मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘पोटनाळ’ – सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘पोटनाळ’ – सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ सौ. राधिका भांडारकर☆ 

पुस्तकाचे नाव:  पोटनाळ (कविता संग्रह)

कवियत्री:              सुश्री उषा   जनार्दन  ढगे

प्रकाशक:           श्री अक्षर ग्रंथ प्रकाशन(बोरीवली मुंबई)

प्रकाशन:             जुलै  २०१६

पृष्ठे:                     ६७

किंमत:                 १००/—.

पोटनाळ हा उषा ढगे यांचा पहिला कवितासंग्रह.या संग्रहात एकूण चाळीस कविता आहेत.या सर्वच कविता वाचताना एक लक्षात येते की,उषा ढगे यांचा हा पहिलाच संग्रह असला तरी काव्यातले त्यांचे विचार,भावना,सूक्ष्म क्षणांना लावलेले अर्थ खूप परिपक्व आणि प्रभावी आहेत.

खरं म्हणजे त्या यशस्वी चित्रकार आहेत.मात्र अमूर्त चित्रांबद्दलचे अनुभव आणि सुचलेल्या कल्पनांविषयी लिहीता लिहीता काव्य स्फुरत गेलं. अन् रंगरेषांबरोबरच शब्दांचे पैंजणही रुणझुणले. त्यांचं संवेदनशील,हळवं,कोमल मन व्यक्त होत राहिलं.

या कवितांमधून अनेकरंगी विषय त्यांनी सहजपणे मांडले आहेत..

कधी हलक्याफुलक्या, कोवळ्या खट्याळ प्रेमाचा अविष्कार होतो. कधी निसर्गाचं गोजीरवाणं रुप, कवियत्रीच्या नजरेतून साकारतं. कधी त्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांचा शोध जाणवतो. कधी नात्यांची तोडमोड जाणवते. आयुष्यातले फटकारे जखमा करुन जातात. कधी चिंतन करायला लावतात. कधी मन विद्रोही बनतं तर कधी संयमी, शांत, सकारात्मकतेकडे झेपावतं.

कुठलंही पान उघडावं, कुठलीही कविता वाचावी, अन् साध्यासुध्या शब्दातून उलगडणार्‍या आशयात गुंतून जावं. प्रत्येक कविता मनाला थेट भिडते.

हातातल्या सुयांवर धाग्यांची गुंफण

धाग्यांच्या गुंफणीतून एक सुंदर जुंपण।

दिधले आयुष्यातील ते वळण विलक्षण

पांच धागे पांच रंगाचे तिच्यासाठी पंचरंगी आपण।

रेशीम गाठ या कवितेतील काव्यपंक्तीत,आपल्या मुलांवर संस्कार करणार्‍या प्रेमळ आईचचाच चेहरा दिसतो.

पाश होते स्नेह जिव्हाळ्याचे

काही सुटले तरी सांभाळुनी

काही धरीत वाटचाल करताना जीवनाची

किती साठवण झाली की हो या मनाच्या टाकीत… या ओळीतला मनाच्या टाकीत हा शब्दप्रयोग फार भावतो.

हे विश्वची माझे घर या कवितेत स्त्रीची वेदना उपरोधिक शब्दात येते.

हे विश्वची माझे घर कुणी ओळखला का यातला खरा भाव?

करीत राहिले भेदभाव

म्हणाले आम्हीच इथले बाजीराव…

हा प्रश्नच एक शाब्दीक ताकद घेउन येतो.

काही काव्यपंक्ती तर मनाचा तळ गाठतात.

खोल अंधारात डोही

काहीतरी उरते, अन् तिथेच थांबते

जे जे होते सरले..

ते कधीच का आपुले नव्हते?

या मलुल मग्न विचारी

युगही सरुन जाते…!

एक नातं हिरमुसलय्

एक नातं खुदुखुदु हंसतंय्..

शब्दांच्या या हळुवार प्रवाहाबरोबर मन अलगद् तरंगतं.

पोटनाळ ही शिर्षक कविता तुमची आमची सर्वांची वाटावी अशीच.पण तरीही कवियत्रीची वेगळीच तळमळ यात जाणवते..

पंख फुटले…हात सुटले.

पोटनाळेचे वेढेही सैलावले

काळजात या काहुर माजले

मन आत गाभारी तीळ तीळ तुटले…

प्यादे आपणही. ही कविताही  गर्भातल्या अर्थामुळे मन पकडते.

किती प्रश्न पडले सवाल उरले

हे असे कसे

तसे का बरे

पुसले कारण

दैवपटावरचे प्यादे आपण….

खूप सुंदर..कविता वाचून संपल्यावरही त्या शब्दात उमटणारे ध्वनी मनात निनादत राहतात.

सर्वच कविता पुन्हापुन्हा वाचाव्यात अशाच परिणामकारक आणि वास्तववादी.सृजनशील मनाची पावती देणार्‍या.

कविता कुठून स्फुरतात?

त्या कशा व्यक्त होतात?

गद्य आणि पद्यमधील रेषा ओलांडून,शब्द काव्यरुप कसे होतात या प्रश्नांची निश्चीत उत्तरे नाहीत.मात्र हा काव्य संग्रह वाचाताना एक जाणवते की हे हुंकार आहेत.

भोगलेल्याचे नाद आहेत.आसवांचे थेंब आहेत.हास्यातले दंव आहे.

उषाताई या चित्रकार असल्यामुळे या  पुस्तकाचं बाह्यरंगही त्यांनी अतिशय सुंदर सजवलंय्. देखणं मुखपृष्ठ, प्रत्येक

काव्याला जोडलेली बोलकी रेखाटने खूप आकर्षक आहेत….

थोडक्यात, अतिशय सुंदर, वाचनीय, संग्रही असावा असा हा उषा ढगे यांचा पोटनाळ काव्यसंग्रह…

त्यांच्या काव्यप्रवासासाठी खूप शुभेच्छा! आणि त्यांचे अधिकाधिक काव्यसंग्रह प्रकाशित होउन वाचकांची आनंदपूर्ती होत राहो हीच सदिच्छा..!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈