श्रीमती उज्ज्वला केळकर
पुस्तकावर बोलू काही
☆ 23 जानेवारी – ‘जीवनरंग’ – सौ.पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ एक आस्वादन – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
सौ.पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
23 जानेवारी – जीवनरंग (एक आस्वादन)
आज सौ. पुष्पा प्रभुदेसाई यांच्या जीवनरंग या ललित, वैचारिक लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. यातील काही लेख वेगवेगळ्या स्पर्धांच्या निमित्ताने लिहिले गेले आहेत. त्या त्या लेखांखाली तसा तपशील लेखिकेने नोंदविलेला आहे. यापैकी बरेच लेख यापूर्वी ई-अभिव्यक्तीवरही प्रसारीत झाले आहेत. आता हे सगळे लेखन एकत्रितपणे बघताना लेखिकेइतकाच वाचकालाही आनंद होत आहे.
कोणत्याही ‘शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी’ गणेशाचे स्मरण, स्तवन, पूजन करण्याची आपली परंपरा आहे. इथेही लेखिकेने पहिला लेख श्री गणेशावरच लिहिला आहे, ‘मला भावलेला गणेश.
गणेशाच्या सूक्ष्म रूपाविषयी त्या लिहितात, ‘निसर्गाची नियमबद्धता टिकवणारा नियंता, तोच गणेश. पंचमहाभूतांची शक्ती म्हणजे गणेश. गणनेच्या मुळाशी असलेली अधिष्ठात्री देवता, ती शक्ती म्हणजे गणेश. ‘त्वं मूलाधारो स्थितोसी नित्यम’ असं संस्कृत अवतरणही त्या देतात. उत्पत्ती, स्थिती, लय या सगळ्यासाठी लागणारी शक्ती म्हणजे गणेश.
हे झालं, गणेशाचं सूक्ष्म रूप. गणेशोत्सवाचे वेळी आपण गणपती आणून पूजा-अर्चा करतो, ते याचं स्थूल रूप आहे. या पार्थीव गणपतीची पूजा करताना, निसर्गाचा र्हास होऊ नये, म्हणून काळाजी घ्यायला हवी असं त्या सांगतात आपल्याला गणेशाचं सूक्ष्म रूपच भावतं असंही सांगत त्या लेख संपवतात.
पुष्पाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य असं की त्या त्या विषयाची अद्ययावत माहिती त्या लेखात देतात. पर्यावरणआणि मी असा शब्द उच्चारताना पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही पंचमहाभूते त्यांच्या मनापुढे आहेत. यात सातत्याने प्रदूषण होत चाललाय, याची त्यांना खंत आहे. या प्रदूषणापुढे जाऊन त्या म्हणतात, अंतराळात, याने, रॉकेटस यांच्या स्फोटातून येणारी धूळ, धूर, वाफ, आवाज सगळं भयावह होत चाललय.. प्रदूषणावर उपाय योजना सांगताना, त्या म्हणतात, ‘वनौषधींची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे. यासंबंधी त्या आणखी लिहितात, सोमवल्लीसारखी प्रचंड ऊर्जा देणारी वनस्पती आज केरळ आणि हिमालयातच फक्त 50 किलो . उरली आहे. प्रदूषणाचा विचार करताना, त्या पुढे लिहितात, या पंच महाशक्तींबरोबर माणसाचा मन ,बुद्धी, अहंकार हेही प्रदूषित होत चालले आहेत.
‘वटवृक्षाची सावली’ या पुढच्या लेखात त्या लिहितात, कीटक, पक्षी, प्राणी, माणसं यांना आधार देणार्या, शांत, गार सावली देणार्या वटवृक्षाचं जतन करायला हवं. मग ती आज या वृक्षाचं जतन केलेली ठिकाणे सांगते. ‘शिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली इथे अडीच एकरात वटवृक्ष पसरला आहे. कोलकत्याला ‘शिवफूट बोटनिकल गार्डन’ मधल्या वटवृक्षाचा पसारा एवढा आहे की त्याच्या छायेत चार ते पाच हजार लोक बसू शकतात.त्याचे वय 350 वर्षे आहे. असे वृक्ष जपायला हवे. ज्यांनी ते जपले, त्यांना त्याचे श्रेय द्यायला हवे.
अखंड सावधपण हे लेखाचे नाव वाचल्यावर वाटतं, माणसाने अखंड सावध का असाव? कसं असावं याबद्दल लेखिकेला काही सांगायचं असावं, पण तसं आजिबात नाही, अगदी लहान लहान कीटकांपासून मोठ-मोठे पशू जगताना सावधगिरी कशी बाळगतात, याचे वर्णन आहे. सहवासातुनी जीवन घडते, या लेखातही, त्यांच्या घरातल्या कोंबड्या, बोके, कुत्री , पोपट इत्यादींच्या सहवासाविषयी लिहिले आहे. त्यांच्या आठवणींविषयी लिहिले आहे, ‘’माणुसकीचे व्रत’ या लेखात त्यांनी म्हंटले आहे, ‘जीवसेवा हीच ईश्वर सेवा’ हे तत्व लक्षात घेऊन अनेक संस्था सेवा करीत आहेत. त्या संस्थांना तीर्थक्षेत्र, स्वयंसेवकाला तीर्थरूप आणि त्यांच्या हातून घडणारी सेवा हे तीर्थकर्म असं म्हणायला काय हरकत आहे? असं म्हणत, बेवारशी प्राणी, पक्षी यांची काळजी घेणार्या ’ब्लू क्रॉस’, मुंबईची S. P. C.M. (सोसायटी फॉर प्रिव्हेंशान ऑफ कृएल्टी टू अॅनिमल), इंडियन हरपेटोलॉजिकल सोसायटी, राहत या संस्थांची महिती दिलीय. व काही काही प्राण्यांची माहिती देऊन, त्यांना तिथे कसा आसरा मिळाला, ते संगीतलय. ’प्रारब्ध’मधे मिल्ट्रीमध्ये सामान वाहणार्या पेडोंगी खेचराची माहिती येते. पाकिस्तानने या खेचरासहित काही खेचरांना पळवून नेलं. संधी मिळताच ते खेचर पाठीवरच्या सामनासहित, ज्यात बॉंबगोळे, माशिनगन इ. साहित्य होतं, त्याच्यासकट भारतीय हद्दीत आलं. त्याचा सत्कार होऊन त्याचं नाव गिनीज बुकामध्ये नोंदलं गेलं. ही सगळी माहिती दिल्यावर आपणही एका जखमी, लंगडणार्या गाढवावर कसे उपचार केले. हे सांगते. दत्तक विधान या लेखातही बंड्या आणि गुंडी या कुत्र्याच्या पिलांचे दत्तक विधान कसे झाले, ही माहिती येते ‘ लेखिकेला कुत्रा, मंजर, घोडा, गाढव इ. प्राण्यांबद्दल ,लळा, आपुलकी असल्याने, त्यांच्यावरचे अनेक लेख पुस्तकात आहेत.
सामाजिक समरसता’या लेखात टेलिफोन बुथ असल्यामुळे फोन करायला येणार्यांशी थोडं-फार बोलून त्यांची सुखदु:ख समजून घेऊन, त्यांना सहानुभूती दाखवल्यामुळे, तसंच त्यांच्या. आनंदात सहभागी झाल्यामुळे सामाजिक समरसतेचा सुंदर अनुभव कसा आला, त्याचे वर्णन केले आहे.
वनौषधी संरक्षण: एक आव्हान आणि उपाय’ या लेखात एक पुराणकथा येते. एक ऋषी आपल्या विद्यार्थ्यांना निरुपयोगी वनस्पती आणायाला सांगतात. एक जण कुठलीच वनस्पती आणत नाही. ऋषी त्यालाच शाबासकी देतात आणि सांगतात, जगात निरुपयोगी अशी एकही वनस्पती नाही. आहेत त्या वनौषधींचं जतन केलं पाहिजे व वेगवेगळ्या वनौषधींची लागवड करायला प्रोत्साहनही दिलं पाहिजे.
याशिवाय नदीजोड प्रकल्प, भारतीय रेल्वे , विवेकानंद स्थापित रामकृष्ण मिशनचे ऐतिहासिक कार्य, मराठीच बोलू कौतुके इ. लेखही अगदी वाचनीय झाले आहेत.
सर्वांनी एकदा तरी वाचून बघावे, असे हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्याने लेखिकेबद्दलेच्या अपेक्षा अधीक उंचावल्या आहेत.
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈