सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही?

☆ १२ जुलै १९६१… सुश्री आश्लेषा महाजन ☆ प्रस्तुती – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

१२ जुलै १९६१

साहित्य प्रकार | कादंबरी

लेखिका | आश्लेषा महाजन

प्रकाशक | इंकिंग इनोव्हेशन

~~~~~~

१२ जुलै १९६१

काही तारखा काळावर आपलं अस्तित्व कोरून ठेवतात त्यातलीच ही एक तारीख. या तारखेनं पुनवडी ते पुणे अशा एका मोठ्या स्थित्यंतरावर आपला ठसा उमटवलेला आहे.

पानशेत पूर ! पुण्याचा संपूर्ण कायापालट करणारी घटना ही समस्त पुणेकरांची एक दुखरी नस आहे. करोनासारख्या जागतिक महामारीनंतरही ही घटना पुणेकर विसरू शकले नाहीत. याचा पुरावा म्हणजे करोनावासात १२ जुलै २०२१ या दिवशीच या पुराला तब्बल साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही कादंबरी प्रकाशित झाली.

पानशेत पुराच्या अनेक आठवणी आजही पुणेकरांच्या मनात जिवंत आहेत. माझा या आठवणीशी अप्रत्यक्ष संबंध असा की आमची सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला ही सुरुवातीला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची शाळा होती. ती पुरात पूर्णपणे नष्ट झाल्यानं आबासाहेब गरवारे तिचं पुनर्वसन केलं. नुकत्याच झालेल्या नूतनीकरणानंतरही शाळेत हॉलमधल्या भिंतीवर पुराचं पाणी चढलं होतं तिथे लाल रंगात खूण केली असून पुराचा उल्लेख केलेला आहे. यावरूनच पानशेत पुराचं महत्त्व दिसून येतं. तसंच पुराच्या काळात पुणेकर असणाऱ्या माझ्या वडिलांनी तो पूर स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला त्यात ते स्वतः आर्किटेक्ट असल्यानं पूरग्रस्तांची घरं, त्यांचं बांधकाम, डागडुजी अशा अनेक गोष्टी त्यांच्या बोलण्यात यायच्या त्यामुळे ही कादंबरी वाचण्याची उत्कंठा माझ्या मनात निर्माण झाली.

जेव्हा एखाद्या सत्यघटनेवर आधारित काल्पनिक कथानकाची निर्मिती केली जाते तेव्हा लेखकाचा खरा कस पणाला लागतो. त्यात ती सत्य घटना जर अनेकांचे आयुष्य बदलवून टाकणारी असेल तर त्याच्याशी निगडीत अनेक धागेदोरे हे पिढ्यानुपिढ्या जपले गेलेले असतात. अनेकांच्या आयुष्यात त्यामुळे स्थित्यंतरं निर्माण झालेली असतात त्यामुळे त्या घटनेकडे ते केवळ कथा किंवा साहित्य या अंगाने बघू शकत नाहीत. अशावेळी वाचकांच्या मनातला हा ‘सल’ ओळखून त्यांची जखम तीव्रतेनं भळभळणार नाही याची काळजी घेत पण वास्तवातले अनेक धागे पुराव्यानिशी उलगडून सांगत त्यावर आधारित काल्पनिक कथानक रचणं हे अवघड काम आश्लेषा महाजन यांनी सहज पेललं आहे.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावरुन त्यावेळच्या हाहाकाराची झलक पहायला मिळते. त्यामुळे पुस्तक उघडल्यानंतर पुराच्या कुठल्या अनामिक प्रसंगांची लाट आपल्यावर कोसळणार आहे अशी साशंकता मनात होती. पण तसं घडलं नाही कारण ही कादंबरी या घटनेनंतर बऱ्याच वर्षांनी लिहिली आहे. आणि ही घटना उलगडली ती आजच्या काळातल्या तरुणांनी… त्यामुळे या घटनेची तीव्रता ही प्रत्यक्षात जरी जास्त असली तरी काळाच्या फरकाने, कथानकाच्या मांडणीमुळे तितकीशी जाणवत नाही. या पन्नास वर्षांत पुण्याचा झालेला कायापालट केवळ एक शहर म्हणून नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या ही झालेला बदल आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळतो. आणि या बदललेल्या दृष्टिकोनातून ही घटना वाचली जाते.

मोबाईल, वाय-फाय, इंटरनेट, लॅपटॉप अशा आधुनिक जगात जन्मलेली पिढी आणि तिच्याद्वारे उलगडत गेलेली पानशेत पुराची ही घटना आपल्याला या पुराकडे त्रयस्थपणे बघायला प्रवृत्त करते. पुरात घटनांचा इतिवृत्तांत, त्यावरच्या बातम्या, झालेलं नुकसान, आरोपप्रत्यारोप, राजकारण, समाजकारण अशा गोष्टी थेट न सांगता पात्रांच्या शोध मोहिमेतून कथानकाचा एक भाग म्हणून सांगितल्या आहेत.

पुरातन वस्तू आणि वास्तूंची आवड असलेली आर्किटेक्ट, इंटेरियर डेकोरेटर शैली, भाषाप्रेमी देश-विदेशात सतत भटकंती करणारा इंटरनॅशनल लॅग्वेज सर्व्हीसेसचा संस्थापक चित्ततोष, पर्यावरण प्रेमी ऋतुपर्ण आणि पुरातत्त्व अभ्यासक सुदर्शन या मुख्य पात्रांच्या संशोधन कार्यातून ‘पानशेत पूर’ समजू लागतो. प्रतिभा, वसंत आजोबा, पुणतांबेकर आजी, इ. उपपात्रंही ही पुरकथा आपापल्यापरीने उलगडून सांगतात. शिवाय घटनेचे साक्षीदार असलेली यातली अमानवी पात्रं म्हणजे जुने वाडे आणि खिडक्या यांच्या असण्यातून आणि नसण्यातूनही पुराची तीव्रता जाणवत राहते.

कादंबरीची सुरुवातच होते ते मुळी पुराणकालीन रचनेचा उत्तम नमुना असलेल्या खिडक्यांच्या शोधातून… आणि मग पुढे या खिडक्यांच्या निमित्ताने बंद वाड्याआड घडणाऱ्या आणि पुराने दबून गेलेल्या काही घटना काही प्रसंग हे समोर येतात. या कथानकात खिडकीचा केलेला वापर हा अनेक अर्थानं प्रतीकात्मक आहे. तसंच वाडा हे पुण्याचं गतकालीन सांस्कृतिक वैभव असलेलं प्रतीक आणि त्याच्या नामशेष होण्याच्या घटनेतून उलगडत जाणाऱ्या काही उपकथा यादेखील प्रतीकात्मकतेचा उत्तम नमुना म्हणता येतील.

आधीच म्हटल्याप्रमाणे या कादंबरीतून केवळ पुराबाबतच नव्हे तर बदलत चाललेल्या मानवी नातेसंबंधांबाबतचाही वेगळा विचार वाचायला मिळतो. विशेषतः स्त्री पुरुष संबंध, मैत्र या भावनेवरती या कथानकात ऊहापोह केला आहे.

आश्लेषा महाजन यांची ही पहिलीवहिली कादंबरी… त्यामुळे लेखनात ताजेपणा जाणवतो पण त्याबरोबरच काही प्रसंग हे गरजेपेक्षा अधिक सविस्तर लिहिले गेलेत असंही जाणवतं. कथानकात रंजकपणा यावा, पात्रांचे आपसातले बंध जाणवावेत यासाठी ते लिहिले गेले असले तरी क्वचित प्रसंगी शोधकार्यातला थरार त्यामुळे मंदावल्यासारखा वाटतो.

असं असलं तरीही तरुणाईच्या उत्साहातून या कथानकाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन, कादंबरी वाचनातला रस शेवटपर्यंत टिकवतो हे नक्की. एका गंभीर आणि वास्तव घटनेवर आधारित काल्पनिक कथनातली ही मांडणी प्रत्येकानं आवर्जून वाचावी अशी आहे.

चित्रपट अथवा वेबसिरीजसाठी हे कथानक उत्तम पर्याय असून लवकरच या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळावं ही सदिच्छा!

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Ashlesha Mahajan

धन्यवाद “प्रतिलिपि “. आपल्या ह्या सर्वदूर पोचणाऱ्या व्यासपीठावर आपण माझ्या “१२ जुलै, १९६१” ह्या पुस्तकावरील परीक्षण प्रकाशित केलेत.
तृप्ती कुलकर्णी, खूप खूप आभार. माझ्या ह्या पहिल्याच कादंबरीविषयी अनेक मुद्दे अधोरेखित करत, त्यातील वैशिष्ट्ये व मर्यादा यांची अतिशय संयत पण रसाळ पद्धतीने आपण मांडणी केली आहे.
पुनश्च धन्यवाद.