार्गदर्शक आहे. Never Give Up ही मानसिकता या पुस्तकात अनुभवायला मिळते. आणि ती आश्वासक आहे. समाजाकडुन मिळालेले दु:खद नजराणे, ऊलगडत असताना, त्यांनी समाजाच्या चांगुलपणाचीही दखल घेतलेली आहे. किंबहुना त्यांनी त्यावरच अधिक प्रकाश टाकलेला आहे. राग, चीड याबरोबरच ऊपकृततेची भावनाही त्यांनी मनापासून व्यक्त केली आहे.

विज्ञानाची मदत असतेच. पण भक्कमपणे, अनुभवाने मिळालेले ज्ञान जोडून, या काटेरी प्रवासातही फुलांची बरसात कशी होईल,आणि त्यासाठी प्रयत्नांची केलेली पराकाष्ठा यशाचं दार ऊघडते, हे या पुस्तकात ठळकपणे जाणवते आणि म्हणूनच या पुस्तकाशी आपलं नातं जुळतं..

जन्मापासून ते वयाच्या सव्वीसाव्या वर्षापर्यंतचा, सिद्धार्थचा हा जीवनपट, एका जिंकलेल्या युद्धाचीच हकीकत सांगतो.

आज सिद्धार्थला एक स्वत:ची ओळख आहे.

ज्याला संवादही साधता येत नव्हता, तो आज “झेप” नावाच्या एका विशेष  मुलांच्या संस्थेत शिक्षक आहे,

जिगसाॅ पझल सोडवण्याच्या कलेने, त्यात असलेल्या प्राविण्याने, त्याचे नांव गिनीज बुक मधे नोंदले गेले.

स्मिता आणि भूषण या जन्मदात्यांच्या संगोपनाचा हा वेगळा प्रवास वाचनीय आहे..

पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यात लेखिका त्यांच्या मनोगतात म्हणतात, “जेव्हां,स्मिता एक व्यक्ती आणि स्मिता ..सिद्धार्थची आई म्हणून विचार करते,तेव्हां मला हरल्यासारखे वाटते..

स्मिताला तिची स्वत:ची स्वप्नं,महत्वाकांक्षा अर्पण कराव्या लागल्या या भावनेने कुठेतरी दु:ख होऊन  पराभूत झाल्यासारखे वाटते.पण मग,सिद्धार्थच्या जडणघडणी मधे विजीगीषु वृत्तीची स्मिताच तर होती….हे जेव्हां जाणवतं तेव्हां दृष्टी बदलते. हात बळकट होतात.

…”आज या जगाला गर्जून सांगावसं वाटतं, आम्ही दोघीही जिंकलो.”

सुंदर!!

जरुर वाचावे असे हे पुस्तक..!!

© सौ. राधिका भांडारकर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈