सुश्री अरूणा मुल्हेरकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “गारवा” – लेखिका सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव – गारवा (काव्यसंग्रह)
कवियत्री – सौ. राधिका भांडारकर, पुणे
प्रकाशक – ॲड. जयमाला भगत, अजिंक्य प्रकाशन, वाशीम
मुद्रक – अजिंक्य एंटरप्राईझेस,वाशीम
अक्षर जुळवणी – अरविंद मनवर
प्रस्तावना – सौ. शोभा अवसरे (+91 98704 94993)
मुखपृष्ठ – कु. सायरा वाघमोडे ॲटलांटा (वय वर्ष्ये ९)
मूल्य – रू.१५०/—
सौ राधिका भांडारकर
माझ्या हातात सौ. राधिका भांडारकर यांचा गारवा हा नवा काव्यसंग्रह आला आणि जसजशी मी एकेक कविता वाचत गेले तसतशी मी त्यांत डुबूनच गेले.
एकूण ३३ कवितांचा हा संग्रह. ह्यात राधिकाताईंनी जीवनातील विविध विषय हाताळले आहेत. त्यात जीवनाविषयीचे तत्वज्ञान आहे, माणसांच्या प्रवृत्तींचे वर्णन आहे, जबाबदार नागरिक म्हणून त्यांची कर्तव्ये आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, आईची माया आहे, बदललेला काळ आहे, ईश्वरी शक्तीचा विश्वासही आहे.
बहुतांशी कविता मुक्त छंदात असल्या तरी काही कविता षडाक्षरी, अष्टाक्षरी, दशाक्षरी, अक्षरछंदातही आहेत. यावरून नियमबद्ध कविता लिहिण्याचाही त्यांना चांगलाच सराव असल्याचे दिसून येते.
भासमय आणि तुझे आहे तुजपाशी ह्या कवितांतून माणसाच्या प्रवृत्ती दिसून येतात. असमाधानी वृत्तीमुळे मृगजळामागे तो कसा धावतो नि त्याची फसगत होऊन नैराश्य पदरी येते हे त्यांनी साध्या सरळ सोप्या भाषेत दाखवून दिले आहे. त्या लिहितात…..
आपुले आपुल्यापाशी
परि नजर पल्याडी
ऊन पाण्याचाच खेळ
वाट खोटी वाकडी
खरंतर प्रत्येकच कवितेतील त्यांची भाषा सहज सुलभ असल्यामुळे कविता अधिक जवळची वाटते. कुठेही क्लिष्टता नाही, भाषेचे अवडंबर नाही.
ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद शिरावर असल्यानंतर केलेल्या कष्टाचे चीज होऊन सुखासमाधानाचे, आनंदाचे भरभराटीचे दिवस दिसतात हे सांगताना आशीर्वादया कवितेत त्या लिहितात…
आता काही कमी नाही
आयुष्यात कष्ट केले
आनंदाने केले सारे
त्याचे मात्र चीज झाले
आता खरे जाणवते
यशाकडे पाहताना
आशीर्वाद होता त्याचा
मन भरे म्हणताना
पदरया कवितेत पदराची बहुरूपे दाखवून जीवनाची वास्तवता कवियत्रीने वाचकांना सादर केली आहे.
पदर खांद्यावर
पदर डोक्यावर
तो कधी जरतारी
तर कधी ठिगळे लावलेला
सार्या संसाराची मदार या पदरावर असते. हलक्या फुलक्या शब्दांतून अतिशय गहन विचार या कवितेत मांडला आहे.
एखादी गोष्ट करायची नसली तर वेळ मिळत नाही ही सोयीस्कर सबब सर्वसाधारणपणे आपण सगळेच देत असतो. वेळच मिळत नाही ह्या कवितेत कवियत्री वेळ मिळत नसतो, तो काढायचा असतो आणि त्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते हा फार मोलाचा संदेश देतात.
मुलगा नसल्याची खंत आज आपण इतके प्रगत असलो तरी पुष्कळच कुटुंबात दिसून येते, किंबहुना समाजालाच त्याची जास्त चिंता असल्याचे दिसून येते. तीह्या त्यांच्या कवितेत राधिकाताईंनी समाजाला सडेतोड उत्तर दिले आहे. त्या लिहितात…
दोन लेकी लेक नाही?
प्रश्न भारी मनमोडी
यांना कसे समजावे
कन्या तिची माया वेडी
राधिकाताईंचा पिंड कथा लेखिकेचा.त्यामुळे त्यांना कथा कशी सुचते,त्याची निर्मीति कशी होते हे त्या सहजपणे त्यांच्या नादखुळा आणि शब्दगंगा ह्या दोन कवितांतून सांगून जातात.
ह्या पुस्तकात तीह्या शिर्षकाच्या दोन कविता आहेत. एक ती कन्या आणि दुसरी ती कविता. दुसर्या ती मध्ये साहित्यिक राधिकाताई दिसतात.
एक वादळ आलं
शब्दांच्या लाटा घेऊन
मनाच्या कागदावर फुटलं
आणि मन रितं केलं लिहून
साहित्य निर्मीतीची ही प्रक्रिया असं मन उफाळून आल्याशिवाय होऊच शकत नाही.
दप्तर ही अशीच मनाला चटका लावणारी कविता. कवियत्रीला आईच्या मायेचा ओलावा दिसतो तिच्या जपून ठेवलेल्या फाटक्या दप्तरात.
घरात पाव्हणे रावणे येणं, लेकी बाळी येणं, नातवंडांनी घर निनादून जाणं, ह्यासारखा आनंद कोणता? असे पाहुणे येती आणि क्षण ह्या दोन कविता वाचताना लक्षात येते.
“सारथी”, “धरावी कास”, “असे आणि तसे”, इत्यादी कवितांतून राधिकाताईं माणसांनी कसे जगावे, विवेक, सकारात्मकता, सत्यप्रियता वगैरे गोष्टी सुखी जीवनासाठी किती आवश्यक आहेत ते त्यांच्या सहज सुलभ शैलीतून वाचकांपर्यंत पोहोचवितात, त्यांना अमूल्य संदेश देतात.
धरावी कास या कवितेत सकारात्मक वृत्तीचे महत्व त्या सांगतात……
*अपयशामागून
यश हासते
सामोरी जाता
ओंजळी भरते
अगदी मोजक्या शब्दात किती महान तत्वज्ञान त्या सांगून जातात.
आयुष्यात पती~पत्नी हे नाते अतिशय पवित्र, प्रेमळ असते. पण तरीसुद्धा कधी कधी कसलातरी सल मनाला डाचत असतो. कुठे तरी काही कारणास्तव मन विषण्ण होते. अशीच मनोवस्था दाखविणारी तुकडेही दशाक्षरी काव्यरचना!
स्त्री कितीही शिकली तरी तिला स्वतःला बर्याचदा एका चौकटीत बंदिस्त करून घ्यावे लागते हे राधिकाताई त्यांच्या दार या कवितेत वाचकांना दाखवून देण्याचा प्रयत्न करतात.
तू असा मी अशी या कवितेत सेवा निवृत्त पती पत्नीचे नाते अगदी सहजरित्या वाचकांपुढे उभे केले आहे. तुझं नि माझं जमेना पण एकमेकांवाचून चालेना अशी गत ह्या सहजीवनात असते. वरवर कविता हलकी फुलकी वाटली तरी ती फार सखोल आहे.
गारवा ही कविता पहिल्या पावसाचे वर्णन करणारी. पावसाच्या आगमनाने हवेत जसा गारवा येतो तसाच तो मनालाही येतो हे भाव व्यक्त करणारी कविता.
आपल्या अवती भवती असणारी माणसं,नात्याचे बंध,जीवनात येणारे विविध अनुभव, कधी आनंदी तर कधी खिन्न असणारे मन, अशा परिस्थितीत ह्या संग्रहातील कविता वाचल्यानंतर एक प्रकारची ऊर्जा मिळाल्यासारखे वाटते, शांत वाटते म्हणून हा मनाला भासणारा गारवाच आहे.
सर्वच कविता वाचनीय आहेत, अधिकाधिक लोकांनी वाचाव्यात अशाच आहेत.
राधिकाताईंना माझ्या खूप खूप शुभेच्छा!त्यांची ही साहित्यसेवा अखंडित अशीच चालत राहो, त्यांनी लावलेला साहित्याचा हा नंदादीप दिवसानुगणिक उजळत राहो.
पुस्तक परिचय – सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈