1

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “संवादू अनुवादू” – उमा वि कुलकर्णी ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “संवादू अनुवादू” – उमा वि कुलकर्णी ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

पुस्तक  – संवादू अनुवादू

लेखिका – उमा वि कुलकर्णी

प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाउस 

मूल्य –  450 रु

संवादु अनुवादु (आत्मकथन)

‘उमा वि कुलकर्णी’ हे नाव वाचले की डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या पर्व, वंशवृक्ष, मंद्र या भैरप्पांच्या कादंबऱ्या! आम्हाला त्या मराठीत वाचनासाठी उपलब्ध करुन दिल्या त्या उमाताईंनी ! वास्तविक शिवराम कारंथ, पूर्णचंद्र तेजस्वी, गिरीश कर्नाड, सुधा मूर्ती यांच्याही पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला आहे. काही पुस्तके, मालिका यांचेही लेखन केले आहे. परंतु भैरप्पा आणि उमताई हे समीकरण वाचकांच्या मनात अगदी पक्के बसले आहे. याच उमाताईंचे आत्मकथन म्हणजे ‘संवादु-अनुवादु’ हे पुस्तक!

महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील बेळगाव येथे त्यांचे बालपण गेले. वास्तविक घरात मराठी भाषा बोलत असले तरी आजूबाजूच्या लोकांच्या सहवासात राहून कन्नड पण त्यांना उपजतच येत होते. शिवाय पंजाबी घरमालक, नायर शेजारी त्यामुळे मल्याळम , मिलिटरीचे ठाणे शेजारीच असल्यामुळे हिंदी- इंग्रजी भाषेचा संस्कार , असे विविध भाषांचे संस्कार लहानपणीच त्यांच्यावर झाले.

नंतर विरुपाक्ष यांच्याशी विवाह झाल्यावर त्यांना कन्नड बोलण्याचा सराव करावा लागला. ती भाषा कळत असली तरी बोलायला आणि लिहायला – वाचायलाही त्यांना जमत नव्हती. मग इतके अनुवाद त्यांनी कसे केले हा वाचकांना प्रश्न पडतो.

पण एक प्रसंग असा घडला की त्या अनुवादाकडे वळल्या. शिवराम कारंथ याना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. विरुपाक्ष यांनी ती कादंबरी मिळवून वाचून काढली.त्यांचे वर्णन ऐकून उमाताईना पण ती वाचण्याची उत्सुकता वाटू लागली. पण नुसते कथानक ऐकून त्यांचे समाधान झाले नाही. मग उमताईंनी त्यांना ती हट्टाने वाचून दाखवायला सांगितली.आणि सहजच जे ऐकले ते मराठीत लिहून ठेवायला सुरुवात केली. आणि नकळतपणे अनुवाद लिहिला गेला. तेथूनच त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली.

त्याच प्रवासाची कहाणी म्हणजे हे आत्मकथन आहे. या प्रवासात उमाताई आपल्याला गुंतवून ठेवतात. त्यांनी ज्या लेखकांचे साहित्य अनुवादित केले ते सर्व लेखक वेगवेगळ्या विचारधारेचे होते. त्यांची लेखनशैली वेगवेगळी होती. तरीही त्याचा अनुवाद करताना कुठेही उमाताई कमी पडल्या नाहीत. त्यांची अनुवादित पुस्तके तितक्याच रसिकतेने वाचली जातात आणि हेच अनुवादकाचे कौशल्य आहे. कित्येकदा अनुवादकाला दुय्यम स्थान दिले जाते. तसेही अनुभव यात त्यांनी मांडले आहेत. आहे तसे, घडले तसे मांडण्याचा प्रयत्न दिसून येतो. तो केवळ त्यांचाच प्रवास नाही , तर वाचकांनाही उत्सुकता निर्माण करणारा आणि ती शमवणारा लेखनप्रपंच आहे. हे आत्मकथन आपल्याला अनेक गोष्टींवर विचार करायला लावणारे, अंतर्मुख करणारे आहे. जीवनप्रवासात आलेले कटू गोड अनुभव त्या एकाच तराजुतून तोलतात. म्हणूनच अपत्य नसल्याची खंत न बाळगता आपल्या पुस्तकरुपी अपत्यात त्यांनी तो आनंद शोधला.   अनुवादातून मिळणारा आनंद व्यक्त करताना त्या म्हणतात,“ मूळ लेखक कितीही प्रतिभावान असला तरी त्याच्या निर्मितीला मर्यादा आहेत; पण अनुवादकाला ही मर्यादा नाही.अनुवाद त्याला आयुष्यभर साहित्यक्षेत्रात रमायची सोय करुन देतो. आपल्या आयुष्यात अनुवादक कितीतरी उत्तमोत्तम कलाकृती आपल्या वाचकांना देऊ शकतो.” वेगळ्या प्रकारचा सर्जनात्मक आनंद त्यांनी या लेखनात शोधला आणि हेच त्यांचे संचित आहे. म्हणूनच त्या म्हणतात की,“आमचे अनुवाद आणि आमचे जीवन इतकं एकमेकांत मिसळून गेले आहे की ते वेगळे काढणे आता शक्य नाही.”

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈