मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘विविधा’ (अनुवादित कथासंग्रह) – सौ. उज्ज्वला केळकर ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘विविधा’ (अनुवादित कथासंग्रह) – सौ. उज्ज्वला केळकर ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नांव….   विविधा (अनुवादित कथासंग्रह)

अनुवादिका –         सौ. उज्ज्वला केळकर

प्रकाशक               श्री नवदुर्गा प्रकाशन.कोल्हापूर

प्रथम आवृत्ती         जानेवारी २०१८

पृष्ठे…….               २६४

किंमत                   ४००/—

विविधा हा सौ. उज्ज्वला केळकर यांचा कथासंग्रह प्रस्तुत करताना त्या त्यांच्या मनोगतात म्हणतात,—” हिंदीमधील कथासाहित्य वाचताना काही कथा खूप आवडून गेल्या. त्यांच्या वेगळेपणाने त्या मनात रेंगाळत राहिल्या. त्यांचा मराठी अनुवाद करुन, मराठी वाचकांपर्यंत त्यांचे रंग गंध पोहचवावे असे वाटले. आणि त्यातूनच साकारला हा “विविधा” कथासंग्रह.” 

यातील काही कथा हिंदी भाषेतून थेट घेतलेल्या आहेत.

काही अन्य भाषांतून हिंदीत अनुवादित आहेत आणि त्यांचा मराठी अनुवाद केलेला आहे.

विविध वातावरण, विविध भवताल, विविध संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या, विविध भावभावनांचा खेळ मांडणार्‍या अशा एकूण एकोणावीस कथा या संग्रहात आहेत…

या कथा वाचताना,  तुटलेली मने, तुटलेली स्वप्ने, विखुरलेली नाती यातून नकारात्मकता जाणवत असली तरी वास्तवतेपासून कथा दूर जात नाही. ती रेंगाळते. विचार करायला लावते. सीमारेषेवरील युद्धे,जाती धर्मामुळे झालेल्या दंगली, स्वार्थी मतलबी राजकीय खेळी, खोटेपणा, भ्रष्ट नीती या सर्वांचा सामान्य निरपराध जनमानसावर किती खोल आणि उध्वस्त करणारा परिणाम होतो याची जाणीव या कथांमधून बोचत राहते.

काही कथांमधे हळुवार प्रेमाचे, नात्यागोत्यांचे, पारिवारिक विषयही अतिशय वेगळेपणाने आणि विविध स्तरांवर हाताळले आहेत. म्हणून त्यात तोचतोचपणा नाही. ते नेहमीचेच न वाटता त्यातलं निराळेपण वाचकाला वेगळ्या जाणीवा देतात.

‘पुष्पदहन’ ही युरोपहून आॅस्ट्रेलियात अपहरण करुन अमानुष छळ झालेल्या एका मुलाच्या जीवनावरची कहाणी आहे. लेखकाची या एकाकी व्यक्तीशी, एक टॅक्सी ड्रायव्हर आणि गिर्‍हाईक या नात्यातून जवळीक होते. जिम त्याला त्याच्या फसवणुकीची कहाणी सांगतो. युद्धानंतर झालेली फरपट, जिमची आईशी झालेली फसवणुकीची  ताटातूट, हे सारं खूपच यातना देणार.!!

आॉस्ट्रेलियात तीन महिन्यासाठी संशोधनानिमीत्त आलेला लेखक जीममधे गुंततो. इंग्लंडमधे गेल्यावर “तुझ्या आईचा शोध घेईन..” असे वचन तो त्याला देतो. मात्र आई सापडत नाही. एका वादळात कोलमडलेल्या वृक्षाखाली सापडून जीमचाही मृत्यु होतो. याच वृक्षाशी जीमचे घट्ट नाते असते. हा वृक्ष आणि मी दोघेही एकाकी असे तो सांगायचा. वृक्ष कोलमडतो आणि जीमची जीवनयात्रा संपते…. ही शोकांतिका असली तरी धार्मिक, वांशिक क्रौर्याची वास्तववादी कथा आहे…. महेंद्र दवेसर हे या कथेचे मूळ लेखक.

‘कहाणी एका रात्रीची‘…. या कथेत पाकीस्तानात मागे राहिलेल्या अल्पसंख्याकांच्या शोचनीय स्थितीचे दर्शन होते. जबरदस्तीचे धर्मांतर, झालेल्या रश्मी चावलाचा रेश्मा कुरेशी बनून घडलेला दु:खदायक जीवनप्रवास वाचताना मन कळवळते… एका हिंसक, राजकारणी घटनेच्या बळीची ही कथा शोचनीय आणि वाचनीय आहे….

‘राक्षस‘ ही कथा वाचताना डोळे नकळत भिजून जातात. सुकांत गंगोपाध्याय यांची ही मूळ बंगाली कथा. राणू मुखर्जी यांनी या कथेचा हिंदी अनुवाद केला आणि उज्ज्वलाताईंनी ही ऊत्कृष्ट कथा मराठीत आणण्याचे मोलाचे कार्य केले.. अनाथाश्रमातून पळून आलेल्या, रेल्वेस्टेशन हेच घर मानलेल्या जबाची ही  कहाणी.. भटकी कलंदर मुक्त पण अतिशय कणखर मजबूत मनाची ही रांगडी राकट जबा—  शनवर घडत असलेल्या रितसर, बेकायदेशीर अगदी चोरीच्या कामातही यथाशक्ती हिरीरीने मदत करुन, मोबदला मिळवून गुजारा करणारी जबा– जांभळं, करवंदे निंबाची पाने विकून पैसे मिळवणारी जबा— स्टेशनवरचाच बलराम तिच्यावर लेकीप्रमाणे माया करतो… रोजचे प्रवासीही तिला करुणा माया दाखवतात. या जबाच्या ओसाड आयुष्यात बिसला नावाचा,चोरीच्या कोळसा खाणीत काम करणारा युवक प्रीतीचा मळा फुलवतो…जबा लग्न, संसार ,परिवाराची स्वप्नं पाहते…. लग्नाच्या अदल्या दिवशीच कोळशाच्या खाणीत झालेला अपघात आणि होरपळलेलं जबाचं स्वप्न वाचता वाचता डोळे वहात रहातात…ही कथा वाचताना रांगडी जबा, ते स्टेशन आजुबाजुचा परिसर, बलराम, बिसला ,या व्यक्ती सारंसारं अक्षरश: डोळ्यासमोर उभं राहतं…त्या वातावरणाचा एक भागच बनून जातो आपण…ती कथा नुसती वाचतच नाही तर ती उलगडणार्‍या शब्दांतून पहात जातो…

खरं म्हणजे प्रत्येकच कथा वाचताना मी हे अनुभवलं.!’

‘छब्बे पाजी‘ ही ही अशीच मुलांना सुरस कथा सांगणार्‍या साध्या सरळ पंजाबी माणसाची गोष्ट. हिंदु शीख दंगलीत विनाकारण आतंकवाद्याचा शिक्का बसून गुन्हेगारीच्या बेडीत अडकलेल्या निर्मळ मनाची कथा—-छब्बे पाजी जेव्हां म्हणतात,”आता माझ्या सगळ्या कहाण्या मेल्यात…कहाण्यांचा समुद्र पार सुकून गेलाय…”हे वाचताना आपल्याही मनातले अनंत प्रश्न ओले होतात….सुशांत सुप्रिय याच्या हिंदी कथेचा हा अनुवाद अप्रतिम!!!”

‘हॅलो १ २ ३ ४‘ ही संपूर्ण कथा म्हणजे एक फोनवरचा संवाद आहे. सुरवातीला निरर्थक वाटणारा मनोरंजक पण नंतर त्यातला  सखोल अर्थ जाणवत…वाचता वाचता एका एकाकी,नैराश्याने ग्रासलेल्या मनोरुग्णाचीच कथा उलगडत जाते…अतिशय धक्कादायक सुंदर वेगळ्याच विषयावरची ,निराळ्या पद्धतीने मांडलेली  कथा…मोहनलाल गुप्ता हे या कथेचे मूळ लेखक.

व्होल्गा यांची ‘ बहरे शिशीरात वसंत ‘ ही मूळ तेलगु कथा! आजारी वृद्ध आई आणि संसारी ,नोकरी करणारी लेक,यांच्या नात्याची विचीत्र वीण दाखवणारी कथा! या कथेत आई मुलीचा काहीसा गैरफायदा घेते ,तिला इमोशनल ब्लॅकमेल करते अशी भावना निर्माण होते.पण एक वास्तव म्हणून ते वाचकाला स्वीकारावही लागतं..

नीला प्रसाद यांची ‘ चंद्र माझ्या अंतरात ‘ ही एक विद्रोही कणखर विचारांची कथा अक्षरश:काळजावर चरे पाडते. यात विखुरलेल्या नात्यांचे तुकडे आहेत. प्रीतीची परिपक्वता आहे. निर्णयाची घालमेल आहे…एक सक्षम ठाम वैचारिक मानसिकता आहे. वैयक्तिक सुखाबरोबरच भोवतालच्या परिस्थितीचीही समंजस जाणीव आहे..या कथेतील काही वाक्ये थेट भिडतात—-

“दोन आत्मनिर्भर जीवांचं एकत्र जगणं,हे ह्रदयाचं नातं असतं. ते त्यांना एकत्र बांधून ठेवतं.  जर पतीचं मन इकडे तिकडे कुठे गुंतलेलंअसेल ,जाणूनबुजून तो आपल्या पत्नीचं मन तोडत असेल, तिचा मान ठेवत नसेल, तर विवाहाचं नातंच मृत होतं. पती जिवंत असूनही पत्नीच्या जाणीवेत ती विधवाच असते….!!!” अशी  विधाने प्रखर असली तरी ती नक्कीच विचार करायला लावतात…

सर्वच कथा सुंदर आहेत.मी काही कथांचाच आढावा घेतला कारण कथावाचनाचा आनंद स्वतंत्रपणे घेतला जावा ही भूमिका.

उज्ज्वलाताईंनी केलेले अनुवाद हे अस्सल आणि कथानकाचा गाभा,वातावरण ,संस्कृती चपखलपणे जपणारे आहेत..अनुवादात सहजता आहे..कुठेही कृत्रीमता ,ओढाताण लवलेशानेही नाही..उज्ज्वलाताईंची ही कला वादातीत आहे. प्रशंसनीय आहे.

थोडे शीर्षकाबद्दल—.विविध भाषेतील,विविध वातावरणातील,भिन्न संस्कृतीच्या निरनिराळ्या घडामोडींच्या या विविध कथा म्हणून “विविधा”…

हा संग्रह वाचतांना मन आनंदीत होत नाही मात्र सत्याच्या वास्तवतेच्या दर्शनाने एक प्रचंड हँगओव्हर येतो….कथांमधल्या नग्न नकारात्मकते पुढे वाचक भेलकांडून जातो…तसेच तो समृद्धही होतो.—–हे माझे मत—-

तुमचे मतही ऐकायला आवडेलच….

 

प्रस्तुती : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈