मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘शिदोरी’ – सौ.उज्वला सहस्त्रबुद्धे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘शिदोरी’ – सौ.उज्वला सहस्त्रबुद्धे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

पुस्तकाचे नाव :शिदोरी

लेखिका: सौ.उज्वला सहस्त्रबुद्धे

किंमत रू.240/-

संपर्क:9423029985

☆ शिदोरी – भावनांच्या मंजि-यांनी बहरलेली काव्य वृंदा – सुहास रघुनाथ पंडित ☆

सौ.उज्वला सहस्त्रबुद्धे यांचे ‘शिदोरी’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात बत्तीस ललित लेख व पन्नास कविता आहेत. पहिला विभाग हा लेखांचा आहे व दुसरा विभाग हा कवितांचा काव्य मंजिरी या नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. आज आपण काव्य मंजिरी तील कवितां विषयी जाणून घेऊ.

काव्य-मंजिरी हा  काव्यसंग्रह येण्यापूर्वी त्यांनी गद्य व पद्य लेखन केलेले आहे. त्यामुळे लेखनकला ही काही त्यांच्यासाठी नवीन नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्या शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छितात. त्यामुळे मनात जसे तरंग उठतील तसे त्यांना शब्दरूप देऊन त्या लेखन करू शकतात. मनाची संवेदनशीलता त्यांना काव्य लिहिण्यास उद्युक्त करते. हे मन एके ठिकाणी स्थिर न राहता सर्वत्र भिरभिरत असते आणि सारे काही टिपून घेते.  मग त्यांच्या कवितेतून निसर्ग फुलतो, कधी भक्तीचे दर्शन होते,कधी कुटुंबवत्सलता दिसून येते, कधी जीवनविषयक दृष्टिकोन व्यक्त करते, कधी चिंतनशील मनाला मोकळे करते, तर कधी वर्तमानाची दखल घेते.एखाद्या कॅनव्हासवर वेगवेगळे रंग उधळावेत आणि त्याच्या मिश्रणातून एक आकर्षक कलाकृती तयार व्हावी त्याप्रमाणेच या काव्य तुलसीच्या शब्द मंजि-या फुलून आल्या आहेत.

या काव्यसंग्रहात आपल्याला विविध विषयांवरील कविता वाचायला मिळतात. देशभक्ती बरोबरच ईश्वरावरील श्रद्धाही दिसून येते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात लिहीलेली ‘स्वातंत्र्यदिनी स्मरण’ ही कविता किंवा तिरंगा, स्व. सावरकर या कविता मनातील देशप्रेमाची साक्ष देतात. तर गणपती, विठूमाऊली यांच्याबरोबरच सांगलीजवळील बागेतील गणपती मंदिराचे त्यांनी केलेले वर्णन डोळ्यासमोर चित्र उभे करणारे आहे. ‘कृष्ण वेडी’ ही कविता तर भक्तीमय प्रेमकाव्याचा सुंदर नमुनाच आहे.  

वर्तमानात घडणा-या घटनांची नोंदही त्यांनी घेतली आहे. कोरोनाग्रस्त काळामध्ये सहन कराव्या लागणा-या परिस्थितीचे, समस्यांचे यथार्थ वर्णन करून त्यातून बाहेर पडण्याचा आशावादही त्या व्यक्त करतात.

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

कवयित्री या जीवनाविषयी आशावादीच आहेत. मनावरची उदासीनतेची काजळी निघून जाईल असा विश्वास त्यांना वाटतो. उगवतीच्या सूर्याकडे पाहून, ठप्प झालेल्या समाजजीवनाला संयम सोडू नकोस असा धीर त्या देतात. श्रावणाची चाहूल लागताच त्यांना खात्री वाटते की ‘एक दिवस नक्की येईल, पूर्ववत होता तसा’. मृत्यूच्या छायेखाली गुदमरणारा श्रावण अनुभवताना त्यांना बालकवींचा श्रावणही आठवतो हे त्यांच्या जीवनावरील श्रद्धेचे प्रतिक आहे.

कवयित्रीच्या हातून स्त्रीसुलभ कुटुंबवत्सलता स्त्रवली नाही तरच नवल! नात्यांच्या रेशीमधाग्यात शब्द गुंफून सजलेल्या त्यांच्या कविता आजी होण्याचा आनंद व्यक्त करतात, आजी आणि नात यांच्या नात्यातील भावविश्व दाखवतात आणि नव्या पिढीबरोबर जुळवून घेण्याची तयारीही दाखवतात. मग ही कविता तीन पिढ्यांची होऊन जाते.

जीवन विषयक भाष्य करणा-या त्यांच्या कविताही वाचनीय आहेत. मनाच्या भोव-याला दैवाची गती मिळत असते. त्यामुळे जगत असताना पराधिनता ही असतेच असे सुचवणारी ‘भोवरा’ कविता असो किंवा ‘माती असशी, मातीत मिसळशी’ या उक्तीची आठवण करून देणारी ‘आयुष्याची उतरंड’ ही कविता असो, जीवनावर केलेले भाष्य हे सात्विक आस्तिकतेतूनच आले आहे हे जाणवते. ‘पिंपळ’ या कवितेतही मनाला दिलेली पिंपळाची उपमा किंवा आठवणींची घरटी या कल्पना नाविन्यपूर्ण वाटतात. याच कवितेतील

आसक्तीची मुळं इतकी

घट्ट रूजली आहेत भूमीत

की त्यांना जाणीव नाहीये

अस्तित्व धोक्यात आल्याची

या काव्यपंक्तीतून मानवी मनाची नेमकी अवस्था त्यांनी सांगितली आहे. ‘भरजरी शालू’ या कवितेतून तर त्यांनी आयुष्याचा आलेखच मांडला आहे.

आत्ममग्नता,चिंतनशिलता हा तर कविचा उपजत गुणधर्म. याच चिंतनशिलतेतून, असं असलं तरी, मन क्षेत्र, विसाव्याचे क्षण, मन तळं यासारख्या कविता जन्माला आल्या आहेत.विचारांच्या मंडलात मती गुंग होत असताना नेमके शब्द सापडले की कविता कशी जन्माला येते हे ही त्यांनी ‘कवितेचा जन्म’ या कवितेतून सांगितले आहे.

रसिक मनाला खुणावणारा,चारी बाजूला पसरलेला निसर्ग कविमनाला स्वस्थ बसू देईल का? अनेक सुंदर निसर्ग कवितांची निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे. केवळ निसर्ग वर्णन न करता त्यांनी काही ठिकाणी त्याचा संबंध मनाशी जोडला आहे. मनरूपी तुळशीला येणा-या विचाररूपी मंजि-या या त्यांच्या भावुक मनाचे प्रतिकच आहेत. ‘ॠतुंची फुलमाला’ ही एक नितांत सुंदर निसर्ग कविता आहे. निसर्गात बहरणारा प्रत्येक ऋतू मनही बहरवून टाकतो हे प्रसन्न मनाचे द्योतक आहे.एकीकडे सागराची साद ऐकताना त्याना समोर साहित्य सागरही दिसू लागतो. साहित्याच्या अथांगतेची जाण असणे म्हणजेच भविष्यकाळात या साहित्य सागरातील मोत्यांचा त्यांना शोध घ्यायचा आहे याची कल्पना येते. उनझळा, पावसास, रंगपंचमी या निसर्ग कविताही सुंदर दर्शन घडवतात. शब्दझरे या कवितेतून निसर्गातील सौंदर्य शब्दातून खुलवून शब्दांचे मोती बनवण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद वाटतो.

काव्याचा असा रसास्वाद घेताना, सौ. सहस्त्रबुद्धे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांनी यापूर्वी कविता लेखन केले आहे. आता काव्यसंग्रह काढून पुढचे पाऊल टाकले आहे.संवेदनशीलता आणि भावनाशीलता याबरोबरच त्यांनी काव्याकडे अधिक अभ्यासू वृत्तीने पाहिल्यास त्यांच्याकडून वृत्तबद्ध कविताही लिहून होतील असा विश्वास वाटतो. विषयांची आणि काव्यप्रकारांची विविधता त्यांच्या काव्यलतेला बहर आणत आहे. यापुढील काव्यसंग्रहात त्यांनी नवीन वाटा धुंडाळल्या आहेत याचा अनुभव वाचकांना यावा अशी अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या साहित्य प्रवासास शुभेच्छा!!.

© सुहास रघुनाथ पंडित

सांगली.

9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈