1

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ मला निसटलचं पाहिजे ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

📖 पुस्तकावर बोलू काही 📖

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ मला निसटलचं पाहिजे ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

पुस्तकाचे नाव— मला निसटलचं पाहिजे

निवेदन— स्लाव्होमिर रावीझ

शब्दांकन— रोनाल्ड डाऊनिंग

अनुवाद—- श्रीकांत लागू

ऑनलाइन उपलब्ध ->> मला निसटलचं पाहिजे

“मला निसटलचं पाहिजे” या पुस्तकात सपशेल खोटी वाटावी अशा ख-या साहसकथेचा अनुभव घेता येतो. पुस्तकाचे निवेदन स्लाव्होमिर रावीझ यांनी केले असून  रोनाल्ड डाऊनिंग यांचे शब्दांकन वाचण्यास मिळते. मात्र श्रीकांत लागू यांनी तेवढ्याच ताकदीने पुस्तकाचा केलेला अनुवाद आपल्या शैलीत साकारला आहे.

रशियातील स्टॅलिनच्या अत्यंत जुलमी राजवटीचा तो काळ. या काळात तेथील नागरीकांवर अनन्वित अत्याचार झाले. या जुलमी राजवटीच्या काळात कामधंद्यानिमित्ताने रशियात राहिलेल्या नागरीकांवरही अनन्वित अत्याचार झाले. यात निरपराध युद्धकैदीही होते. त्यांची सपशेल खोटी वाटावी पण खरी अशी ही साहसकथा अंगावर शहारा आणणारी तर आहेच पण त्यावेळी त्यांना  प्रत्यक्ष काय काय यातनांचा मुकाबला करावा लागला हे चित्रच डोळ्यासमोर उभे राहते. अश्या जीवघेण्या प्रसंगातही ते डगमगले नाहीत की त्यांनी आपले अवसानही गळू दिले नाही… काहींचा अपवाद वगळता ते सही सलामत आपल्या मायदेशी परत आले. खरोखरचं मनातल्या मनात त्यांचे कौतुक करावे असे वाटले व अभिमानाने ऊर भरून आला..

अनेकांना ख-या खोट्या गुन्ह्यासाठी आर्क्टिक भागातल्या गुलामांच्या कामगार कँपात पाठविण्यात आले होते. तिथून निसटून जाण्याचा प्रयत्न एका छोट्या गटानं जीवावर उदार होऊन केला. स्लाव्होमिर रावीझ हा त्या पैकी एक तरूण फक्त चोवीस वर्षाचा… पोलंडच्या लष्करात लेफ्टनंटच्या हुद्यावर… १९३९ साली रशियन गुप्तहेरांनी हेरगिरीच्या आरोपावरून पकडले. आपण निरपराध असल्याचे सांगूनही त्यांनी मानसिक शारिरीक छळ करून त्याला २५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. त्या भयानक वातावरणात २५ वर्षे काढायची ?  या जाणीवेनीच अंगावर काटा तर आलाच पण कारण नसताना निरपराध माणसाला शिक्षा का? हा प्रश्नही वारंवार मनात आला.

उत्तर सैबेरियातल्या एका तुरूंग तळावर सहा सवंगडी जमवून त्यांनी तेथून केलेले पलायन, कमीतकमी वेळात आखलेली मोहीम, पलायन करण्यासाठी लावलेली जीवाची बाजी तितक्या लवकरात लवकर जेवढे दूर जाता येईल तेवढे गेले पाहिजे ह्याची मनोमन जाणीव, समविचारांचे समव्यावसायिक एकत्र चालू लागल्याची माहीती… हे सर्व वाचताना त्यांनी कोणकोणत्या संकटांशी मुकाबला केला असेल व कसा केला असेल याचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहते व अंगावर नकळत शहारा उभा राहतो.  एवढं वास्तवदर्शी वर्णन केलेलं आहे जणू  आपणचं ते प्रत्यक्ष भोगतोय..

पुस्तकातले जीवघेणे प्रसंग तर आपल्या नजरेसमोरून जाताना मन अंर्तःमुख होऊन जाते. पुस्तकाचे लेखन वापरण्यात आलेली भाषाशैली आणि शब्द सामर्थ्याने रेखाटलेला प्रत्येक शब्द हे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणता येईल. कारण हजारो किलोमीटरवर घडलेली ही घटना प्रत्येक शब्दांगणिक आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. प्रत्येक प्रसंग जिवंत होतो आणि आपल्याला अंतर्मुख करतो. शौर्य, क्रौर्य, भीती, दहशत, जिद्द  ध्यास अशा अनेक भावनांचा प्रत्यय प्रत्येक वाचकांना येतो यात शंका नाही. हा सुंदर अनुभव या पुस्तकाने दिला आहे.

असे हे अनोखे लिखाण खरचं जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी नवी दिशा देऊन जाते..

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈