मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “फॅारएव्हर फॅार्टी-एका योध्याची अमर कहाणी” – अनुवाद लेखिका – सौ. अनुराधा गोरे ☆ अनुवाद लेखिका – सौ. अनुराधा गोरे ☆ सौ. वीणा आशुतोष रारावीकर

सौ. वीणा आशुतोष रारावीकर

सौ. वीणा आशुतोष रारावीकर यांनी संगणक तंत्रज्ञान, व्यवस्थापन व पदार्थविज्ञान या विषयात उच्चशिक्षण घेतले आहे.  एक लोकप्रिय ललित लेखिका म्हणून त्यांचे विविधांगी लिखाण नामवंत वृत्तपत्रे व मॅाम्सप्रेसो या ब्लॅागसाइटवर प्रकाशित झाले आहे. अनेक कथा, लघु कथा, लेख, कविता, पुस्तक परिक्षण, अर्थगर्भ सुविचार, शब्दांकन, कलाकृती असे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले आहेत. त्यांच्या स्वतःच्या साहित्य वाचनाचे रेडिओवर कार्यक्रम होत असतात. अर्थगर्भ लिखाण करणाऱ्या या लेखिकेला योगाभ्यास, पर्यटन, वाचन, क्रीडा प्रकार आणि टपाल व चलन संग्रह यातही रुची आहे.

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “फॅारएव्हर फॅार्टी – एका योध्याची अमर कहाणी” ☆अनुवाद – लेखिका – सौ. अनुराधा गोरे ☆ 

   

पुस्तक – फॅारएव्हर फॅार्टी – एका योध्याची अमर कहाणी

अनुवाद – लेखिका – सौ. अनुराधा गोरे

पृष्ठ संख्या – २३२

सर्व जग कोव्हीडचा सामना करत होते आणि त्याचवेळी भारतीय सेनेला आपली सीमा अबाधित ठेवण्यासाठी लढावे लागत होते. गलावण खोऱ्यातील युध्द किंवा भारत – पाकिस्तान सीमा रेषेवरील तणाव, अशा बातम्या आपल्याला नवीन नाहीत. त्यातच पुढे कानावर येणारी बातमी, “शत्रू पक्षाशी झालेल्या चकमकीत आपला एक जवान शहिद झाला……” दरवेळी अशी बातमी ऐकली की पोटात गलबलायला लागते आणि विचार सुरू होतो तो या जवानांच्या कुटुंबियांचा. काय करत असतील या जवानांच्या पत्नी आणि कसे असेल त्यांचे आयुष्य?

लष्करातील लोकांचे आयुष्य सामान्य नागरीकांप्रमाणे कधीच नसते. मग ते कसे असते? याचे उत्तर कर्नल वसंत वेणूगोपाळ यांच्या सुविद्य पत्नी सुभाषिनी वसंत आणि वीण प्रसाद यांनी लिहिलेल्या “Forerver Forty” या इंग्रजी पुस्तकात मिळते. या पुस्तकाचा अनुवाद केला आहे सौ. अनुराधा गोरे यांनी. सौ. अनुराधा गोरे या स्वतः शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री आहेत.

माणसाच्या मृत्यू नंतर काळ पुढे सरकत असतो. पण त्याचे आयुष्य त्या एका वयाच्या आकड्यावर थांबलेले असते. अशोकचक्र विजेते कर्नल वसंत यांच्या मुलीने आपल्या वडीलांबद्दल काढलेले उद्गार “फॅारएव्हर फॅार्टी”. तेच नाव या पुस्तकाचे आहे.

“मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” ही म्हण खरी ठरवणारे वसंत वेणुगोपाळ यांचे आयुष्य. त्यांना लहानपणापासून बंदुकीची, लष्करी गणवेशाची आवड होती. कॅालेज जीवनातील एन.सी.सी. मध्ये त्यांनी केलेली कामगिरी. त्यांची शिस्तप्रियता. अशा अनेक गुणांचे दर्शन त्यांचे बालपण आणि कॅालेजचे आयुष्य यात समजून येते.

नंतर सुरवात होते ती वैयक्तिक आयुष्याला. आपण सामान्य लोक आपल्या घरातील लोकांना, खास करून आपल्या जोडीदाराला गृहित धरतो. त्यांच्याकडून आपल्या अनेक अपेक्षा असतात. सैनिक कुटुंबातील अर्धांगिनीला हे करून चालत नाही. उद्याचा उजाडणारा दिवस आपल्यासाठी काय घेऊन येणार आहे, याची कधीच खात्री नसलेली ती अर्धांगिनी. दोघांच्या वैवाहिक जीवनात एकत्रित मिळणारे क्षण किती असतील, हे कधीच माहित नसणारी ती.

गेल्या साधारण दिड दशकात आपल्याला एकमेकांशी संपर्कात राहाणे खूप सोपे झाले आहे. पण लष्करातील कुटुंबियांसाठी हे नेहमीच एक आव्हान असते. त्यात सुभाषिनी आणि कर्नल वसंत यांचा काळ तर ऐंशी-नव्वदच्या दशकातील. एकमेकांशी संपर्क साधण्याचे साधन म्हणजे फक्त पत्र. त्यांनी लिहिलेल्या जवळपास चारशे पत्रातून हे पुस्तक जन्माला आले. ही पत्रे आणि त्यातील काही स्केचेस यातून ते आपल्या राहायच्या ठिकाणांचे हुबेहुब डोळयासमोर उभी करतात.

बरं ते पत्र वेळेवर पोहचेल याची खात्री कधीच नसायची. त्यातील मजकुर तपासला जायचा. म्हणजे आपल्याच जोडीदाराशी लिहिताना, फोनवर बोलताना किती जपून लिहावे, बोलावे लागते, याचे भान ठेवावे लागते.

सामान्य नागरिकाला लष्करातील प्रवेश परिक्षा, त्यांच्या संज्ञा, प्रतिज्ञा, रिती-रिवाज यातून कळतात. त्याचबरोबर त्यांचे खडतर, कष्टप्रद आयुष्य यांचे दर्शन यातून घडते. पाऊस असो किंवा वाळूची वादळे तंबूत राहाणे.

प्रेम आणि त्याग याचा खरा अर्थ हे पुस्तक वाचताना समजते. कारण बहुतेक वेळा घरातील सदस्यांचा वाढदिवस किंवा नवीन वर्ष अथवा सण अशावेळी, बहुतेक वेळा त्यांचे वास्तव्य दूर कुठेतरी दुर्गम भागांत असायचे.

पती निधनानंतर नायिकेने मांडलेले मनोगत सर्वोत्तम. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुभाषिनी यांनी शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या कुटुंबियांसाठी एक संस्था स्थापन केली आहे.

असे लष्करी आयुष्य जवळून पहाण्यासाठी, कर्नल वसंत सारख्या शूरवीरांप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पुस्तक सर्वांनी नक्कीच वाचले पाहिजे.

©️ सौ. वीणा आशुतोष रारावीकर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈