मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘पाण्यावरल्या पाकळ्या’ – शांताबाई शेळके ☆ सौ. राधिका भांडारकर

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सौ. राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘पाण्यावरल्या पाकळ्या’ – शांताबाई शेळके ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव: पाण्यावरल्या पाकळ्या

प्रकाशक:        गुलाबराव मारुतीराव कारले

प. आवृत्ती:      १४सप्टेंबर १९९२

किंमत:            पन्नास रुपये.

सहा जुन हा  शान्ता शेळके यांचा स्मृतीदिन.त्या निमीत्ताने…

शांता शेळके म्हणजे मराठी साहित्यातलं महान व्यक्तीमत्व.कवियत्री ही त्यांची प्रतिमा असली तरी,कथा कादंबरी ललीतलेखन,सदरलेखन या साहित्यप्रकारातही त्यांचं दर्जेदार योगदान आहे.मेघदूताचा मराठी अनुवाद त्यांनी केला.आनंदाचे झाड,वडीलधारी माणसे सारखं

गद्यलेखनही त्यांनी केलं. त्यांची जवळ जवळ पाचशेच्यावर गीते आहेत. जीवलगा राहिले दूर घर माझे,

मागे उभा मंगेश, आमी डोलकं रं, ही वाट दूर जाते.. अशी अनेक गीतं रसिकांना मुग्ध करतात. रविकिरण मंडळाचा तो काळ. आणि शांताबाईंचं उपजत असलेलं कवीमन.. यांचा ऊत्तम मेळ जमला. वर्षा हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह…

पाण्यावरील पाकळ्या हा जपानी हायकूंचा अनुवादित काव्यसंग्रह. शिरीष पै, सुरेश मथुरे यांनी जपानी हायकूंचे अनुवाद केले .स्वंतत्र हायकूही लिहीले.शांताबाईंचा अशाप्रकारचा हा पहिलाच काव्यसंग्रह.

हायकू हा एक रचनाबंध आहे. हायकूचे विशेष म्हणजे बंदीस्त रचनेतलं भावदर्शनांचं स्वरुप. एखादा धावता गतीमान क्षण पकडून नेमका शब्दांकीत करणे. हे हायकूचं

बलस्थान.

हायकूला एक आकृतीबंध आहे. नियम आहेत. मात्र प्रस्तुत पुस्तकात जपानी हायकूंचा मुक्त अनुवाद आहे.

त्यांनी या हायकूंना स्वत:ची काही परिमाणे देऊन मराठी प्रवाहात आणल्यामुळे हे अनुवादित हायकू आपल्या भावनांशी जुळतात.

प्रस्तावनेत शांताबाईंनी, त्यांना ज्ञानदेवांच्या काव्यातही हायकूशी साधर्म्य जाणवल्याचे म्हटले आहे.

कमळावरी भ्रमर

पाय ठेविती हळुवार

कुचंबेल केसर।ईया शंका।।..

असे असले तरीही जपानी हायकूला एक स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे. त्यांत निसर्गाची ओढ, जीवनचिंतन, अल्पाक्षरीत्व, चित्रदर्शीत्व यांचा समावेश आहे.

आणि याचा सुरेख आनंददायी अनुभव रसिकांना शांताबाईंनी या हायकूतुन दिला आहे… हायकुच्या काव्यात्म आशयाशी त्या प्रामाणिक राहिल्या  आहेत.

बर्फाळ टेकड्यावरुन

चाललेले माझे एकाकी भ्रमण

साथ देतो एकटा कावळा दुरून…

 

एक डबके  जुनाट संथ

बेडुक मारतो उडी

पाणी खळबळून पुन्हा निवांत….

हायकूंमधे प्राण्यांना मानवी जीवनात दिलेलं रुपकात्मक स्थान, एक सरळ तत्व हलकेच सांगून जातं.

शिशीराने निष्पर्ण केलेल्या रानात

वारे ओरडत आहेत रागारागाने

त्यांना उडवायला राहिली नाहीत पाने..

किंवा,

हिवाळी वार्‍यांने जेव्हां विखुरल्या

पिओनींच्या फुलांच्या पाकळ्या

काही जोडीने खाली उतरल्या….

खडकातून प्रचंड झेपा घेत

नदी धावते आहे रागाने रोरावत

जवळचा पर्वत मात्र शांत सस्मित….

इतक्या अल्पाक्षरांतून निसर्गाचे भव्य दर्शन तर होतेच पण जीवनातले आध्यात्मही झिरपते..

या अनुवादित हायकूंबद्दल शांताबाई म्हणतात, या काव्यप्रकारातील काव्यगुणांचे त्यांना आकर्षण वाटले.

गवताच्या पात्यावर दवाचे थेंब आकाराला यावेत तसे मनाच्या पात्यावर जमलेल्या विशिष्ट भावानुभवाचे थेंब म्हणजे हायकू.

त्यांनी मूळ जपानी हायकूच्या इंग्रजी अनुवादांचे मराठी अनुवाद केले. त्याविषयी त्या म्हणतात “हायकूच्या तांत्रिक अंगाचे मला ज्ञान नाही. तिच्या रचनेची बंदीश, नेमकी शब्दसंख्या मला ठाउक नाही.मात्र रुपवतीचे सौंदर्य, बांबूच्या जाळीदार पडद्यावर बघावी त्याप्रमाणे हायकुचे सौंदर्य मी इंग्रजी अनुवादातून अनुभवले.”

म्हणून या पुस्तकातील हायकूची रचना मुक्त ठेवली आहे. काही अनुवाद छंदोबद्ध आहेत, काही गद्यसदृश आहेत तर काही चार ओळींचेही आहेत.

जसे की,

  जळावरी हिमखंड गोठले

  आज कसे वितळती

  मिटवून भांडण एकदिलाने

  झुळुझुळु वाहती!!

या पुस्तकात जवळजवळ २५४ हायकू आहेत.

त्यांत निसर्ग तर आहेच. प्राणीपक्षीही आहेत. फुले आहेत, झाडे आहेत. पंचमहाभूतांचाच अविष्कार आहे.

शिवाय मानवी मनाचे मनोव्यापारही आहेत. भावभावनांची अंदोलने आहेत. जरी हे जपानी हायकू असले तरी ते कुठेतरी मानवी संस्कृतीशी एकात्म आहेत.आणि शांताबाईंच्या शब्दांची रुणझुण इतकी मंजुळ आहे की हे सारं काव्य हळुवारपणे मनाच्या गाभार्‍यात तरंगत जातं, जसं की पाण्यावर

फुलांच्या पाकळ्या अलगद तरंगतात… एका वेगळ्याच काव्यप्रकाराचा, काव्यानंद या पुस्तकातून मिळतो…  शांताबाईंच्या संवेदनशीलतेला, कवीमनाला, शब्दमाधुर्याला

मनापासून सलाम…

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈