मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ फिन्द्री… सुश्री सुनीता बोर्डे ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? पुस्तकावर बोलू काही?

☆ फिन्द्री… सुश्री सुनीता बोर्डे ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

कादंबरी – फिन्द्री

लेखिका – सुनीता बोर्डे

प्रकाशक – मनोविकास प्रकाशन

किंमत – ३५० रू.

पृष्ठ संख्या – ३०३

…मला ही कादंबरी अशी भावली…वंदना अशोक हुळबत्ते

“फिन्द्री” या नावाचे आकर्षण वाटलं होतं.कोणता विषय,कसा मांडला असेल या कादंबरीत? या उत्सुकते पोटी मी ही कादंबरी वाचायला घेतली.कादंबरी वाचताना मी वेगळ्या विश्वात गेले.जे कथानक कादंबरीत वाचत होते ते सारे कल्पनेच्या पलीकडेचे होते. असं काही आपल्या आसपास घडत असते, ते ही विसाव्या शतकात हे ही पचण्यासारखे नव्हते.

संगीता ही या कादंबरीची नायिका.ही कादांबरी सत्य कथेवर आधारित असावी असे वाटते.तसा कुठे उल्लेख कादंबरीच्या प्रस्तावनेत वा मनोगतात नाही.पण कादंबरीत आलेले वर्णन आणि दाखले या वरून ती कथा सत्य असावी असे वाटते. स्त्री शिक्षणासाठी अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रात, शाहु,फुले, आंबेडकराची परंपरा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षण घेण्यासाठी नायिकेला किती संघर्ष करावा लागला हे या कादंबरीतून अधोरेखित होते.गावाकुसा बाहेरील दलित वस्तीचे,समाज जीवनाचे, जातपातीचे, तिथल्या विचारसरणचे,तिथल्या राहणीमानाचे,तिथली बोली भाषाचे आणि तिथल्या शिव्याचे देखिल यथोचित वर्णन लेखिकेने  केलं आहे.

या कादंबरीतील नायिकेचा बाप,हाच खरा या कादंबरीचा खलनायक आहे.मुले आईबापांच्या छत्रछायेत सुरक्षित असतात.मुलाच्या यशात आई-बाप सुख मानतात.मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे,उज्ज्वल यश मिळवावे असे प्रत्येक आई-बापाला वाटत असते. पण या कादंबरीतील बाप, मुलांना प्रेमच देत नाही.उलट मुलीचा जन्म नाकारतो‌.तिला नकुशी ठरवतो,तिचा दुष्वास करतो,तिच्या शिक्षणात काटे पेरतो,तिचे शिक्षण थांबवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करतो.एखादा सुखाचा क्षण कुटूंबात येतोय असे वाटत असतानाच बापच त्यांची माती कशी करतो.त्यांच्या उमेदीवर पाणी कसे फिरवतो.हे सारे प्रसंग लेखिकेने अतिशय ताकदीने मांडले आहे.हे प्रसंग वाचताना समोर घटना घडत आहेत असे वाटते. स्वत:ला घराचा कर्ता पुरुष समजणारा बाप मात्र कोणतेच कर्तव्य पार पाडत नाही. बायको म्हणजे आपली हक्काची वस्तू,रोज तिला दिवस रात्र राबवून घेतो आणि सकारण, विनाकारण रोज बडवतो.हाच त्याचा पुरूषार्थ.ती ही मार निमुट पणे सहन करते तेव्हा तिचा राग ही येतो. बायको आणि जनावर यात त्याला भेद वाटत नाही. इतके हाल करतो तिचे. तिच्या जीवाची पर्वा नाही त्याला. मुले बापाला भितात. भिऊन सश्या सारखी आईच्या पाठीमागे लपतात. तेव्हा बापाच्या माराचा प्रसाद त्यांना ही मिळतो.मुलीच्या शिक्षणात अडथळे आणतो. संगीताने बारावीची परीक्षा देऊ नये म्हणून हा दारूडा बाप तिची पुस्तके विहिरीत टाकतो.तरी ती काॅलेज मध्ये पहिली येते तेव्हा तो तिला मारतो तेव्हा त्या बापाच्या विचारसरणी ची कीव करावीशी वाटते.  अशा बापा कडून मुलांनी प्रेमाची काय अपेक्षा ठेवावी.

मुलीच्या शिक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीत पुरूष प्रधान संस्कृतीतील नवऱ्याशी दोन हात केलेल्या एका आईची ही कहाणी आहे.लढा आहे.आपल्या आई विषयी नायिकेला आदर आहे.तीआईला गुरू मानते.आईची शिकवण सांगताना लेखिकेने खुप चांगले विचार मांडले आहेत.ती आईच्या भाषेत म्हणते “कढीपत्याचे झाड बी बाईच्या जातीवाणीच! किती बी छाटा,लगीच धुमारे फुटात्यात त्याला,गरजे पेक्षा ज्यादा वाढायला लागला का फांद्या छाटल्याच म्हणून समजा!निऱ्हे चोखायचं,फेकायचं.खर तर तिच्या शिवाय सवसाराला चव नुसतीच पण तरी तिलाच साम्द्यात आधी फेकायला तयार असतात सारे.”स्त्री जाती विषयीचे एक तत्वज्ञान च सांगितले आहे

“आईच्या डोक्यावरच्या चुंबळी पेक्षा खरे तर तिच्या मनाची चुंबळ जास्त पक्की होती, म्हणूनच आई एकाच वेळी इतकी सारीओझी पेलू शकत असावी.” आई विषयी चे हे निरिक्षण सर्व  स्त्री वर्गाला लागू होते.

लेखिकेने प्रत्येक प्रकरण विचार पुर्वक लिहिले आहे.प्रत्येक प्रकरणातून एक विचार दिला आहे.गोधडी,बाभळीच्या काटा,दात काढणे,हे आणि या सारखे विषय एकेका प्रकरणातून सुंदर मांडले आहेत कुठे ही ओढाताण दिसत नाही. विषय सहज आला आहे.प्रत्येक प्रकरणातून कथानक पुढे जात राहते.वाचताना कंटाळा येत नाही.बोली भाषेतील किती तरी नव्या  शब्दाचा परिचय होतो.

आपण ज्या परिस्थितीत राहून नवराचा अन्याय सहन केला ती वेळ आपल्या मुलीवर येऊ नये म्हणून एका आईने जीवाचे रान कलेली ही कादंबरी आहे.याच कादंबरीत लेखिका म्हणते “खरंच,भाकरी हा असा गुरू आहे.जो धडा शिकवायला ,माणसाला शहाणं करायला त्याचं वय पहात नाही. भुकेची तीव्रता अन् भाकरीची कमतरता या दोन निकषांवर कोणत्याही वयाचा विद्यार्थी भाकरीच्या  विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊ शकतो.”

समाज व्यवस्थेवर,जातीपातीवर विचार करायला लावणारी,पुरूष प्रधान संस्कृती झुगारून देण्यास प्रवृत्त करणारी ही कादंबरी अनेक प्रश्न मनात निर्माण करते. अज्ञान आणि अन्याय हाच विकासातील मोठा अडसर आहे.तो दूर केला पाहिजे हा विचार देणारी ही कादंबरी आहे.दलित समाजातील मुलीच्या शिक्षणाच्या प्रश्नला या कादंबरीतून वाचा फोडली म्हणून मी लेखिका सौ.सुनीता बोर्डे यांचे हार्दिक अभिनंदन करते.सर्वानी ही कादंबरी वाचावी अशी अपेक्षा करते.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈