श्री सुहास रघुनाथ पंडित
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘स्वांतः सुखाय’ – सुश्री गायत्री हेर्लेकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
लेखिका : गायत्री हेर्लेकर.
प्रकाशक: साई प्रकाशन,सांगली.
किंमत: रू.150/-
मी माझ्या आनंदासाठी लिहितो असे साहित्यिक म्हणत असतो व ते खरेही आहे.आपल्या नित्याच्या व्यवहारात आपल्या हातून इतक्या कृती होत असतात की आपल्या नकळत आपण त्यातून स्वार्थ आणि परमार्थ साधत असतो. सुप्रसिद्ध लेखिका गायत्री हेर्लेकर यांच्या बाबतीतही असेच झाले आहे.स्वांत सुखाय लिहिता लिहिता त्यांनी नकळतपणे प्रत्येक वाचकाला सुख,आनंद वाटला आहे. माझ्या वाट्याला आलेल्या आनंदात सर्वांनाच सहभागी करून घेण्याचा हा एक प्रयत्न!.
कथा,कविता,नाटिका,अध्यात्म, व्यक्तिपरिचय अशा साहित्याच्या विविध प्रांतात कामगिरी बजावलेल्या लेखिका गायत्री हेर्लेकर यांचे ‘स्वांत सुखाय’ हे पुस्तक नुकतेच वाचनात आले.हे पुस्तक म्हणजे विविध विषयांवरील लेखांचा एक संग्रहच आहे. यामध्ये मनाशी संवाद साधणारे,घर संसार कुटुंब याविषयी बोलणारे ,अनुभव कथन करणारे,आठवणींचा खजिना उघडणारे, वैचारिक आणि अध्यात्म व भक्तीमार्गाकडे घेऊन जाणारे लेख आहेत. विषयांची अशी विविधता असल्याने पुस्तक वाचताना सर्व प्रकारच्या वाचकांना खिळवून ठेवेल यात शंकाच नाही.सुरूवातीच्या लेखातच त्यांनी मनाच्या रंगमंचावर जीवनपट मांडला आहे.मन,नाम,मना अशा शब्दांची उकल करत करत न उमगणा-या मनाला कसे उमगून घ्यावे तेही सांगितले आहे. ‘फुलले रे क्षण माझे’ हा लेख वाचल्यावर मन फुलवणारे क्षण स्वान्त सुखायच असतात हे मनाला पटते. निरागस बालमनाचे दर्शन घडवणारा लेखही यात आहे.मनाची शुद्धी करण्याचा मार्ग सांगणारा ‘ न दिसणारी गुलामगिरी’ सारखा लेख आहे.एकांत आणि लोकांत, एकांत आणि एकटेपणा यातील फरक समजावून देतानाच, स्विकारलेला एकांतवास सुखाकडे कसा घेऊन जातो हेही त्या सांगतात.
सुश्री गायत्री हेर्लेकर
लेखिकेतिल गृहिणीही त्यांची पाठ सोडत नाही. त्या बदलत्या कुटुंब व्यवस्थेवर भाष्य करतात .’अगं आई गं ‘ म्हणताना आईची महती गातातच पण बापावरही अन्याय करत नाहीत.या लेखात त्यांनी बाप मंडळींची दिलेली उदाहरणे बापाची बाजू उचलूनच धरतात. Child is the father of the man ची प्रचिती देणारा ‘मुलेही शिकवतात नकळत’ हा लेख असो किंवा स्वयंपाकघरातील अनुभवांचे रसाळ वर्णन करणारा लेख असो, त्यांच्यातील गृहिणीचे दर्शन होतेच.मार्केटिंगच्या वेडाची प्रांजळ कबुलीही त्या हसत खेळत देऊन जातात.
आठवणींशिवाय आयुष्याला काय अर्थ आहे ? चैत्रागौरीच्या आठवणींचे त्यांनी चैत्रांगणच मांडले आहे.श्रावणातील आठवणींच्या रेशीमधाराही मन चिंब करणा-या आहेत. काही अनुभव कथन करतानाही त्यांची भाषा लालित्यपूर्ण असते. औटघटकेच्या कलाकाराची ‘झाकली मूठ ‘ असो किंवा शिपाईमामांची राखी पौर्णिमा असो,दोन्ही प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.
सिलेंडर वरील त्यांचा लेख वाचून नाट्यछटेची आठवण होते. तर मायमराठीवरील त्यांचा लेख म्हणजे त्यांचे मराठी भाषेवरील प्रेम आणि अभिमान व्यक्त करणारा लेख आहे.
त्यांचे बरेचसे लेख हे वैचारिक व आयुष्यात आलेल्या अनुभवातून ,व्यासंगातून शिकायला लावणारे आहेत.चादरी विषयी लिहिता लिहिता त्या चिंतनाकडे घेऊन जातात. ज्येष्ठांच्या(इतरांना) खुपणा-या अपेक्षा त्या व्यक्त करतात .’सांज संध्याकाळ’ मधून त्यांनी संध्याकाळचे अनोखे दर्शन घडवले आहे.कोरोनाच्या दडपणातील काळात मनाने पाॅझिटिव्ह राहण्यासाठी सकारात्मकतेचा हसत खेळत उपदेश करतात. एका लेखातून त्यांनी पत्रकारितेवरही भाष्य केले आहे. तर कवितेचे विराट स्वरूप उलगडून दाखवताना त्या कवयित्रीच बनून जातात.सांस्कृतिक जडणघडणीमुळे मनुष्यप्राण्याला माणूसपण येते याची जाणीव करून देतात,आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या दोन बाजूही उलगडून दाखवतात. प्रत्यक्ष अनुभव घेतला असल्यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्राचा सर्व बाजूंनी अभ्यास करून मांडलेले विचार अत्यंत मौलिक आहेत.
पुस्तकाच्या अंतिम भागातील सात आठ लेख हे भक्ती आणि अध्यात्म याविषयी विचार व्यक्त करणारे वाटतात. विश्वाला गुरू मानताना त्या गुरू या शब्दाची व्याप्ती, अर्थ समजावून सांगतात. पारंपारिक गुरू,आधुनिक गुरू,सर्व क्षेत्रातील गुरू,कौटुंबिक गुरू,ग्रंथगुरू या सर्वांचे स्मरण त्यांनी ठेवले आहेच, पण आधुनिक काळातील संगणक या महागुरूसमोरही त्या नतमस्तक होत आहेत हे विशेष वाटते.
श्री स्वामी स्वरूपानंद हे तर त्यांचे श्रद्धास्थान आहे. त्यांना समजून घेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे.तुकोबारायांना पत्र लिहून त्यांनी पालखी सोहळा व वारकरी परंपरा याविषयी वेगळ्या पद्धतीने लेखन करून विषयाची गोडी वाढवली आहे. श्रीकृष्ण म्हणजे तर अनेक नात्यांच्या धाग्यांनी विणलेला मनमोहक गोफ.त्याचा एकेक पदर उलगडून दाखवताना भक्ती आणि श्रद्धा यांचेही दर्शन होते.ज्ञानेश्वरीचे अवलोकन करताना ‘ज्ञानेश्वरी’चे वेगवेगळे तीन अर्थ त्या समजावून सांगतात. सुख आणि आनंद याविषयी लिहिताना त्यांनी अनेक अध्याय,ओव्या,अभंग ज्ञानेश्वरी,वचने यांचा उल्लेख केला आहे.त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचल्याशिवाय ठेववत नाही. मानवी कल्याणासाठी तप अटळ आहे.पण जुन्या,प्राचीन आणि आधुनिक तपांची त्यांनी घातलेली सांगड अत्यंत समर्पक वाटते. विवेकाच्या उंबरठ्याशिवाय देहरूपी वास्तू सुखी होणार नाही हा विचार तर आजच्या काळात आवर्जून लक्षात ठेवावा असाच आहे.
पुस्तकातील सर्व लेख वाचून झाल्यावर ,त्याचे मुखपृष्ठ किती समर्पक आहे हे लक्षात येते.
यातील बरेचसे लेख कोरोना काळात लिहिलेले आहेत.तेव्हाच्या सक्तीच्या एकांतात त्यांच्याकडून झालेले हे लेखन सर्व वाचकांना सुखावणारे आहे.प्राध्यापिकेची भूमिका पार पाडलेली असल्यामुळे अवघड विषयही सोपा करून सांगण्याची कला त्यांना अवगत आहेच, हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. संपूर्ण लेखन हे साध्या,सोप्या भाषेतील असल्यामुळे चहा पिताना मोकळेपणाने गप्पागोष्टी कराव्यात असे झाले आहे. वाचक हा विद्यार्थी आणि रसिकही असतो.त्यामुळे त्याच्याशी उत्तम प्रकारे संवाद साधण्यात लेखिका यशस्वी झाल्या आहेत असे मला वाटते. या साहित्य- सुखाचा लाभ सर्व वाचनप्रेमींनी घ्यावा आणि वाटून द्विगुणीत करावा यासाठी हे माझ्या वाचनाचे अनुभव कथन.
पुढील लेखनासाठी लाख लाख शुभेच्छा !
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली.
9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈