श्री विकास मधुसूदन भावे
पुस्तकांवर बोलू काही
☆ यशपुष्प….डाॅ.आशुतोष रारावीकर ☆ श्री विकास मधुसूदन भावे ☆
पुस्तकाचे नाव – यशपुष्प
लेखक — डाँ आशुतोष रारावीकर
प्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन
किंमत – २०० रुपये
कधीकधी आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सहज गप्पा मारत बसलेले असतो त्यावेळेस कोणीतरी मित्र किंवा मैत्रिण असं काही एखादं वाक्य बोलून जातात कि लगेचच त्या वाक्याला दाद देत आपण म्हणतो “आत्ता माझ्याकडे पेन आणि कागद असता ना तर ताबडतोब तुझं हे वाक्या मी टिपून घेतलं असतं”. आपल्या बोलण्याला आणखी दोन तीन मित्रांचा दुजोरा मिळतो आणि नंतर आपण तो प्रसंग आणि ते वाक्य दोन्हीही विसरून जातो.
मित्रहो, मी जर तुम्हाला सांगितलं की आयुष्याला वळण लावणा-या, क्वचितप्रसंगी आपलं कुठे काय चुकतंय हे सांगणा-या अशा वाक्यांचा समुच्चय असलेलं पुस्तक माझ्या वाचनात आलं आहे तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. “यशस्वी जीवनासाठी विचारपुष्पांचा खजिना” असं अधोरखित केलेलं वाक्य असलेलं “यशपुष्प” हे त्या पुस्तकाचं नाव आहे. डाँ आशुतोष रारावीकर यांनी हा वाक्य समुच्चय या पुस्तकाद्वारे रसिक वाचकांच्या हाती दिला आहे.
“यशपुष्प” या पुस्तकाचे लेखक डाँ आशुतोष रारावीकर यांच्या वडिलांचं नाव यशवंत आणि आईचं माहेरचं नाव पुष्पा! या दोन नावांचा समर्पक उपयोग करून डाँ आशुतोष रारावीकर यांनी या पुस्तकाचं नाव “यशपुष्प” असं ठेवलं आहे. डाँ रारावीकर यांचे वडील ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ होते तर आई संस्कृततज्ञ आणि साहित्यिक होती. स्वत: डाँ रारावीकर यांची शैक्षणिक पार्श्वभूमी समृध्द आहे.
या पुस्तकात समाविष्ट केलेली काहीकाही वाक्यं आपलं कुठे चुकतंय ते सांगतात. आता हेच वाक्य पहा “शर्यतीत पुढे जाण्यासाठी दुस-याला पाडायचं नसतं ….. आपण आपला वोग वाढवायचा असतो” किंवा “पुढे जाताना कधी आणि कुठे थांबायचं हेही कळायला हवं. कधीतरी दोन पावलं मागे येणं हे सुध्दा दहा पावलं पुढे जाण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग असू शकतो” आपण गंभीरपणे विचार केला तर आपल्या लक्षात येतं कि कधीकधी आपणही हे समजून न घेता बरोब्बर याच्या विरूध्द कृती आपल्याकडून केली जाते. “प्रयत्न हे आनंदाचं साधन नसून पूर्ती आहे …. ही अनुभूती .येते तेंव्हा जीवनात आनंदाशिवाय काहीच उरत नाही”. मित्रहो, हा अनुभव घेण्यासाठी प्रयत्न कधीच अर्ध्यावर सोडायचे नसतात, पण आपण नेहेमीच ते अर्ध्यावर सोडून देतो त्यामुळे या वाक्याचा अर्थ आपल्याला कधीच गवसत नाही. उदाहरणादाखल दिलेली अशी काही वाक्यं या पुस्तकात विखुरलेली आहेत. यशस्वी जीवनासाठी या पुस्तकाचा गंभीरपणे विचार होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आयुष्यात येणा-या निरनिरीळया प्रसंगी कसं वागावं किंवा कसं वागू नये हे या पुस्तकातली ही वाक्यं गंभीरपणे घेतली तर नक्कीच लक्षात येईल.
“गंध अंतरिक्षाचा, “स्मित लहरी”, “लाँकडाऊनच्या वेळेत” आणि “पुष्पांजली परमेशाला” अशा चार भागात या पुस्तकातील विचारलहरी विखुरलेल्या आहेत.
सकाळ समूह, नाशिकचे माजी संचालक-संपादक आणि २०१० साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या पुस्तकाला लाभली असून ग्रंथाली प्रकाशनातर्फे या पुस्तकाची तिसरी विस्तारीत आवृत्ती २० सप्टेंबर २०२१ला प्रकाशित झाली आहे.
© श्री विकास मधुसूदन भावे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈