सौ.अस्मिता इनामदार

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “सेवारती…” – डाॅ.दिलीप शिंदे ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

पुस्तक परीक्षण :

नाव : सेवारती

लेखक : डॉ. दिलीप शिंदे

प्रकाशक : साधना प्रकाशन – २०२१

किंमत : १००/-

आज सांगलीतच काय महाराष्ट्रातही डॉ. दिलीप शिंदे हे नाव परिचित आहे. डॉक्टर हा रुग्णांचा देव असतो अशी श्रद्धा अजूनही लोकांच्या मनात रुजलेली आहे. पूर्वी संपूर्ण कुटुंबाचा एकच पिढीजाद डॉक्टर असे. त्याला सर्व कुटुंबाचा आरोग्य इतिहास माहिती असे त्यामुळे कुणाला कोणते औषध देणे गरजेचे आहे हे त्याला समजत असे. तेव्हा आजच्या सारखे स्पेशालिस्ट नव्हते. डॉक्टर व कुटुंबीय यांच्यात एक भावनिक बंध जुळलेला असे.असे डॉक्टर आता दुर्मिळच झाले आहेत. पण त्याला अपवाद असणारे एक डॉक्टर आहेत – डॉ. दिलीप शिंदे. त्यांनी लिहिलेले

सेवारती या पुस्तकाची थोडक्यात ओळख मी करून देण्याचा प्रयत्न करतेय. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे वैद्यकिय क्षेत्रातील दुर्मिळ होत चाललेली ध्येयवादी सेवावृत्ती डॉक्टरांच्या रक्तातच भिनलेली आहे. डॉक्टर हा जणू देवदूतच असतो. त्यांची  “संवेदना” ही संस्था एक आदर्श सेवाभावी संस्था आहे. ‘ लागले रे नेत्र पैलतीरी ‘ अशा मनोवस्थेतल्या व अंथरुणावर खिळून पडलेल्या  वृद्धांचा व त्यांची संवेदशीलतेने, प्रेमाने शुश्रुषा व देखभाल करणाऱ्या डॉक्टर पती – पत्नी आणि परिचारिका यांचं कोरोना काळातील जगणं शब्दबद्ध करणाऱ्या या कथा आहेत. यातील १२ ही कथांचे संक्षिप्त वर्णन थोडक्यात नाही करता येणार. पहिल्याच “औक्षवंत होऊया” यात संस्थेचा ४ था वर्धापन दिन व डॉक्टरांचा वाढदिवस येथील वृद्ध कसा साजरा करतात याचं हृद्य दर्शन आपल्याला घडतं. ‘ पुरुष सगळे सारखेच ‘ या कथेत समाजात अजूनही पुरुष प्रधान संस्कृती मुळे स्त्रीला होणार त्रास दिसून येतो. ‘ वडिलांच्या विरोधाचा अर्थ ‘ अशी ही वेगळ्या धाटणीची कथा आपल्याला बापाचे प्रेम कसं असतं याचा प्रत्यय देते. राहत्या घरात सेवा केंद्र करण्यास त्यांचा विरोध का असतो हे कथा वाचल्यावर लक्षात येते.

‘ मी लग्न करू का नको ‘ हा केंद्रातल्याच एका परीचारीकेला पडलेला प्रश्न आपल्यालाही अस्वस्थ करून जातो. लग्नानंतर ही नोकरी सोडायची अट मुलाकडून आल्यावर तिने दिलेला नकार आपल्याला पटतो. तिला ते काम मनापासून आवडत असते. आरोग्य सेवेमध्ये परिचारिकेची भूमिका खूप महत्वाची असते., असे असूनही त्यांना नेहमी दुय्यम स्थान दिले जाते. समाजाचाही या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन फारसा निकोप नाही.

पुरुषाच्या यशस्वीतेमागे स्त्रीचे योगदानही मोलाचे असते ही गोष्ट डॉक्टर इथे विसरलेले नाहीत. ‘ बायकोचे योगदान ‘  ही कथा म्हणजे डॉ. नीलमचा जीवनपटच आहे. खऱ्या अर्थाने अर्धांगिनी म्हणून ती पूर्णपणे समर्पित झालेली आपल्याला दिसून येते. सहजीवनात आलेल्या काही कठीण प्रसंगात तिने दिलेला आधार एखाद्या दीपस्तंभा सारखा भर भक्कम होता असे डॉक्टर कबूल करतात.

आता पुढच्या कथेकडे पाहू.

‘ सहजीवन आणि समजूतदारपणा ‘.  या गोष्टीत एका वृध्द जोडप्याची स्थिती अशी आहे की आजोबा केंद्रात राहतात. मुलगा सून नोकरीवाले. आजोबा या दोघाशी नीट वागायचे पण आज्जी समोर आल्या की चिडचिड करायचे. बिचाऱ्या आज्जी बाहेरच बसून राहायच्या. १६ -१७ वर्षे ती दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. जर त्या दोघांनीही आपल्या सहजीवनात थोडा समजूतदार पणा दाखवला असता तर ही वेळ आली  नसती.

‘ जे टाळणे अशक्य ‘ या कथेत डॉक्टरांचे बालपण आपल्या डोळ्यांसमोर येते.  बालपणातल्या अनेक शालेय, शेतीच्या आठवणी त्यांनी विषद केल्या आहेत. काही काही अटळ गोष्टी दैवगतीने कशा निभावल्या गेल्या हे समजते.

दारूचे व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम यावर प्रकाश झोत टाकणारी कथा – ‘अवघड आहे’

संसाराची व स्त्रीची झालेली परवड आपल्याला विचार करण्यास भाग पाडते. कळते पण वळत नाही अशी आजची स्थिती आहे. एका बाजूस दारू पासून मिळणाऱ्या महसुलाविना अडचणीत येणारे सरकार आणि दुसऱ्या बाजूला सरकारने दारूबंदी करावी अशी अपेक्षा असलेल्या स्त्रिया.. अवघड आहे.

एक आदर्श शिक्षिकेला, आदर्श पत्नी, आदर्श माता नाही बनता आले त्यामुळे तिचा झालेला कोंडमारा ‘ मला तिचे तोंडही बघणार नाही ‘ या कथेत दिसून येतो. मुलीच्या मनात बसलेली आढी शेवटी दूर होते हीच एक समाधानाची गोष्ट.

‘ लढण्यात शान आहे ‘ नावातच आपल्याला कथेचं सार समजून येते. संवेदना केंद्राची व्याप्ती जसं जशी वाढत गेली तस तशी जागेची कमतरता भासू लागली. वर्षभर अनेक खस्ता काढून डॉक्टरनी एक नवा प्लॉट घेतला. बांधकामात खूप अडचणी येत होत्या. त्यातच कोरोना वाढत चालला होता. प्रकल्प अर्धाच राहतो की काय याचा ताण आला होता. पण त्यांच्या सासऱ्यांच्या पाठिंब्याने तो प्रकल्प हळू हळू आकाराला येत होता. लढायला बळ देत होता.

स्त्री पुरुषांमध्ये असणाऱ्या इगोला जरा जरी धक्का लागला तर दोघानाही कशी घुसमट सहन करावी लागते, हे ‘ बंधन आणि स्वातंत्र्य ‘ मध्ये आपल्या दृष्टीला पडते. इथे डॉक्टर एक विधान करतात –

” प्रत्येक कुटुंबात स्त्री पुरुषांमध्ये सहकार्य आणि संघर्ष चालूच असतो. स्त्री यथाशक्ती स्वतःवरील अन्यायाविरुद्ध संघर्ष करीत राहते, मात्र त्याचवेळी सहकार्य करणेही तिला भाग पडत असते ‘. किती रास्त म्हणणे आहे ना.

यातील शेवटची कथा आहे –

‘ कोरोना आणि मरण ‘

कोरोना शब्द उच्चारला तरी मरणाची भीती आणि आठवण होते आणि मरण म्हंटले तरी कोरोनानेच मेला अशी शंका मनात येई. ही गोष्ट त्या कोरोना काळात मनात पक्की बसली होती. संस्थेतील आजी – आजोबांना आपल्या नातेवाईकांना भेटता येत नव्हते. अशा या अभद्र काळात एका आजींचा मोठा मुलगा कोरोना नव्हता तरी घाबरून वारला होता आणि ही गोष्ट त्या आजीपासून लपवावी लागली होती. पुढे त्या आजी घरी गेल्यावर त्यांना ही बातमी सांगितली गेली.

अशा या १२ कथांना ललित भाषेचा बाज आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी खूप मुद्द्यांचा उहापोह केलाय.त्यातील काही अधोरेखिते :

  • भरल्यापोटी जीवनाची निरर्थकता सांगणारे साहित्यिक जीवनाचे सकारात्मक पैलू गांभीर्याने घेतली एवढा प्रभाव या ” सेवारती” च्या कथा पडतात.
  • “संवेदना” हे दवाखाना व वृद्धाश्रमातील जे जे चांगले आहे त्याचा संगम असलेलं व प्रेम, विश्वास व सुरक्षितता या कौटुंबिक मूल्यांची त्रिसूत्री जपणारे वृद्धसेवा केंद्र आहे
  • सेवारती च खरं सामर्थ्य आहे लेखक डॉ. शिंदे यांच्या स्वानुभवाधारीत कथा
  • सहजीवन कसं असावं, संसारातल व व्यावसायिक दोन्ही प्रकारचं, याचं नमुनेदार उदाहरण म्हणजे हे डॉक्टर दाम्पत्य एकंदरीत या कथांमध्ये, आजच्या गडद निराशेच्या व जगण्याची निरर्थकता प्रकर्षाने जाणवणाऱ्या कालखंडात  आशेचे दीप माणसाच्या मनात पेटवत त्याची निराशा दूर करण्याचं सामर्थ्य आहे असं त्यांनी आपल्या ब्लर्बमध्ये लिहिलं आहे.

आपण सर्वांनी निदान एकदा तरी या कथा वाचल्या पाहिजेत.

परिचय – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments