मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘आतला आनंद’ – शांताबाई शेळके ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सुश्री संगीता कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘आतला आनंद’ – शांताबाई शेळके ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

पुस्तकाचे नाव: आतला आनंद (ललित लेखसंग्रह )

लेखिका:            शांता शेळके

पृष्ठ संख्या:         112

किंमत:               120 रुपये.

जानेवारी ते डिसेंबर २००१ या काळात शांताबाई शेळके यांनी दै.सकाळ या वर्तमानपत्रातील  “दिपमाळ” या सदरात आठवड्याला एक असे ५२ ललित लेख लिहिले त्यांचा हा संग्रह तो म्हणजेच ” आतला आनंद ” हा होय..

शांताबाईंच्या सहज सुंदर प्रसन्न शैलीतील हे ललित लेख..अवती भवतीच्या व्यक्तिमत्वांचा आणि घटनांचा रोचक वेध.. ह्या सदरासाठी लेखन करताना प्रत्येक वेळी काय लिहायचं?किंवा रोज काय लिहिणार? हे त्यांनाही ठाऊक नसायचं. ऐन-वेळी वेगवेगळे विषय त्यांना सुचत आणि त्या लिहीत. हे सर्व लिहीत असताना आपल्या स्मृतिसंपुटात काय काय साठवलेलं असतं याची विस्मयकारक प्रचिती त्यांना हे लेख लिहिताना आली जणू काही नव्यानेच स्वतःची ओळख त्यांना पटत गेली. त्यांच्या निधनानंतर आठ वर्षांनी प्रकाशित झालेला हा ललित संग्रह..या लेखात त्यांनी उपरोक्त विचार मांडले आहेत..

प्राचीन विचारवंतांनी कामाइतकाच क्रोधालाही रिपू मानून त्यावर विजय मिळवावा असे सांगितले आहे. अगदी साध्या व्यावहारिक दृष्टिकोनातूनही एकूण रागावणे, चिडणे, संतापणे योग्य नाही असे आपण मानतो. खूप संताप आला तर शंभर अंक मोजावेत हा संकेतही आपल्याला ठाऊक आहे. क्रोध जिंकावा असे जे तात्विक आध्यात्मिक भूमिकेतून म्हटलेले आहे ते योग्यच आहे.  एकूण काय रागावणे ही गोष्ट टाळायला हवी याबद्दल कुणाचेच दुमत होण्याचे कारण नाही. पण लगेचच दुसरा एक विचार मनात येतो की राग ही गोष्ट खरोखरचं इतकी वाईट आहे का? असा विचार करायला लावणारा हा लेख ” शत्रू की मित्र” या लेखात आपल्याला वाचायला मिळतो.

 आधार आपल्या जीवनातील एक अत्यावश्यक गोष्ट. जिवंत माणसांतच नव्हे तर भोवतालच्या परिसरात, ओळखीच्या ह्रदयात, अगदी निर्जीव वस्तूंमध्ये देखील आपण आधार शोधत असतो. ” आधार ” हा लेख थोड्या फार प्रमाणात असाच आहे.

” विस्मृतीचे वरदान” हा लेख वास्तवाचे भान देणारा.. या लेखात रवींद्रनाथ टागोरांचे एक सुंदर व अर्थपूर्ण विधान ते म्हणजे भूतकाळातल्या स्मृती जिवंत ठेवण्याच्या माणसाच्या धडपडीला बघून काळ हसत असतो. काळाचे चक्र अविरत फिरत असते आणि दैनंदिन जगण्याचा रेटा इतका जबरदस्त असतो की भूतकाळातल्या स्मृतींना उराशी घट्ट कवटाळून ठेवणे कितीही हवेहवेसे वाटले तरी तसे करता येत नाही..स्मृती नव्हे तर विस्मृती हेच जीवनातले वास्तव आहे. याची आपल्याला जाणीव होते..किती अर्थपूर्ण विधान आहे हे…

 तर कधी बंगालमधल्या आकांक्षारहित जीवन जगणा-या बाऊल जमातीची माहिती वाचकाला देतात तर कधी चंद्रा नावाच्या अनपढ गवळणीची मार्मिक लेख वाचायला मिळतो तसेच ” असा एक शिवराम” नावाची सत्यकथाही मनाला चटका लावून जाते.तर कधी स्वतःच्या आयुष्यातला एखादा हृदयस्पर्शी प्रसंग कथन करतात. झेन कथा, पाटलाच्या गड्याची सून, ती जूनी नाती, नानी, पाखरे, खेळ इ. शीर्षकांतर्गत येणारं बाईचं अनुभव कथन  सहज लक्षात राहण्यासारखे आहे..

यातील लेख वाचकांशी उत्तम संवाद साधतात.  मानवी जीवनातले नेहमीचेच अनुभव वाचकांच्या मनात विचारचक्र सुरू करतात व त्याला अंर्तमुख करतात.. करायला भाग पाडतात.. स्वतःच्या मर्मबंधातली ही ठेव सोप्या सहज भाषेत त्यांनी कथित केली आहे. हे सदर संपवीत वाचकांचा निरोप घेताना त्या म्हणतात ” असे कधी तरी काही निमित्ताने फिरून भेटूया..आतला आनंद परस्परांत वाटू या..”

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈