मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह “शेल्टर” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह “शेल्टर” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

 

कथा संग्रह  – शेल्टर

अनुवादिका – श्रीमती उज्ज्वला केळकर

प्रकाशक – श्री नवदुर्गा प्रकाशन – कोल्हापूर

पुस्तक परिचय: शेल्टर ( हिंदीतील कथांच्या अनुवादाचे पुस्तक)

श्रीमती उज्ज्वला केळकर

लेखिका उज्वला केळकर यांचा ‘शेल्टर’हा अनुवादित कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे .

वेगवेगळ्या प्रतिथयश लेखकांच्या निवडक कथांचा अनुवाद लेखिकेने लीलया केला आहे.

एक एक कथा म्हणजे एक एक मोती आणि या मोत्यांचा सर गुंफण्यात आणि वाचकाला वाचनात सक्रिय ठेवण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

लेखिकेनं कथा अनुवादित केल्या आहेत नव्हे तर त्यांचे अनुसृजन झाले आहे असे म्हणावे लागेल .सामाजिक परिस्थिती ,पात्रांची मानसिकता,त्या त्या प्रांतातील पूर्वापार चालत आलेल्या रूढी आणि या सर्वातील बदल यांच्या तपशिलाने पुस्तक सजले आहे .

पुस्तकातील प्रत्येक कथा ही हलकीफुलकी, समजायला सोपी,हृदयाला भिडणारी आणि शेवटी एक संदेश देऊन जाणारी अशी आहे .

लेखिकेची भाषा प्रवाही आहे अनुवाद करताना संबंधित प्रांतातील त्या कथेतील पात्रांची नावे लेखिकेने जशीच्या तशी ठेवून कथेचा लहेजा कायम ठेवला आहे.

लेखिकेची सृजनात्मकता पाहून नक्की प्रेमात पडावं असा हा कथासंग्रह !!

एकूण तेरा कथा असलेला हा कथासंग्रह!! त्यापैकी काही कथांचा परामर्श मी इथे घेत आहे. मृत्युपत्र कथा अंतर्मुख व्हायला लावते आपल्या दोन्ही मुलांवर अपार प्रेम असलेली आई आपल्या सुनांना मुलीं प्रमाणे वागणूक देते.मुलांसाठी समान वाटणी असलेले मृत्युपत्र ही रजिस्टर करते. तिची आई ज्यावेळी तिला संभाळण यावरून दोन्ही मुलात वाद होतात तेव्हा मृत्यूपत्र बदलते आणि संपूर्ण संपत्ती ट्रस्टच्या नावे करते.

कहाणी अतिशय बोलकी आहे ती केवळ लेखिकेने खूपच touching feel दिला आहे म्हणून..

‘शेल्टर’ ही मुलाने अव्हेरल्यावर स्वतःचे शेल्टर शोधणाऱ्या आईची कथा ! मिस्टर कपूर हेच तिचं अखेर शेल्टर बनतात…..

‘कुणाचा फोन वाचतोय’ ही कथा म्हणजे भ्रमाचा भोपळा फुटला असं आपण म्हणतो ना तसं काहीसं कथानक …….आपण केलेल्या कथासंग्रहाला दाद मिळावी ही स्वाभाविक अपेक्षा असणाऱ्या राजदीप ची ही मनाची घालमेल दर्शवणारी कथा !फोनची वाट पाहण्यात आलेली त्याची अस्वस्थता खूपच छान रित्या लेखिकेने वाचकांपर्यंत पोहोचली आहे .

‘धूर’ या कथेतील केवल राम हा मुसलमान द्वेष्टा! त्याच्या भूतकाळातील अपमानाच्या खुणा अजूनही ताज्या आहेत. कोणताही स्वाभिमानी, आक्रमकांनी दिलेल्या जखमा विसरू शकत नाही .या त्याच्या तिरस्काराच्या ठिणगी वर कुटुंबीय वारं घालतात सरतेशेवटी तो ‘take the life as it comes’ या तत्त्वाचा स्वीकार करतो. त्याच्या मानसिकतेतील उतार-चढाव लेखिकेने छान अधोरेखित केले आहेत.

‘अढळ पर्वत’ या कथेत ‘चले जाव’ आंदोलनात उडी घेतलेल्या धरमदासला सन्मानपूर्वक स्वातंत्र्यसैनिक म्हणून आमंत्रण असते पण तो नुसता सन्मान स्वीकारायला तयार नाही .गुंडांची दहशत समूळ मोडून काढायची चळवळ त्याला गप्प बसू देत नाही आणि त्यासाठी तो सज्ज होतो .

‘बंध नात्याचे’ या कथेमध्ये विधवा स्त्रीच्या मन भावना चितारल्या आहेत ती स्वतःसाठी आधार शोधते. याची जाणीव तिच्या मुलाला असत नाही. समाजाच्या विरोघात जाऊन समाजमान्य नसलेल्या गोष्टी करायला मुलगा तयार होत नाही. त्यामुळे तो तिला विरोध करतो. सर्व बंधने झुगारून ती मात्र आपल्या मित्राचा हात हातात घेते. अशी ही कथा लेखिकेने छान खुलवली आहे .

आपण डेटिंग ज्याला म्हणतो तशी काहीशी कथा ‘सहप्रवासी’! संपूर्ण संभाषणामध्ये दोघांचीही मते जुळत नाहीत परंतु संभाषणाच्या शेवटीशेवटी मनं जुळतात हे समजते हे केवळ लेखिकेच्या लेखन कौशल्यामुळे…

‘नातरा’म्हणजेच पुनर्विवाह मूळ लेखक भरत चंद्र रश्मी यांची याच नावाने असलेली ही कथा त्यातील नावे पात्र न बदलता लेखिकेने मांडली आहे विशिष्ट चालीरिती रूढी यांच्या कचाट्यात सापडलेल्या भुरीची ही कथा फारच हृदयस्पर्शी आहे.

‘खंधाडिया’ या कथेचे शीर्षक मूळचेच ठेवून लेखिकेने ही कथा रंगवली आहे तत्वनिष्ठ अशा बापाचं आपल्या लाच खाऊ आणि व्यभिचारी मुलाशी मुलाचे असलेलं हे द्वंद्व आहे. आपल्या सुनेला मुलगी मानून तिच्यासाठी लढणारा ढेडिया लेखिकेने खंबीरपणे उभा केला आहे.

‘तो क्षण’ ही या

कथासंग्रहातील शेवटची कथा! काही वर्षांपूर्वी झालेल्या कलहातून एक हिंदू आणि एक मुसलमान यामध्ये एक’ मजहब कि दीवार’ उभी राहते. मृत्यूची चाहूल लागलेले मौलाना अगतिक होतात. आपली शेवटची इच्छा प्रकट करायचा हक्क त्याना असतोच आणि ती पूर्ण करायची जबाबदारी आप्तांची…… पंडिताला भेटायची त्याची इच्छा पूर्ण होते पण तोवर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते.

पुस्तकाचे मुखपृष्ठही अतिशय आकर्षक चितारलेले आहे.

एकूणच जगण्याची कला शिकवणारे हे पुस्तक आवर्जून वाचावे असे!!

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

[email protected]

9822553857

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈