पुस्तकावर बोलू काही
☆ दुसरं वादळ… श्री शरद पोंक्षे – परिचय – सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती- सुश्री सुनीता डबीर ☆
एखादा दुर्धर रोग अचानक उद्भवल्यानंतर, जीवनाची आता काही शाश्वती नाही हे दाहक सत्य अगदी एका क्षणात अंगावर आल्यानंतरची माणसांची प्रतिक्रिया ही त्या त्या व्यक्तीच्या मनःशक्तीवर अवलंबून असते. धक्का सगळ्यांनाच बसतो, पण काही माणसे त्या धक्क्यामुळे कोलमडून जातात तर काही व्यक्ती जिद्दीने जमिनीत पाय गाडून उभे राहतात आणि त्या रोगावर मात करून दाखवतात. प्रसिद्ध अभिनेते, सावरकर भक्त आणि विचारांनी प्रखर हिंदुत्ववादी असलेले शरद माधव पोंक्षे शरद माधव पोंक्षे हे ह्यांपैकी दुसऱ्या गटात मोडणारे.
Hodgkins Lymphoma हा कर्करोगाचा एक प्रकार समजला जाणारा दुर्धर रोग शरद पोंक्षेंना झाला आणि एकाच दिवसात त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचंही आयुष्य बदलून गेलं. एक वर्ष सर्व कामधंदा सोडुन पोंक्षेंना घरी बसावं लागलं, १२ किमो साईकल्स आणि त्यांचे शरीरावर होणारे भयानक दुष्परिणाम, वर्षभर काम बंद असल्यामुळे येणारी आर्थिक असुरक्षिता आणि त्यामुळे भेडसावणारी अनिश्चितता, कुटुंबाला सतावणारी भीती आणि जीवघेणी वेदना ह्या सर्वांवर मात करून शरद पोंक्षे यशस्वीपणे या वादळातून बाहेर पडले. त्या अनुभवाची गोष्ट म्हणजेच ‘दुसरे वादळ.’ साध्या, सोप्या, ‘बोलले तसे लिहिले’ ह्या भाषेत लिहिलेले पुस्तक मी काल एका बैठकीत वाचून संपवले आणि शरद पोंक्षे ह्यांच्याबद्दल असलेला माझा आदर अजूनच वाढला.
कर्करोग, किडनी विकार किंवा हृदयविकार ह्यासारख्या दुर्धर रोगांशी लढा दिलेल्या लोकांची आत्मकथने ह्यापूर्वीही मराठीत पुस्तकरूपाने आलेली आहेत. अभय बंग ह्यांचे ’माझा साक्षात्कारी हृदयरोग’, पद्मजा फाटक यांचे ‘हसरी किडनी’ ह्यांसारखी पुस्तके तर व्यावसायिक दृष्ट्याही यशस्वी झालेली आहेत, मग ह्या पुस्तकात नवीन काय आहे? ह्या पुस्तकात नवीन आहे ती शरद पोंक्षेंची रोगाकडे बघायची दृष्टी, आणि त्यांची सावरकर विचारांवर असलेली अपार डोळस श्रद्धा, ज्या श्रद्धेने त्यांना ह्या रोगाकडे झगडण्याचे बळ दिले.
ह्याबद्दल लिहिताना पोंक्षे म्हणतात, ‘मानसिक धैर्य सुदृढ कसं करायचं हा प्रश्न पडला. त्यावर एकच उपाय. सावरकर. विचार मनात येताक्षणी कपाट उघडलं आणि माझी जन्मठेप चौथ्यांदा वाचायला सुरवात केली. ११ वर्षे ७ बाय ११ च्या खोलीत कसे राहिले असतील तात्याराव? गळ्यात, पायात साखळदंड, अतिशय निकृष्ट दर्जाचं अन्न, तात्याराव कसे राहिला असाल तुम्ही? ते देशासाठी ११ वर्षे राहू शकतात, मला अकराच महिने काढायचे आहेत, तेही स्वतःसाठी! हा विचार मनात आला आणि सगळी मरगळ निघून गेली’.
पोंक्षेनी ह्या पुस्तकात अतिशय प्रांजळपणे आपल्याला आलेले अनुभव मांडलेले आहेत. त्यांना ज्या ज्या लोकांनी मदत केली, मग ते शिवसेनेचे आदेश बांदेकर असोत, उद्धव ठाकरे असोत किंवा आताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत, त्या लोकांचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे. त्यांच्यासाठी म्हणून जे लोक कामासाठी थांबले त्यांचाही उल्लेख योग्य रीतीने पुस्तकात झालेला आहे. त्यांना काही डॉक्टरांचे आलेले वाईट अनुभवही पोंक्षेनी तितक्याच स्पष्टपणे लिहिलेले आहेत तसेच आयुर्वेद, होमियोपथी आदी उपचार पद्धतींचाही त्यांना चांगला फायदा कसा झाला हेही त्यांनी लिहिलेले आहे.
पुस्तक खरोखरच वाचनीय आहे. सर्व वयाच्या लोकांना सहजपणे वाचता यावे म्हणून अक्षरे जाणून बुजून मोठी ठेवलेली आहेत. एखाद्या दुर्धर रोगाशी लढणाऱ्या कुणालाही बळ देईल असेच हे पुस्तक आहे. नथुरामची व्यक्तिरेखा साकारताना पोंक्षेना सोसावा लागलेला विरोध हे शरद पोंक्षेंच्या आयुष्यातले पहिले वादळ आणि कर्करोगाशी दिलेला लढा हे दुसरे वादळ. मला विशेष आवडले ते हे की ह्या दोन्ही वादळांशी लढताना शरद पोंक्षेनी आपल्या तत्वांशी कसलीच तडजोड कुठेही केलेली नाही.
एक अभिनेते म्हणून शरद पोंक्षे मोठे आहेतच पण एक माणूस म्हणून ते किती जेन्यूईन आहेत हे ह्या पुस्तकाच्या पानापानातून जाणवतं. अभिनयासारख्या बेभरवश्याच्या क्षेत्रात वावरताना व्यावसायिक हितसंबंध जपायचे म्हणून माणसं क्वचितच रोखठोक, प्रांजळ व्यक्त होतात. पण शरद पोंक्षे ह्याला अपवाद आहेत. एका सच्च्या माणसाने लिहिलेले हे एक सच्चे पुस्तक आहे. अवघड परिस्थितीशी झगडावे कसे हे ह्या पुस्तकातून शिकण्यासारखे आहे. पार्थ बावस्करच्या शब्दामृत प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. Parth Bawaskar – पार्थ बावस्कर
– श्री शरद पोंक्षे
परिचय – सुश्री शेफाली वैद्य
प्रस्तुती- सुश्री सुनीता डबीर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈