श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ काटा रूते कुणाला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
.. अग थांब चारूलते! तो मनोहारी भ्रमर ते कुमुदाचे कुसुम खुडताना उडून गेला पण माझं लक्ष विचलित करून गेला. त्याकडे पाहता पाहता नकळत माझं पाऊल बाभळीच्या कंटकावर की गं पडले… आणि तो कंटक पायी रूतला.. एक हस्त तुझ्या स्कंधावरी ठेवून पायीचा रूतलेला कंटक चिमटीने काढू पाहतेय.. पण तो कसला निघतोय! अगदी खोलवर रुतून बसलाय.. वेदनेने मी हैराण झाले आहे बघ… चित्त थाऱ्यावर राहिना… आणि मला पुढे पाऊल टाकणे होईना.. गडे वासंतिका, तू तर मला मदत करतेस का?..फुलं पत्री खुडून जाहली आणि आश्रमी परतण्याच्या मार्गिकेवर हा शुल टोचल्याने विलंब होणारसे दिसतेय… तात पूजाविधी करण्यासाठी खोळंबले असतील..
.. गडे चारुलते! अगं तरंगिनीच्या पायी शुल रुतूनी बसला.. तो जोवरी बाहेर निघून जात नाही तोवरी तिच्या जिवास चैन पडणार कशी?.. अगं तो भ्रमर असा रोजचं तिचं लक्ष भुलवत असतो.. आणि आज बरोबर त्यानं डावं साधला बघ… हा साधा सुधा भ्रमर नव्हे बरं. हा आहे मदन भ्रमर . तो तरंगिनीच्या रूपावरी लुब्ध झालाय आणि आपल्या तरंगिनीच्या हृदयात तोच रुतलाय समजलीस… हा पायी रूतलेला शुल पायीचा नाही तर हृदयातील आहे… यास तू अथवा मी कसा बाहेर काढणार? त्याकरिता तो ऋषी कुमार, भ्रमरच यायला हवा तेव्हा कुठे शुल आणि त्याची वेदना शमेल बरं… आता वेळीच तरंगिनीच्या तातानां हि गोष्ट कानी घालायला हवी…आश्रम प्रथेनुसार त्या ऋषी कुमारास गृहस्थाश्रम स्वीकारायला सांगणे आले नाही तर तरंगिनीचे हरण झालेच म्हणून समजा.
गडे तंरगिनी! हा तुला रूतलेला मदन शुल आहे बरं तू कितीही आढेवेढे घेतलेस तरी आम्हा संख्यांच्या लक्षात आलयं बरं.. तो तुझ्या हृदय मंदिरी रुतून बसलेला तो ऋषी कुमार रुपी भ्रमराने तुला मोहविले आहे आणि तुझे चित्त हरण केलयं… हि हृदय वेदना आता थोडे दिवस सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही.. पाणिग्रहण नंतरच हा दाह शांत होईल.. तो पर्यंत ज्याचा त्यालाच हा दाह सहन करावा लागतो..
.. चला तुम्हाला चेष्टा सुचतेय नि मला जीव रडकुंडीला आलाय… अश्या चेष्टेने मी तुमच्याशी अबोला धरेन बरं..
हो हो तर आताच बरं आमच्याशी अबोला धरशील नाहीतर काय.. त्या भ्रमराची देखील चेष्टा आम्ही करु म्हणून तूला भीती वाटली असणारं… आता काय आम्ही सख्खा परक्या आणि तो परका ऋषी कुमार सखा झालायं ना.. मग आमच्याशी बोलणचं बंद होणार…
.. चला पुरे करा कि गं ती थट्टा..आश्रमाकडे निघायचं पाहताय की बसताय इथंच . ..
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470.
ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈