सुश्री प्रभा सोनवणे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “जाणिवांच्या परिघात” …स्वाती दाढे “सुखेशा” ☆ परिचय – सुश्री प्रभा सोनवणे 

प्रगल्भ जाणिवेची कविता ….

स्वाती दाढे “सुखेशा” हे नाव वाङ् मय क्षेत्रात सुपरिचित आहे. गेली अनेक वर्षे  अनेक दर्जेदार मासिकांमधून तिच्या  कविता प्रकाशित होत आहेत.

सुखेशा झाडाझुडपात, पानाफुलात, पक्षांमध्ये रमणारी संवेदनशील कवयित्री,तिची कविता तिच्या सौम्य, मृदुल व्यक्तिमत्त्वासारखीच तरल, हळूवार आहे, त्यात कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश नाही. या कवयित्रीने कुठलीच पताका खांद्यावर घेतलेली नाही, या कवितेत कुठलाच “वाद” नाही तरीही ही समग्र कविता अतिशय प्रगल्भ आहे,

या कवितांना आध्यात्मिक बैठक आहे, निसर्गाची ओढ आहे,स्त्रीजाणिवा, मैत्री, प्रेम, सामाजिक बांधिलकी, आई…..असे अवती भवतीचे सारे विषय ही कविता चितारते!

“जाणिवांच्या परिघात” हा सुखेशाचा दुसरा कविता संग्रह आहे. तिचा “मन हिंदोळा हिंदोळा” हा कविता संग्रह २०१५ मधे प्रकाशित झाला आहे. “जाणिवांच्या परीघात” मध्ये त्यानंतरच्या म्हणजे २०१६ ते २०२१ या कालखंडात लिहिलेल्या आहेत, बहुतांश कविता विविध मासिकांमधून प्रकाशित झाल्या आहेत!

या संग्रहातील कविता सुसंस्कृत मनाचे हुंकार आहेत, एक शिस्तबद्ध सहजसुंदर, सुरेख शब्दकाळा असलेली ही कविता निश्चितच मोहात पाडते. कवयित्रीने आपल्या कवितेचे तीन भागात वर्गीकरण केले आहे. पहिल्या भागात सुंदर अभंग रचना आहेत.

कमलिनी पत्र कोरडे जलात

निर्लिप्त, स्वमग्न डोलतसे

या अभंग रचनेमागे कवयित्रीचे फार मोठे चिंतन आहे हे जाणवते, एकूणच काव्य रचनेत चिंतन, मनन, अभ्यासू वृत्ती, व्यासंग जाणवतो!

व्यासांची प्रतिमा उष्टावे जगात

ते महाभारत नित्य येथे ॥

जीवनातील सत्य उकलून दाखवणारे अनेक अभंग दाद घेऊन जातात.

स्वशोधाची, आत्मभान असलेली ही कविता आहे. स्री म्हणून जगताना आलेले अनुभव, क्वचित कुचंबणा,उपेक्षा खूप बारकाईन तिची लेखणी टिपते, तिने केलेल्या रचनांना  ती गझलसदृश म्हणते, ती कुठल्याही वादात अडकत नाही,

या ठिकाणी मला ख्यातनाम हिंदी कवी निरज यांचा कुणीतरी सांगितलेला किस्सा आठवला, ते गझल समीक्षकांना म्हणाले होते, “तुम्ही माझ्या रचनांवर काही टीका करा, त्या माझ्या गितिका आहेत. “

सृष्टी घेते बहुविध रूपे,मोहक कधी भेसूर

परी न लोपो अंतरीचा तो निर्मळ उमदा सूर

या सर्व कवितांमध्ये कवयित्रीने अंतरीचा निर्मळ उमदा सूर जपलेला आहे.अनेक रचना खूप मोहक आहेत, अगदी मनात रुंजी घालणा-या !

नकळत हासुनि पाहता तुझ्याकडे

वावडि इश्काची उठवतात लोक

किंवा 

हवे तसे सजून धजून, पुरव हौस स्वतःची

हाक येता सोडून सारे निघायला हवे

 या सर्व कवितांमधे आत्मचिंतन आहे, ही कविता प्रांजळ,प्रामाणिक आणि स्वच्छ आहे! या कवितेने स्वानंद स्वर जपलेला आहे.कवयित्रीने बंगाली भाषा आत्मसात केली,त्यात विशेष प्रावीण्यही मिळवले. मा.रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याचा अभ्यास व अनुवाद केला आहे, सुखेशाची लेखणी चौफेर संचार करणारी आहे,या कवयित्रीला चांगल्या गोष्टींचा ध्यास आहे आणि  एकला चालो रे…..या उक्ती प्रमाणे ती आत्ममग्न राहून  हा ध्यास जपते आहे.

माझ्यावर मी टीका करणे आहे सोडून दिले

मीच स्वतःला कमी लेखणे आहे सोडून दिले

आजकालच्या जमान्यात प्रत्येकाची श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची चढाओढ लागलेली दिसते, अत्यंत सामान्य वकुबाची माणसेही बढाचढाकर स्वतःच्या कार्य कर्तृत्वाची खोटी शेखी मिरवताना दिसतात तेव्हा खरोखर असा प्रश्न पडतो आपणच का स्वतःला इतकं कमी लेखतोय? विनयशील रहातोय? आपल्याकडे जे आहे ते स्वतःचं आहे, प्रांजळ आहे, निखळ आहे मग का स्वतःला कमी लेखतोय आपण?

 या संग्रहातील पुढील द्विपदी पहा–

भरभर किती बाई आवरु हा पसारा

चिडचिड अति होई कोंडला जीव कारा

अशी अप्रतिम रचना ती सहजपणे लिहून जाते.

तिस-या भागात संमिश्र कविता आहेत, तृणी या पादाकुलक वृत्तातील कवितेत मनोहर निसर्ग चित्र आहे, “रद्दी” ही कविता मला विशेष आवडली,यात प्रत्येक कवयित्री/लेखिकेचे  सनातन दुःख नेमकेपणाने आले आहे, प्रतिभा ही ईश्वरदत्त देणगी असलेल्या स्त्रीची उपेक्षा…श्रेय न देण्याची वृत्ती हे सार्वत्रिक सत्य आहे, ” ” श्रेयाचा लाभ न होणं,या सारखा दुसरा शाप नाही ” असं म्हटलं जातं ते  “रद्दी” या कवितेत दिसतं.

“तिनोळी” या नाजूक काव्य प्रकारातल्या काही कणिका–

माघाची चाहूल

खोडांवर खळबळ

आली की पानगळ

*****

वाढतं वय

ओसरतं सौंदर्य

मनभर औदार्य

या सर्व कवितांमध्ये विविधता आहे,जीवनातील महत्वपूर्ण असे विषय या कवितांमधे आले आहेत.

सावळ मेघांनी कोंदले आभाळ

आता रानोमाळ जलोत्सव

ही कवयित्री निसर्गावर नितांत प्रेम करते हे तिच्या अनेक कवितांमधून जाणवते!

स्त्रीपुरूष समानतेची तिची मागणी सौम्य शब्दात ती व्यक्त करते.

सद्यस्थितीवर भाष्य करणारी दोन विडंबन गीते अंतर्मुख करणारी आहेत.  “जाणिवांच्या परिघात” दखल घेण्याजोगा, वाचनीय, आरस्पानी कविता संग्रह आहे. या कवितांमधून कवयित्रीच्या प्रगल्भ जाणिवा जाणवत राहतात!हा काव्यसंग्रह अनाहत प्रकाशनाची सुंदर पुस्तक निर्मिती आहे.

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Ashlesha Mahajan

“जाणिवांच्या परिघात” ह्या कवितासंग्रहाचे अतिशय आत्मीयतेने केलेले हे स्वागतशील रसग्रहण आहे. प्रभा सोनवणे ह्या ज्येष्ठ कवयित्री असून त्यांनी सुखेशा.(स्वाती दाढे ) यांच्या पुस्तकावर सविस्तर लिहिले आहे, हे फार महत्त्वाचे आहे.

स्वाती दाढे

धन्यवाद प्रभाताई सोनवणे आणि संपादक ..