श्री मुबारक उमराणी

 

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “गुलमोहोर” (कवितासंग्रह ) – कवी मेहबूब जमादार ☆ श्री मुबारक उमराणी  ☆ 

पुस्तक  …….     गुलमोहर ” (कवितासंग्रह )

लेखक   …….    कवी मेहबूब जमादार

प्रकाशक …..    अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर

मूल्य …..…..      ₹ १५०/-

 

” गुलमोहर ”  मेहबूब जमादार.*झाडांच्या आणि मानवी जीवनाच्या काळजाशी नाळ जोडणारा  कवी, मेहबूब जमादार. 

गुलमोहर या त्यांच्या कवितासंग्रहातील कवितांचा मागोवा घेतांना सहज अनुक्रमणिका पाहिली की या संग्रहातील विविध विषयांची कल्पना येते. या कवितासंग्रहात त्यांच्या त्रेपन्न कविता असून त्या कवितांची निसर्ग, कोरोना, दैनदिन जीवनातले प्रसंग, मानवी जीवनाविषयी भाष्य करणा-या कविता, काव्य विषयक कविता,आपली मते ठामपणे मांडणा-या कविता, निसर्ग, महापूर, भूतकाळातील मंगलमय स्वप्नजीवनात रमत वर्तमानाच्या बदललेल्या जीवनाविषयी खंत व्यक्त करणा-या कविता अशी विभागणी करता येईल. या संग्रहात विषयाची मांडणी करतांना कवितासंग्रहात विषय कप्पे न करता कवितांची मांडणी केली आहे.कवितांची भाषा सहज समजेल अशी आहे. गावबोलीतील, जीवनातील, परिसरातील, गाव, शेत, घर यांच्या कविता आहेत. परिसरातील निसर्गात त्यांचे मन रमते, तिळगंगेच्या अवतीभवती, झाडीवेलीत, हिरव्यागार खाचरात रमत कविता लेखन केल्याची स्पष्ट जाणीव कविता वाचतांना होतेच.

पिंपळाच्या फांदीचा खोपा झुलतो अप्रतिम कल्पना. सुगरणीच्या कलेपासून आपण काहीच शिकलो नसल्याची खंत मेहबूब जमादार मांडत, रानाशी संवाद साधत,  जुनेपण, लाकडी नांगर, कुळव ,कुरी, गोठ्यातील जनावरे, देशी पिक हे आठवत नाविन्याच्या हव्यासापोटी शेती कसण्यात केल्या जात असलेल्या बदलामुळे जमिनीत  मीठ फुटले अन्  त्राण गेल्याची खंत मांडत बालपणातील सुखद आठवणीत रमत, आजच्या मुलांच्या बालपणातील जीवन बालपण हरवलेले असल्याचे ते सांगत

“आज हे सारं आठवलं की

डोळे  नकळत दाटून येतात

निवांतपणी जगण्याचे ते

क्षण मनात साठून राहतात.”

  ज्या निसर्गानं मोकळी हवा, पाणी, माती, निसर्ग याची जपणूक करा असे सांगत  ‘गड्या डोळे उघडून बघ, जाळून टाक हा मोहोपाश’ असे ठणकावून सांगतो.आणि मित्रास म्हणतो,

“गड्या मिस करतो की नाही ” असं म्हणताना सारं जीवनचक्र त्यांना आठवते. शाळा, शेत, सुगी, चोरून  सायकलवरून पिक्चरला जातानाच्या रात्री, मित्रासोबत केलेले फाटक्या धडप्यातलं जेवण, गर्दीतून बस पकडत सुंदर पोरगी शेजारी येईल यांची वाट पहात असणारे क्षण, विहिरीवरची मोट, मोटेवरचं गाणं आठवत न कळत आपण काय अन् कसे “मिस “करतो, हे वाचतांना मन क्षणभर भूतकाळात रमते त्यामुळे डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्यावाचून राहत नाहीत. असे कितीतरी सहज अनुभव कवी मानवी ह्दयपटलावर लेण्यासारखे कोरून जातो. त्यांची कविता ओबडधोबड आहे पण त्यातून जीवन जगतानांचे सुखद धक्के मनाला आल्हाद देत जातात. वारंवार वाचण्याची आपोआप ओढ लागते.

मेहबूब जमादार यांच्या कविता रवंथ केल्यावरच त्यांच्या मनात असणारा जीवनानुभव कळतो. कवितांचे शब्द आपले होतात. मेहबूब जमादार  त्या कवितांचा आकार पहात नाहीत तर त्या आकारातून जीवनसत्य साकार करण्याचा त्यांचा प्रयत्न प्रत्येक कविता वाचतांना जाणवतो.

काळजात शब्दांची पेरणी करत उरातली दगदग कवी मांडतो. झेंड्याचे बदलणा-या रंगात रंगणारी माणसे मात्र तीच आहेत हे विदारक सत्य मांडून जातो. माणूसकीची पानगळ त्यांना सतावतांना दिसते.पानगळ झालेल्या झाडांना पुन्हा पालवी फुटते मात्र माणूसकी गळून पडते त्याला पुन्हा माणूसकीची पालवी फुटत नाही. देवाच्या देवा-यात देवत्व नाही तर कष्ट करणाऱ्यांच्या हातात, नांगर-खूरप्यात तो “भाकर होऊन भेटतो ,भाकरीच्या जुन्या धडप्यात ” अशी सुंदर देवत्वाची कल्पना माडणांरा कवी गावच्या ओढ्यात निसर्गाचं लेणं शोधत फिरतो. तो माणसांपेक्षा निसर्गात रमताना दिसतो.

 “शब्दांना फुलवूनी मी लिहिता राहिलो “

असा शब्दांचा भुकेला कवी येथे आपणास भेटतो. वीज आल्यावरचे जीवन कसे झाले मांडताना ते लिहितात,

“गांवी वीज आली तेव्हा

उतरलं डोळ्यांत आभाळ चांदणं

विरून गेल्या अंधार – रात्री

सरुनिया गेलं काळोख जगणं “

असं मांडत

 ‘नाती मात्र विस्कटून गेली, मनातली माणूसकीची वीजचं गेली’

अशी खंत त्यांना सतावते.

“तुझ्याचसाठी ” या कवितेत जीवन सहचारणीस म्हणतात माझे जीवन तुझेच देणं आहे,संकटाच्या उन्हात तुझ्यामुळेच चांदणं फुलले,मी आता सर्वस्वी तुझाच झालो म्हणत,

” बहरता स्पर्श तुझा तो मजसाठी अनमोल होता ”  आणि

” काहीच मजकडे नसता,

  गेलो रमून तुझ्यात

तू दिसता फुले बहरली,

केवळ तुझ्याचसाठी.”

 ही जाणीवही तो विसरत नाही.

“कोरोना “महामारीच्या काळातील कविता या वास्तव समाजाचं चित्रण करतात.

या महामारीने सारे शिकविले,लॉक डाउन मधील जीवनानुभव मांडणा-या कविता लक्ष वेधून घेतात. गर्दीचा मोह आवरावा माणसाने, कायद्याचा वचक नसल्याची जाणीव करुन कवी देतो.निवडणूकीत तुकड्यासाठी मतदारांनी भुलू नये, त्याने नीतिमत्ता,सन्मान,प्रतिष्ठा ही गावच्या वेशीवरच जळू लागली. हे ही सांगायला ते विसरत नाहीत.

जीवनाचा अर्थ, प्राजक्त , कोकणची वाट, शब्द, पूर, माझी कविता, नांगरणी, रान,

पहाटे दवात, वारी, अंगण, आयुष्या, गुलमोहर या कविता पुन्हा पुन्हा वाचण्याचा मोह होतो.

कवितेतील यमक उच्च कोटीचे असून काही कविता सहज गाता येतात. यातील प्रतिमा अन् प्रतिभा, नवकल्पनांची योजना, विषयातील विविधता, त्यातील मानवी जीवनमूल्ये, अवतीभोवतीच्या निसर्गाचे वर्णन, मनातील खंत, शल्य, बोच,

हुरहुर, मानवी जीवन बदलांचे परिणाम, रोजच्या घटनांचा वेध घेत जीवन जगतांना त्यांना जे जे वाटले ते ते आपल्या  शब्दांत मांडण्याचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.

हा कवितासंग्रह संग्रही असावा असाच असून मुखपृष्ठावरील चित्र चित्रकार अवधुत लोहार,नेसरी यांनी अप्रतिम रेखाटले आहे. कदाचित त्यांच्या गावी हायस्कूलच्या मैदानावरील डेरेदार  झाडच असावे.  मुखपृष्ठ उत्कृष्ट झाले आहे .अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर यांनी कवितासंग्रह प्रकाशित केला आहे.

कवी मेहबूब जमादार यांनी आपल्या कवितेचे सारे हक्क, श्रेय आपल्या पत्नी सौ.मुमताज यांना देऊन आपल्या जीवनातील पत्नीचे महत्व या निमित्ताने अधोरेखित केले आहे. हे ही कौतुकास्पदच आहे.

मा.प्राचार्य विश्वास सायनाकर सर यांची प्रस्तावना म्हणजे सायनाकर सरांची शाब्बासकीची थाप आहे ती मेहबूब जमादार यांच्या साहित्यवाटेवर दीपस्तंभ ठरेल अशीच आहे. सर म्हणतात,

“मेहबूब जमादार यांचा प्रतिभेचे मनोहर इंद्रधनुष्य

असेच निरंतर आल्हाद, दिलासा, आशेचा प्रकाश देत राहो”  मीही अशीच प्रार्थना करुन या कवितासंग्रहाचे स्वागत करतो आणि कवी मेहबूब जमादार यांना पुढच्या लेखनासाठी हृदयपूर्वक शुभेच्छा देतो.

 

© श्री मुबारक उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments