सौ. अलका ओमप्रकाश माळी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “मंतरलेले दिवस” – लेखक – ग. दि. माडगूळकर ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆ 

मंतरलेले दिवस हे खरं तर गदिमा च संक्षिप्त आत्मचरित्र म्हणू शकतो.. अर्थात संक्षिप्त च.. कारण गदिमा हे येवढ्या छोट्या पुस्तकात सामावू शकत नाहीत.. गदिमा.. गदिमा.. म्हटल की आठवतात गीत रामायणाचे मनाला भिडणारे शब्द..पण गीत रामायण ही एक कलाकृती झाली. अशा शेकडो कलाकृतींमध्ये गदिमा स्वतःच नाव अजरामर करून गेलेले आहेत हे जाणवत ते हे मंतरलेले दिवस वाचताना.. गदिमा हे मराठी साहित्य सृष्टीला फक्त साहित्यच नाही तर चित्रपटसृष्टीलाही पडलेलं एक अभिजात स्वप्न.. ह्या स्वप्नाने मराठी माणसाला एक नवी ओळख दिली.. नवा संस्कार दिला.. येवढंच नाही तर मराठीचा झेंडा पार अटकेपार पोहचवला.. खरचं गदिमा.. सुधीर फडके ह्यासारखी माणसं म्हणजे दैवी अंशच म्हणावी लागतील ज्यांच्या वर सरस्वती मातेचा आशीर्वाद होता,.. लक्ष्मी काही काळ न्हवती पण त्याची कधी ह्या लोकांना पर्वा न्हवती, ते वेगळ्याच धुंदीत जगले आणि अजरामर झाले..असीम दारिद्र्य व अपार कष्ट अशा खडतर वाटेवर चालून सुद्धा गदिमांनी अनेक अजरामर असे मराठी चित्रपट दिले..त्यांच्या रूपाने मराठी साहित्य, तसेच चित्रपट सुष्टीला एक वैभवशाली पर्व दिले हे मात्र निश्चित..मंतरलेले दिवस ह्या पुस्तकात एकूण अकरा प्रकरणं आहेत आणि ह्यातल्या प्रत्येक प्रकरणातून गदिमांनी त्यांच्या जीवनाचा प्रवास उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलाय..मंतरलेले दिवस हे पहिलंच प्रकरण.. आपल्याला अगदी खिळवून ठेवत..ह्यात वयाच्या सोळा सतरा वर्षातील गदिमा आपल्याला भेटतात..दक्षिण साताऱ्यातील कुंडल सारख्या छोट्याशा गावातील अनेक घटना वाचून आपण एकदम खिळून जातो..स्वातंत्र्यापूर्वी चा तो काळ आणि स्वातंत्र चळवळ अगदी शिगेला पोहचलेली.. अशातच आपण ही देशासाठी काही तरी केलं पाहिजे ह्या विचाराने गदिमा झपाटले आणि घर सोडलं आणि एका गांधी सेवसंघाच्या आश्रमात दाखल झाले पण तिथून लवकरच पळू काढला आणि भटकू लागले.. त्यात मॅट्रिक नापास झाले आणि अजूनच वाईट दिवस आले काही दिवस उदबत्या विकल्या.. अशा अपार कष्टातून जात असताना सुद्धा देशासाठी काहीतरी करायची उर्मी शांत बसू देत न्हवती..अशातच त्यांनी समवयस्क आणि समविचारी मंडळी सोबत घेऊन गावाबाहेरच्या एका पडक्या अंधाऱ्या मंदिरात त्यांनी एक अड्डा सुरू केला.. जवाहिराश्रम.. इथेच बसून ते अनेक देशभक्तीपर कविता, भाषण देऊ लागले लवकरच ते गुरुजी नावाने ओळखले जाऊ लागले.. देशार्थ जगेन | देशार्थ मरेन |  देशार्थ करीन.. सर्व दान अशा रचना बनू लागल्या.. आणि आपल्यात लेखनशक्ती आहे ह्याचा साक्षात्कार ही इथेच झाला..व्यायाम शाळा, प्रौढ शिक्षण असे अनेक उद्योग ह्या ग्रुप तर्फे केले जाऊ लागले.. घरी फक्त खायला जाण्या इतपत संबंध उरला..इथेच त्यांनी अनेक पोवाडे लिहिले.. शंकर निकम त्या पोवड्याना चाली देऊ लागला.. पण घरचे दारिद्य्र आणि गरिबी ह्यामुळे नोकरी शोधण्यासाठी हे सगळं सोडून.. कुंडल सोडून जाणं भाग होत.. पण कुंडल मधले हे दिवस वाचताना अंगावर शहारा येतो..त्यानंतर कोल्हापूर मधील हंस पिक्चर मधील चार वर्षांची नोकरी..HMV मधील व्यवहार हे सगळ ह्या लेखात वाचायला मिळत..ह्याचं काळात गदिमांच लग्न होत.. ते म्हणतात मुसलमान व्हायला आणि रोजाचा महिना यायला एकच गाठ पडली..लग्न झालं आणि कोल्हापूर चित्रपट धंदा बसला.. दोन वेळच्या जेवणाची ही भ्रांत..बायकोच्या माहेरी हून येणाऱ्या डब्यावर दिवस काढले.. अशातच गदिमाचे अनेक पोवाडे प्रसिद्ध झाले..इथेच सुधीर फडके साठे आणि मंडळी भेटली.. अनेक क्रांतिकारी प्रत्यक्ष संपर्कात आले.. काही तर ह्यांच्या छोट्याशा रूमवर राहिले.. हे अनेक असे रोमांचित करणारे किस्से पहिल्या भागात आहेत.. दुसऱ्या भागात गदिमा आणि त्यांना मिळालेला केंद्र सरकार साहित्य अकादमी पुरस्कार आणि तो घेण्यासाठी झालेली दिल्लीची वारी, बायकोचं आजारपण, बायको सोबत दिल्ली दर्शन तिथे भेटलेले मुस्लिम कुटुंब, त्या घरातील मुस्लिम स्त्रीशी झालेला परिचय.. तिचं आशीर्वाद देणं आणि अचानक तिची आत्महत्या.. अशा अनेक घटनांचा लेखाजोखा आपल्याला एक अज्ञात अंगुली लिहिते मध्ये वाचायला मिळते..त्यानंतर.. मोहरलेला कडुनिंब मध्ये गदिमांच्या कवी मनाचं दर्शन होत.. त्या काळी त्यांनी लिहिलेल्या अनेक कविता आणि त्यांच्या आठवणी म्हणजे मोहोरलेला कडुनिंब..त्यानंतर माझा यवन मित्र मध्ये एका मुस्लिम मित्राची ओळख आणि त्याने केलेला विश्वासघात वाचून आपण व्यथित होतो.. बामणाचा पत्रा.. मध्ये चित्रपट कथा लिहिण्यासाठी जेंव्हा निर्माते हात धुवून मागे लागतं तेंव्हा गदिमा पूण्या मुंबैतून पळ काढून माडगूळ ला येत.. येताना दोन चार मित्र सोबत असतच..माडगूळ मध्ये घरात त्यांचा पाय राहतच नसे.. शेतात केलेली खरतर गुरांसाठी केलेली एक झोपडी तिथे जाऊन राहिल्याशिवाय गदिमां ना काही सुचत नसे.. आणि ह्या झोपडीवर असलेल्या पत्र्या मुळेच अख्खा गाव ह्याला बामनाचा पत्रा म्हणून ओळखत असे.. गदिमा च वास्तव्य जो पर्यंत तिथे असे तोपर्यंत त्या जागेचे अगदी रूपच पालटून जाई.. ह्याचे अगदी मनोहारी वर्णन आपल्याला ह्या लेखात पाहायला मिळते..त्यानंतर.. पंतांची किन्हई..ह्यात किन्हई गाव.. तिथे लेखकाने घालवलेले दिवस.. त्या गावाचे सौंदर्य, पंचवटी तिथले अनुभव वाचलेच पाहिजेत असे आहेत…त्यानंतर वेडा पारिजात.. हा लेख मला खूप भावला का ते मात्र सांगत नाही कारण तुम्ही वाचणार आहातच.. पुढचा लेख.. औंधचा राजा.. ह्यात औंध संस्थान आणि तिथले कारभार ह्याची थोडक्यात पण सुंदर अशी माहिती आहे.. लुळा रस्ता हा पुढचा लेख.. ह्यात भेटते ती एक सामान्य भाजी विकणारी सखू.. आता तिने अख्खं एक प्रकरण व्यापल आहे म्हणजे काहीतरी खास नक्कीच असणारं आणि जे आहे ते स्तंभित करणारं आहे हे मात्र नक्की..तेंव्हा जरूर वाचा… पुढचा लेख.. नेम्या.. नेम्या हे लाडाच नावं.. पण ह्या मित्राने गदिमांवर केलेले निस्सीम प्रेम आणि मैत्री ह्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे नेम्या.. मैत्री, विश्वास ह्याच्या पलीकडची परिभाषा म्हणजे नेम्म्या.. आणि शेवट दिवा लावा कोणीतरी.. दिवा लावा कोणीतरी ही अंथरुणावर पडलेल्या गदिमांच्या वडिलांचे क्षीण आवाजात शब्द.. पण ते का म्हटलेत हे मात्र तुम्हाला पुस्तकातच वाचावे लागतील.. ह्या नंतरची काही पानं गदिमांचे चित्रपट, त्यांच्या कथा, कादंबरी आणि अजून लेखन साहित्यांची एक संक्षिप्त सूची आहे.. अगदी कोणत्या वर्षात कोणती कथा लिहिली हे ही इथे स्पष्टपणे कळते..

हे पुस्तकं वाचत असताना मला सतत जाणवलेल्या काही गोष्टी सांगते.. गरिबी, दारिद्र्य, अनेक संकट, कठीण परिस्थिती, उपाशी रहायला लागलं म्हणून वाटणारी खंत.. हे गदिमांच्या तोंडून आपल्याला कधीही ऐकायला मिळत नाही किंवा त्यांनी कुठे ही ह्याचं प्रदर्शन मांडलेले नाही.. कुठेही परिस्थिती ची तक्रार नाही.. जे दिवस आले ते आनंदाने जगले बास ही एकच गोष्ट सतत जाणवत राहते.. इतकी महान व्यक्ती जेंव्हा हातात झाडू घेऊन महारवाडा साफ केल्याचं अगदी अभिमानाने लिहून ठेवते तेंव्हा  जातीव्यवस्था वगैरे शब्द किरकोळ वाटू लागतात.. एक मुस्लिम मित्र चार पाच वर्षां च कठोर परिश्रम करून बनवलेले काम घेऊन पसार होतो तेंव्हा ही गदिमांची शांती ढळत नाही किंवा तोंडातून एकही उणा शब्द निघत नाही उलट त्यांना तो कधीतरी परत येईल ह्याचा विश्वास वाटतो.. तेंव्हा आपण स्तिमित होऊन जातो.. असे अनेक प्रसंग हे पुस्तकं वाचताना आपल्याला वारंवार येतात.. अर्थात शेवटी एवढच म्हणेन हा अभिप्राय म्हणजे एक चमचाभर पाणी आहे त्या महान महासागराचे ज्याने अख्या मराठी सृष्टीला अभिजात मराठीचे सौंदर्य दाखवले.. स्वप्न बघायला  शिकवले, देशभक्ती, देवभक्ती, प्रेम, तिरस्कार ह्या सगळ्या पलीकडे जाऊन एक माणूस बनून जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला अशा ह्या गदिमांना माझा त्रिवार प्रणाम..

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments