सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
पुस्तकावर बोलू काही
☆ “सांगाती: स्मरण झुला एका जिप्सीचा” ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
लेखक -सदानंद कदम
प्रकाशक- सुनील अनिल मेहता, मेहता पब्लिशिंग हाऊस,
प्रथमावृत्ती -नोव्हेंबर,२०२१
सदानंद कदम यांचे ‘सांगाती: स्मरण झुला एका जिप्सीचा’ हे पुस्तक वाचायला मिळालं, तेव्हा खरं सांगायचं तर मला लेखकाविषयी काही माहिती नव्हती. पण जेव्हा पुस्तक वाचले, त्यांना भेटलेल्या, त्यांच्या सहवासात आलेल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींबद्दल वाचायला मिळाले तेव्हा खरंच पुस्तक खूप आवडले ! एक दोन नाही तर अठ्ठेचाळीस व्यक्तींविषयी त्यांनी लिहिले आहे. अनेक मोठमोठ्या व्यक्तींबरोबर घालवलेले काही क्षण, काही वेळ आणि त्यांचा संवाद त्यांनी खूपच छान रंगवले आहे. विंदा करंदीकर, कवी कुसुमाग्रज, जगदीश खेबुडकर, शांता शेळके ही तर माझी अत्यंत आवडती व्यक्तिमत्व ! त्यांच्याविषयी वाचताना तर मन भारावून जाते !
बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, रणजित देसाई ,गो नी दांडेकर, यांनी लिहिलेल्या पुस्तकांची पारायणे केलेली.. अशा थोर लेखकांचा सहवास कदम यांना लाभला. जी डी बापू लाड, नागनाथ अण्णा, शंतनुराव किर्लोस्कर, तारा भवाळकर ही तर आपल्या सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व ! इतकेच नाही तर जयमाला शिलेदार, पद्मजा फेणाणी, भक्ती बर्वे ही आपल्या नाट्य गायन क्षेत्रातील प्रसिद्ध मंडळी ! या सर्वांबरोबर काही काळाचा सहवास कदम यांना मिळाला हे तर त्यांचे भाग्यच !
त्यांचा प्रत्येक लेख वाचताना मनापर्यंत पोचतो हीच पुस्तक आवडल्याची पावती ! सुरेश भट, अशोकजी परांजपे, शाहीर योगेश या काव्यक्षेत्रातील ज्येष्ठ मंडळींचा थोडक्यात परिचय आणि लेखकाचा त्यांच्याशी काहीना काही कारणाने आलेला संबंध आणि त्याला अनुसरून त्यांना मिळालेला सहवास, यासंबंधीचे लेख वाचनीय आहेत.
अगदी सिंधुताई सपकाळ, प्रकाश आमटे यासारख्या समाज सुधारकांबरोबरही त्यांनी काही काळ व्यतीत केला होता, तर व. पु. काळे, विश्वास पाटील, शिवाजीराव भोसले तसेच सुहास शिरवळकर यांच्याही संपर्कात कदम हे काही काळ होते. एका सामान्य घरात रहाणाऱ्या व्यक्तीने केवळ आपल्या जगण्याच्या आनंदासाठी पुस्तक वाचन, ग्रंथ वाचन यास वाहून घेतले, त्यासाठी भरपूर पुस्तके खरेदी केली. आणि या सगळ्या सांगात्यांना बरोबर घेऊन आपले आयुष्य आनंददायी घडवले. कदम म्हणतात, ‘ माझ्या स्मरणाच्या, आठवणीच्या त्या झुल्यावर आजही मी झुलत असतो आणि माझ्या सोयऱ्यांचे बोट धरून वाटचाल करत असतो.’
‘ सांगाती ‘ हे पुस्तक मला आवडले आणि इतरांनाही ते वाचावेसे वाटावे यासाठी हा पुस्तक परिचय !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈