श्री नंदकुमार पंडित वडेर
अल्प परिचय
शिक्षण – B.A. (Hons.) Mum. Uni. अर्थशास्त्रातील पदविका
जन्म – 02/06/1958 – निपाणी
दी सांगली बँकेत1979 पासून- कारकून पदाने सुरू झालेली कारकीर्द. 2011 रोजी सीनियर मॅनेजर पदावरून आय.सी.आय.सी.आय बँकेतून (विलींनकरणा नंतर) निवृत्त. सध्याचे वास्तव्य विश्रामबाग सांगली.
निवृत्ती नंतर लेखन सुरु केले. कथा, ललित लेखन,पहिला चहा (स्फुट लेखन), चित्र कथा सारखे लेखन.विविध लेखन स्पर्धेत सहभाग आणि यशस्वी मानाकांने प्राप्त. दिवाळी अंकातून कथांना प्रसिध्दी. ‘कथारंग’ पहिले पुस्तक प्रसिध्द.
प्रतिमेच्या पलिकडले
☆ पिकलेपण… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
(एक नवीन सदर – ‘प्रतिमेच्या पलिकडले’, चित्रकाव्य प्रमाणेच परंतू गद्य लेखन)
… जे जे पेरतो ते तेच उगवते हा सृष्टीचा नियम आहे ,हे तर तुम्हा आम्हा सर्वांना विदीत आहेच…प्रत्येक भागातली अशी सुफलाम भूमी हि सोन्याची खाण असणारी भूमी वाटतं असते…निसर्गाचे वरदान लाभलेली , नदी, नाले, ओढे ,तळी, बावी ,विहिरी जलाने तुडुंब भर भरून वाहू लागल्या की कृषीवलाच्या चेहऱ्यावर आनंद पसरवते. जे पिकतं ते सोनच असतं…उन्हाळातल्या मशागतीपासून रोहिणीची वाट पाहात मृगाची सरीने भूमी भिजली कि पहिला उगवणारा आशेच्या हिरव्या हिरव्या कोवळ्या कोंबाकडे पाहून कृषिवल त्याची निगराणी करत जातो..श्रावणातल्या हिरवाईने वसुंधरा शालूने सलज्ज नवथर नवयौवना दिसते…आश्विनला ती परिपक्व होते.. हिरवे पणा च्या जागी पिवळेपणाची परिपक्वता येते… जीवन परिपूर्ण झाले या कृतार्थतेने समाधान तिथे विलसत असते.पश्चिमेचा वारा वाहू लागतो आणि त्यावेळी उभ्या असलेल्या शेतातील पिकाचे तुरे डोलू लागतात. जणू काही सृष्टीचे गुणगान गात असताना मग्न झालेले दिसतात… आता लवकरच आपलं या भुमीशी असलेलं नातं संपणार आहे.. ही मोहमाया सोडून जायचे दिवस आले आहेत.. आसक्ती पासून मुक्ती मिळवायची हीच वेळ आलेली असते…
… अन् आपली सर्वांची जिवनानुभवता याहून काही वेगळी असते का? पिकलेपण म्हणजे अगणित कडू गोड अनुभवांची संपन्नता नसते काय? हा अनमोल सोनेरी विचारांचा ठेवा पुढील पिढीला द्यायचा हेच सुचवत नसते काय? पिकलेपणात सोनेपण दडलेलं नसते काय?
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470.
ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈