सौ राधिका भांडारकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “समाजभूषण” – देवेंद्र भुजबळ  ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर  

पुस्तकाचे नांव : समाजभूषण

लेखक आणि संकलक : देवेंद्र भुजबळ

प्रकाशक:–  लता गुठे {भरारी प्रकाशन}

प्रथम आवृत्ती : ५ सप्टेंबर २०२१

मूल्य :  रुपये २००/—

“…दैनंदिन जीवनात व व्यापार उद्योगात काम करत असताना ,आपण वास्तववादी,  विज्ञाननिष्ठ, 

अध्यात्मवादी असणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर कष्टाला प्रामाणिकपणाची जोड द्या .चिकित्सक रहा.व नवीन कौशल्य आत्मसात करा. तात्पुरता विचार न करता, दीर्घकालीन विचार करा.व व्यसनांपासून लांब रहाल तर तुमचे यश निश्चित आहे….”

.”..स्वत:साठी जगत असताना इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने केल्यास, सर्व समाज सुखी झाल्याशिवाय रहाणार नाही…”.

“…महिला ही केवळ कुटुंबच एकत्र करते असे नाही, तर समाजदेखील एकत्र करण्यात तिचा मोलाचा वाटा असतो. महिलांनी कौटुंबिक जबाबदारीबरोबर समाजासाठी देखील वेळ देऊन आपले अस्तित्व निर्माण करावे.नवीन ओळखी निर्माण कराव्यात. समाजाला एकत्त्रित करुन समाजाची प्रगती साधावी. कारण जेव्हां समाज एकत्र येतो, तेव्हां सर्वांची प्रगती होत असते….”.

“….मनुष्य आयुष्यभर शिकतच असतो. मुलांना शिकवता शिकवता त्यांच्याकडून देखील अनेक गोष्टी शिकत असतो. मुलं म्हणजे देवाघरची फुलं..ती निरागस ,प्रेमळ, निस्वार्थी, निर्मळ मनाची असतात. मुलांमधील सकारात्मक गुण, त्यांच्यातील उर्जा, आपल्याला सदैव प्रसन्न ठेवते…”

—–असे लाखमोलाचे संदेश मा. देवेंद्र भुजबळ यांनी संपादित केलेल्या समाजभूषण या पुस्तकातून मिळाले. या पुस्तकात जवळजवळ पस्तीस लोकांच्या, जे स्वत:बरोबर समाजाच्या ऊन्नतीसाठी प्रयत्नशील, प्रयोगशील राहिले, त्यांच्या यशकथा आहेत. सोमवंशीय क्षत्रीय कासार समाजातले हे मोती देवेंद्रजींनी वेचले आणि ते या पुस्तकरुपाने वाचकांसमोर ठेवून, जीवनाविषयीचा दृष्टीकोनच तेजाळून टाकला…

एक जाणवतं, की ही सारी कर्तुत्ववान माणसं एका विशिष्ट समाजातलीच असली, तरी देवेंद्रजींचा उद्देश व्यापक आहे. सर्वसमावेशक आहे…अशा अनेक व्यक्ती असतील ज्यांच्या यशोगाथा प्रेरक आहेत. त्या सर्वांप्रती पोहचविण्याचं एक सुवर्ण मोलाचं काम करुन, अपयशी, निराश, भरकटलेल्या दिशाहीन लोकांना उमेद मिळावी या सद्हेतूने त्यांनी हे पुस्तक लिहीले हे नक्कीच—

मराठी माणसं स्वयंसिद्ध नसतात. उद्योगापेक्षा त्यांना नोकरी सुरक्षित वाटते. पाउलवाट बदलण्याची त्यांची मानसिकता नसते —या सर्व विचारांना छेद देणार्‍या कहाण्या या पस्तीस लोकांच्या आयुष्यात डोकावतांना वाचायला मिळतात.

बहुतांशी या सार्‍या व्यक्ती सर्वसाधारण ,सामान्य पार्श्वभूमी असलेल्या  कुटुंबात,जन्माला आलेल्या.   पण जगताना स्वप्नं उराशी बाळगून जगल्या. यात भेटलेल्या नायक नायिकेचा सामाईक गुण म्हणजे ते बदलत्या काळानुसार बदलले. त्यांनी शिक्षणाची कास धरली. धडाडीने नवे मार्ग निवडले. संघर्ष केला .काटे टोचले. मन आणि शरीर  रक्तबंबाळ झाले .पण बिकट वाट सोडली नाही. न्यूनगंड येऊ दिला नाही.आत्मविश्वास तुटू दिला नाही. वेळेचं उत्तम नियोजन, कामातील शिस्त, प्रामाणिकपणा, आधुनिकता, प्रचंड मेहनत, चिकाटी व नैतिकता, व्यवसायातल्या बारकाव्यांचा सखोल अभ्यास हे विशेष गुण असल्याने ते यशाचे शिखर गाठू शकले…

शिवाय यांना समाजभूषण कां म्हणायचं..तर ही सारी मंडळी स्वत:तच रमली नाहीत .आपण आपल्या समाजाचे प्रथम देणेकरी आहोत या भावनेने ते प्रेरित होते..समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपलं यश वाटलं—-

हे पुस्तक वाचताना आणखी एक जाणवलं, की आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अनंत क्षेत्रं आपल्यापुढे आव्हान घेऊन उभी आहेत. फक्त त्यात उडी मारण्याची मानसिकता हवी. आणि व्यापक दृष्टीकोन हवा. कुठलंही काम कमीपणाचं नसतं. स्वावलंबी ,स्वाभिमानी असणं महत्वाचं आहे…

या पुस्तकातील ही पस्तीस माणसं, त्यांच्या कार्याने, विचारप्रणालीने, मनाच्या गाभार्‍यात दैवत्वरुपाने वास करतात—

शिवाय विविध क्षेत्रात नेत्रदीपक कर्तुत्व गाजवणार्‍या या पस्तीस लोकांबद्दल वेचक तेव्हढंच लिहीलं आहे. एकही लेख पाल्हाळीक नाही. हे सर्व श्रेय,मा. देवेंद्र भुजबळ, रश्मी हेडे, डॉ.स्मिता होटे, दीपक जावकर ,प्रसन्न कासार, या लेखकांच्या शब्द कौशल्याला आहे.

अत्यंत सकारात्मक, प्रेरणादायी, ऊर्जा देणारं,,फक्त युवापिढीसाठीच नव्हे तर ज्येष्ठांसाठी सुद्धा —-असं हे सुंदर पुस्तक.संग्रही असावं असंच—

देवेंद्रजी आपले अभिनंदन तर करतेच.  पण माझ्यासारख्या वाचनवेडीला पौष्टिक खुराक दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! आणि मन:पूर्वक शुभेच्छा !!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments