श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ हा माझा मार्ग एकला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
हा माझा मार्ग एकला.. आता तुम्ही कुणीच येऊ नका माझ्या सोबतीला. घेतलीय काठी माझ्या आधाराला. येथून पुढच्या प्रवासात मीच ऐकेन माझ्याच संवादाला. आपुलाच संवाद आपुल्याशी,आत्मसंवाद. करेन सारीच उजळणी गत आयुष्याची, काय मिळविण्यासाठी किती दयावे लागले याच्या जमाखर्चाची. हाती उरले ते काय आणि सोबत नेतोय काय याच्या खातरजमेची. मागे आता माझे उरले आहे इतिहासातले फक्त पिकलेले पान..तुमच्या नव्या पिढीच्या शिलेदारांना दिलाय मी जीवनाचा मंत्र खरा.. ज्यात मिळेल फक्त सात्त्विक समाधान तोच राजमार्ग धरा..तेच मला गवसले म्हणून तर या एकलेपणाच्या पथावर मन:शांतीचे दिप उजळले.. या निर्जन एकांतात देखिल मनास भीतीचा लवलेशही स्पर्शून जात नाही… आणि मनही कशातही गुंतून राहिले नाही.. सगळे काही आलबेल नव्हते जीवनात, संघर्षाविना सहजी नव्हते नशिबात.षडरिंपूच्या मातीचच देह होता माझा, भोवतालच्या माया , ममता, माणूसकिच्या संस्काराने प्रोक्षळला गेला तो.. मग मी ही त्यात वाटत चालत होतो. खारीचा माझा वाटा मी पण माणूसच होतो तर मी कसा राहावा एकटा.. परंपरेची भोयी खांद्यावर घेऊन संसाराची पालखी मिरविली. कष्टाचे उद धूप जाळले संसारा बरोबर समाजाचे मंदिरही उजाळले. नैवैधयाची भाजी भाकरी महाप्रसाद म्हणूनी वाटली..जो जो आला भेटला तोषविले त्याला त्याला..तृप्तात्मयाच्या आर्शिवादाने भरून गेली झोळी.. सुख शांतीचा बुक्का लागला कपाळी.. तोच विठूरायाने दिली वारीची हाळी.. हा मग मी निघलो सर्व संग परित्याग करुनी.हा वेड्यानो अश्रू नका आणू नयनी…हा माझा मार्ग एकला.. आता तुम्ही कुणीच येऊ नका माझ्या सोबतीला. घेतलीय काठी माझ्या आधाराला. येथून पुढचा प्रवासात मीच ऐकेन माझ्याच संवादाला.. .
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470.
ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈