डाॅ. मीना श्रीवास्तव
पुस्तकांवर बोलू काही
☆ टेक ऑफ (कथा संग्रह) – लेखक : श्री सुरेश पंडित ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
पुस्तक : टेक ऑफ (कथा संग्रह)
लेखक : श्री सुरेश पंडित
पाने : १२६
प्रकाशक : कोमल प्रकाशन, नालासोपारा, पालघर
मूल्य : २१० रुपये.
श्री सुरेश पंडित
नमस्कार वाचकांनो,
मान्यवर साहित्यिक श्री सुरेश पंडित यांनी लिहिलेला ‘टेक ऑफ’ हा कथासंग्रह नुकताच वाचला. पहिल्याच (‘टेक ऑफ’ याच नावाच्या) कथेत इतकी दंग झाले की एकाच बैठकीत संपूर्ण सप्त कथारंगात रंगून गेले. या पुस्तकात विविध कथाबीजांनी सजलेल्या सात कथा आहेत. कुठे आधुनिक पार्श्वभूमी तर कुठे गावाकडील वातावरण. मात्र एक गोष्ट सर्व कथांमध्ये आढळते, ती म्हणजे मानवी मनाच्या भावभावनांचे झुलते हिंदोळे. लेखकाची साधी सोपी सरळ भाषा लगेच आपल्या मनाचा वेध घेते. घरगुती वातावरणातील अस्सल रिअल लाईफ संवाद असो की टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने तसे टेक्निकल संवाद असो, लेखकाची सुलभ अर्थवाही शब्दसंपत्ती मोहून टाकते. म्हणूनच या सर्व कथांमधील लेखकाने रेखाटलेली विविध पात्रे आपल्या घराच्या अवती भवती वावरणारी असावीत असा भास होतो. मग ती गरीब, अशिक्षित, ग्रामीण अथवा जुन्या संस्कारात वाढलेली असोत की उच्चभ्रू परिवारातील सुशिक्षित, आधुनिक अथवा शहरी भागातील असोत, त्यांचे अचूक व्यक्तिचित्रण ठसठशीतपणे वाचकांच्या मनावर आपला प्रभाव उमटवते. या संपूर्ण कथासंग्रहात मला भावलेली ही सर्वोत्तम गोष्ट आहे. शब्दबंबाळ आणि संख्याबळाने विपुल अशा पात्रांचे भावनिक जंजाळ देखील या कथांमध्ये नाही. मोजक्याच पात्रांची निवड, त्यांची सामान्यतः प्रचलित नांवे, कुठे तर आई-मुलगा तर कुठे प्रियकर- प्रेमिका तर कुठे मुलगी आणि आईवडील अथवा सासूसासरे तर कुठे पती-पत्नी या आपल्या परिचित नात्यांचीच गुंफण घालून त्यांत सुगम संवाद आणि उत्कंठावर्धक ओघवती कथा असे सर्वच कथांचे सुंदर रूप या पुस्तकात मला आढळले.
त्यांच्या या सात कथांचा थोडक्यात आढावा घेते. पहिलीच कथा ‘टेक ऑफ’ या अनवट शीर्षकाची! पुस्तकाचे मनोहर रंगांनी सजलेले चित्तवेधक मुखपृष्ठ याच कथेला पोषक असे आहे. एखाद्या सुंदर चित्रपटाची कथा जशी उमलत जाते, तद्वतच नायक नायिकेच्या प्रेमाचे विमान अनेकानेक कौटुंबिक आणि सामाजिक अडथळ्यांची मालिका पार करून ‘टेक ऑफ’ करीत त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या अनंत आकाशात झेप घेते. दुसरी कथा आहे ‘रंगबावरी’. या संपूर्ण कथेत लेखकाने शुभ्र धवल आणि इतर कॉन्ट्रास्ट रंगांशी मानवी भ्रामक प्रतिष्ठा आणि अवास्तव कल्पनेचा मेळ साधत जणू सुंदर कॅनवासच रंगवला आहे. या रंगांच्या खेळात देखील एक अनुकरणीय सामाजिक संदेश आहे. त्यानेच कथेचा उत्कंठावर्धक शेवट होतो. ‘आई’ ह्या तिसऱ्या कथेत आई अन मुलाचे रेशमी नाते विणण्यात आले आहे. आईच्या अथक प्रयत्नांनंतरही तिच्यातील आणि मुलातील भावनिक दरी रुंदावतच जाते. या कथेतील पात्रे समाजातच कुठेतरी आपल्या जवळपास वावरत आहेत इतकी जिवंतपणे लेखकाने साकारली आहेत. या सर्वांगसुंदर कथेत मातेच्या वात्सल्यपूर्ण भावनांचा कल्लोळ वाचकांच्या अनुभवास येईल हे नक्की. ‘दैव जाणिले कुणी’ या चौथ्या कथेविषयी इतकेच सांगेन की, वळणावळणावर धक्का तंत्र वापरून वाचकांना कसे खिळवून ठेवावे हे लेखकाला अतिशय चांगले जमते. शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरत एखाद्या थ्रिलर चित्रपटाला शोभेल असा या कथेचा अंत आहे. आपण ती मुळापासूनच वाचा ना!
‘सापळा’ ही बुवाबाजी विरुद्ध संघर्षाची कथा उद्बोधक समाजप्रबोधन करणारी अशीच आहे. ही कथा अतिशय प्रासंगिक आहे. ‘पेराल तसे उगवेल’ ही देखील संदेशवाहक कथा आहे. दुसऱ्यासाठी खणलेला खड्डा आपल्यालाच त्यात कसा ओढून घेतो हे सांगणारी ही कथा मनाला सुन्न करते. समाजातील खलप्रवृत्तीचे प्रतिबिंब या कथेत आहे. खेदाची बाब अशी की, हे कथाबीज ते आपल्याला अजिबात अपरिचित नाही. लेखकाची कमाल यातच आहे की, या प्रवृत्तीचे रेखाटन करतांना त्यांनी अतिशयोक्ती केलेली नाही. आजच्या समाजाच्या दुष्ट प्रवृत्तीच्या अंगाचे हे दाहक चित्रण आहे. प्रथितयश लेखकाच्या ‘अभिमानगीताची’ सुरावट ऐकू येते या पुस्तकातील शेवटच्या ‘पराभूत’ या कथेत! आपण जणू ‘अगणित कथा प्रसवणारी अन वांझपणाचा कुठलाच शाप नसलेली सदा हरित बहुप्रसवा वसुंधरा’ आहोत, या वांझोट्या कल्पनेची भरारी कधी तरी थांबते! लेखकाच्या ‘पेनातील शाई’ कधी तरी वाळते, हे निखळ सत्य या कथेत मांडलेले आहे. कधी तरी प्रत्येक साहित्यिकाला हा अनुभव येतो हे नक्की!
आता लेखकाविषयी थोडेसे. मला वडील बंधू सदृश असलेले आदरणीय सुरेश पंडित वयाची पंच्याहत्तरी पार केलेले पालघरचे भूमिपुत्र! त्यांच्या ग्रंथ संपदेतील दोन कथासंग्रह (अद्वैत आणि निर्णय) तसेच अगतिक नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहे. नुकतेच कोकण मराठी साहित्यपरिषदेच्या पालघर शाखेद्वारे आयोजित पालघर जिल्ह्यातील केळवे येथे साहित्यसंमेलन संपन्न झाले. त्यात सुरेशजींचा हा ‘टेक ऑफ’ नावाचा कथासंग्रह प्रकाशित झाला. या पुस्तकाला प्रथितयश साहित्यिक, चाळीसगावच्या आ. बं. हायस्कूलचे माजी प्राचार्य आणि रेडिओ विश्वासवर प्रक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे सादरकर्ते श्री विश्वास देशपांडे यांची विस्तृत, सखोल आणि सुरेख प्रस्तावना लाभलेली आहे. या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील मजकूर अस्मादिकांनी आपल्या अल्प बुद्धीनुसार लिहिला आहे. ही अमूल्य संधी दिल्याबद्दल मी सुरेशजींचे मनःपूर्वक आभार मानते.
कथालेखन आणि कविता लेखन या दोन्ही प्रांतात त्यांची मुशाफिरी सहजतेने दिसून येते. सुरेशजी कविमनाचे असल्यामुळे पात्रांचे भावविभ्रम ते कुशलतेने आणि नजाकतीने सादर करतात असे मला वाटते. या सोबतच त्यांचे अनेक नियतकालिकांसाठी (यात दिवाळी अंक आलेच) कथा आणि कविता लेखन सुरूच असते. सध्या ते त्यांच्या आगामी कथा संग्रहाचे लेखन करण्यात व्यस्त असल्याचे कळते.
सुरेशजींच्या दीर्घ साहित्यिक व्यासंगाचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात उमटलेले दिसते. त्यांचा हा नवा कोरा कथासंग्रह त्याच्या ‘टेक ऑफ’ या शीर्षकाला अनुसरून वाचकांच्या मनांत हळुवारपणे आणि साफल्यपूर्वक ‘स्मूद लँडिंग’ करेल यात मला कुठलीच शंका नाही. त्यांचे रसिकांशी आधीच ‘अद्वैत’ असे नाते आहे, या ‘टेक ऑफ’ चे सप्त कथांचे सप्तसूर रसिकांच्या हृदयाचा हमखास ठाव घेतील. या निर्मल मनाच्या निर्मोही शारदापुत्राला पुढील साहित्यसेवेसाठी अनेक शुभेच्छा !
(पुस्तकाच्या प्रतीसाठी कृपया लेखक श्री सुरेश पंडित यांच्याशी ९९६९३७३००१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.)
कथासंग्रहाचे लेखक : श्री. सुरेश पंडित
परिचय : डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈