श्री कचरू सूर्यभान चांभारे
पुस्तकावर बोलू काही
☆ “रमाई…” — लेखक : बंधु माधव (माधव दादाजी मोडक) ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆
पुस्तक : रमाई
लेखक : बंधु माधव (माधव दादाजी मोडक)
प्रकाशन : विनिमय पब्लिकेशन मुंबई
पाने : २९५ .
२७ मे, रमाईमातेचा स्मृतिदिन.रमाईंच्या स्मृतिदिनी त्यांच्या कर्तृत्वाचा जागर मांडताना त्यांच्याविषयीच्या एखाद्या ग्रंथाचा परिचय मांडावा ,असा मानस होता.माझ्या जवळ उपलब्ध असलेल्या रमाई नावाच्याच चार पुस्तकांपैकी बंधु माधव यांचे रमाई पुस्तक परिचयासाठी निवडले.पुस्तकाचे लेखक आज हयात नाहीत पण हे भूलोक सोडण्यापूर्वी त्यांनी रमाईबाबत विपुल लेखन केलेले आहे ,शिवाय याच कादंबरीचे आकाशवाणीवरून नभोना#e-abhivyaktiट्य सादर केलेले आहे.सदर पुस्तकाची भाषा रसाळ आहे.डॉ.बाबासाहेबांसाठी चंदनासारख्या झिजलेल्या रमाईची कथा वाचताना डोळ्याच्या कडा ओलावतात.रमाई हे पुस्तक सुरस ,सुगंधी ,सुंदर आहे की नाही ते वाचकाने ठरवायचे आहे पण लेखक व माझ्या मते रमाई म्हणजे सोशिकता,सात्विकतेचा महामेरू आहे.फूल फुलावं म्हणून झाड रात्रंदिवस धडपडत असतं.लोकांना ते फुललेलं फूल तेवढं दिसतं .वर्षानुवर्षे झाडानं त्यासाठी केलेली धडपड मात्र लोकांना दिसत नाही.विश्ववंद्य डॉ.बाबासाहेब हे कोट्यावधी दलितांच्या हृदयातलं फूल असतील ,तर ते फूल फुलण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेलं झाड म्हणजे रमाई होय.
रमाई कादंबरीची सुरूवात रमाईच्या जन्म प्रसंगापासूनच सुरू होते.तिच्या रडण्याचा ट्याँ ट्याँ हा कादंबरीचा पहिला शब्द व रमाईने सोडलेला शेवटचा श्वास म्हणजे कादंबरीचा शेवटचा शब्द.तिच्या रडण्याचा पहिल्या पानावरचा पहिला शब्द ते 295 पानांवर जगणं थांबल्याचा तिचा शेवटचा शब्द …. असा रमाई कादंबरीचा प्रवास.प्रत्येक पानावर रमाई भेटते ,अगदी पुस्तकाच्या शेवटच्या पानापर्यंत ;पुस्तक संपल्यावर ती पुस्तकातून बाहेर येते व वाचकाशी बोलत राहते.रमाई वाचून संपत नाही ,तर ती वाचून सुरू होते.
दापोली जवळचं वणंद,एक छोटं गाव हे रमाईचं जन्मगाव.गावकुसाबाहेरील पाचपंचवीस महारांच्या झोपडीपैकी एक झोपडी भिकू – रुक्मिणी या सालस कष्टाळू जोडप्याची.अंग मेहनतीचं काम करायचं अन् पोटाला पोटभर खायचं हा त्यांचा नित्यक्रम.शेजारी असलेला समुद्र यांना कधी उपाशी मरू देणार नव्हता.भजनी मंडळात दंग असलेला भिकू धोत्रे मासेमारी व्यवसायाकडे माशाचे टोपले उचलण्याचे काम करत असे.पोटाला काहीतरी देणारा ,संसाराला हातभार लावणारा रुक्मिणीचा बिन भांडवली उद्योग होता. तो उद्योग म्हणजे रस्त्यावरचं शेण गोळा करून शेणी (गवरी) लावणं व त्या शेण्या विकणं.सारं काही खूप मजेत नसलं तरी चंद्रमौळी झोपडीत पसाभर सुख नांदावं ,असा त्यांचा संसार होता.रमाईच्या जन्माआगोदर रूक्मिनीची कुस प्रसव झालेली होती.आक्काच्या रूपानं एक कन्या चंद्रमौळी झोपडीच्या अंगणात खेळत होतीच.आता रूक्मिन दुस-यांदा बाळंत होणार होती.परंपरेचा पगडा म्हणून मुलगाच व्हावा ,हा मानस कळा देताना रूक्मिनीचा व अंगणात बसलेल्या भिकूचाही ,पण पदरात पडली रमाई.मुलगी झाली म्हणून भिकू-रूक्मिनीची थोडी नाराजीच व्हायला हवी होती पण पदरात पडलेली मुलगी नक्षत्रावाणी गोड होती.गावातल्या अनुभवी नाणु सुईनीचं म्हणणं होतं की असलं राजबिंड गोड रूप म्या कंदी कंदी पायिलं नाही.महार गल्लीत आनंदीआनंद झाला.गावभटानं पचांग पाहून मुलीचं भविष्य सांगितलं पोरगी मायबापाचं नाव काढणार.राजाची राणी होणार. रमा वाढत होती ,अन् भिकू-रूक्मिनीला गावभटाची सुखावह भविष्यवाणी आठवत होती.चंद्राची कोरीप्रमाणे ही चंद्रकोर वाढत होती.रमानंतर भिकू-रूक्मिनीला गौरी व शंकर ही दोन अपत्य झाली.कायमचं शारीरिक कष्ट व एकापाठोपाठची एक अशी चार बाळंतपणं …………. रखमा खंगत चालली होती.तिच्या अशक्त देहाला आता मरण दिसू लागलं होतं.नव-याची व लेकरांची काळजी तिच्या डोळ्यात दिसत होती पण प्राणानं तिचा देह सोडण्याचा निर्णय घेतला होता.मरताना तिला एकाच गोष्टीचं समाधान होतं ते म्हणजे लेक रमा … पाच सात वर्षाचंच पोर खूप समजंस होतं … ते पोर तान्हया लेकरांची व बाप भिकूचीही आई व्हायला समर्थ होतं.बस्स एवढाच विश्वास शेवटच्या नजरेत ठेऊन ,एके रात्री तिन्ही लेकरांची जेवणं झाली की रख्माईनं प्राण सोडला.सात वर्षाची पोर रमा आईला पोरकी झाली.नियतीनं पायाखालची धरती अलगद काढून घेतली होती.काही दिवस जातात, न जातात तोच खंगलेला भिकूही धरणीमाईवर आडवा होतो ,तो कायमचाच.रमाईची धरणीमाय आधीच गेली होती अन् आता आभाळही हललं होतं.आभाळाखाली उघडी पडलेली ही तीन्ही लेकरं मामानं मुंबईला आणली.रमाईचे सख्खे मामा-मामी व चुलत मामा-मामीसहित चाळीतले सगळेच शेजारी पाजारी भिकू-रुक्मिणीच्या अनाथ अंशाला काही कमी पडू देत नव्हते.
सुभेदार रामजी आंबेडकर म्हणजे महारांसाठी भूषण नाव. भजन ,कीर्तन ,देवपुजेतलं एक सात्विक संस्कारी नाव .विद्येची आराधना ,कबीराची प्रार्थना करणारा कडक शिस्तीचा भोक्ता पण कमालीचा कुटुंब वत्सल माणुस म्हणजे सुभेदार.सुभेदाराचा भिवा/ भीमा मॕट्रिकीत शिकत होता.तो काळ बालविवाहाचा असल्यामुळे शिक्षण चालू असलं तरी लग्न टाळण्याचा नव्हता.भीमासाठी रमा सुभेदारांच्या मनात निश्चित झाली.महारातला उच्च शिक्षित – बुद्धीमानतेचं शिखर भीमा व अडाणी निरक्षर रमा यांचा विवाह फक्त शिक्षणात अजोड होता पण संस्कार ,कष्ट ,नम्रता याबाबत रमाच्या तोडीचं कोणी नव्हतं.हे सुभेदार जाणून होते.भीमाचा विश्ववंद्य बाबासाहेब झाला ,याला कारण माता रमाई आहे.
मातापित्याचे छत्र हरवलेल्या दुर्दैवी रमाईच्या नशिबी नातलगांचे मृत्यू पाहणं जणू विधिलिखितच होतं. सासरे रामजीबाबांच्या रूपाने तिला पून्हा पितृछत्र मिळालं होत. पण हे सुख फार काळ टिकलं नाही. वृद्धापकाळानं सुभेदारांची सुभेदारी खारिज केली. एका जावेचा मृत्यू ,सासुबाईंचा मृत्यू ,आनंदरावांचा मृत्यू हे दुःख रमाईसाठी आभाळ ओझ्याचं होतं पण नियतीला ते कमी वाटलं असावं, म्हणून लेक गंगाधर ,रमेश व मुलगी इंदू या पोटच्या लेकरांचा मृत्यू रमाईच्या मांडीवरच नियतीने घडवून आणला. लाडक्या राजरत्नचा घासही नियतीने एके दिवशी गिळलाच. पदराच्या कपडात गुंडाळून ,लेकराच्या कलेवरावर माती ढकलताना आईच्या हृदयाच्या किती चिंधड्या चिंधड्या होत असतील ? नाही का ?
बाबासाहेबांनी स्वतःला अस्पृश्य उद्धाराच्या कार्यात झोकून दिलेलं होतं. सुरूवातीच्या काळात बाबासाहेबांची आर्थिक अवस्था दैन्याची होती. त्यातच त्यांचे उच्च शिक्षण चालू होते. खूप खूप मोठ्या माणसाची बायको आहे ;हे समाधान रमाईसाठी आभाळभर ओझ्याचं कष्ट पेलण्याची ताकद देणारं होतं. बाबासाहेबांच्या संसारासाठी भावी बॕरिस्टरच्या बायकोने खूप कष्ट सोसले. दादर – वरळीपर्यंत पायी हिंडून गोव-या गोळा केल्या. त्या विकून अर्धपोटी संसार चालविला पण परदेशात शिकत असलेल्या नव-याचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून त्या पत्रात सतत इकडची खुशालीच कळवत राहिल्या. वराळे मामांच्या वसतिगृहात धारवाड मुक्कामी असताना ,अनुदानाच्या विलंबामुळे मुलांची उपासमार होत असल्याचे लक्षात येताच ,क्षणाचाही विलंब न लावता ,स्वतःजवळचं तुटपुंज सोनं गहाण ठेऊन ,आलेल्या पैशातून त्या मुलांना जेऊ घालतात. आईपण हे काही फक्त लेकरास जन्म देऊन साधता येतं असं नाही तर ते घास भरवूनही साधता येतं. म्हणूनच बाबासाहेब हे दलितांसाठी पिढी उद्धारक पितृतुल्य बाबा होते तर रमाई या आईसाहेब होत्या. बाबांचा व रमाईंचा पत्रव्यवहार वाचताना ,वाचकाचा जीव तीळतीळ तुटतो. पेपरातला बाबांचा फोटो पाहून रमाईचं काळीज मोठं व्हायचं पण त्याच पेपरात बाबाच्या जीवाला धोका असल्याची बातमी वाचून रमाईचं काळीज तुटायचं. गोलमेज परिषदेला अस्पृश्यांचे पुढारी म्हणून डॉ.बाबासाहेब लंडनला जायला निघतात ,तेव्हा निरोपासाठी जमलेला जनसागर पाहून रमा मनाशी म्हणते ….. गावभटानं सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरलीय. एवढ्या मोठ्या प्रजेच्या राजाची मी राणी हाय बरं.होय… मी राजाची राणी हाय.
पुरूषांना गगनभरारी कीर्ती मिळविण्याचं वेड असतं हे खरे आहे, पण गगनभरारीच्या पंखातलं बळ त्याची स्त्री असते.हे इतिहासानं वारंवार सिद्ध केलेलं आहे. बाबांसाठी रमा म्हणजे पंखातलं बळ होतं ,घरटं जतन करणारं प्रेमकाव्य होतं. रमाईच्या खडतर ,सोशिक आयुष्याचा प्रवास वाचनीय आहे. रमाईच्या लहानपणी आई रुक्मिणीनं रमाईला बिनामरणाचा नवरा नावाची गोष्ट सांगितलेली असते. या गोष्टीतल्या पार्वतीला मरण नसलेला नवरा असतो. त्यासाठी ती खडतर तपश्चर्या करते व महादेवाला मिळविते. बाळबोध रमा ,तेव्हा आईला म्हणते “आई,मलाही मिळेल का गं बिनमरणाचा नवरा ?” तेव्हा रख्मा रमाईला पोटाशी कवटाळते व म्हणते नव-यासाठी कष्ट उपसशील तर माझ्या राणीला मिळेल ना बिनमरणाचा नवरा. रमाईच्या आईची वाणी खरी ठरली. डॉ.बाबासाहेब या नावाला कधीही मरण येणार नाही. भयावह कष्ट सोसून ,शील – करूणेचा साज अलंकारून रमाई मातेने बाबांचा संसार राखला ,फुलविला. आयुष्यभर झालेल्या अविश्रांत दगदगीने वयाच्या अवघ्या सदतिसाव्या वर्षी रमाईला नियतीने स्वतःच्या कुशीत चिरनिद्रा दिली. पण बिनमरणाच्या नव-याची बायको होऊन ,शुद्र म्हणून हिणवलेल्या जातीत जन्माला येऊनही राजा बाबासाहेबांची ती राणी झाली होती. करोडो दलितांची आई म्हणून रमाईच जिंकलेली होती. लोकदिलातला राजा राजर्षी शाहू महाराज ,बडोदा नरेश सयाजीराव महाराज ,विदेशातल्या विद्वान बुद्धिवंतांनी गौरविलेल्या बुद्धीच्या शिखराची ,रमाई मजबुत पायाभरणी होती. शेवटच्या क्षणी डोळे झाकताना ती कृतकृत्य होती कारण आता तिचे भीमराव — बाबासाहेब झालेले होते.
स्त्री जीवनाची अनोखी ही कहाणी — रमाई
परिचयकर्ता – श्री कचरू सूर्यभान चांभारे
संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड
मो – 9421384434 ईमेल – chambhareks79@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈