श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ न उमजलेले अश्रू … ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
काळजाला भिडते असे काही तेव्हा शब्दात मांडले जातेच असे नाही…
मग डोळेच येतात धावून नि भावनेचा ओघ घेतात सामावून.. क्षणभर होते त्यांची कालवाकालव अन आसवांची करतात जमवाजमव..
तरारलेले अश्रू पूर्ण डोळे एकेक थेंब ओघळू लागतात..
पाहशील का एकदाच डोळयात माझ्या,दिसतेय का तुला अर्थपूर्ण हळवी भावना असे मुके हुंदके सांगत असतात.. ओथंबलेली डोळ्यातली आसवं पापणीच्या किनाऱ्यावर जलबिंदूची नक्षी काढतात..
अन तर्जनी नकळत फिरते तिथे अलगद अलवारपणे टिपून घेते किनाऱ्यावर साचलेले अश्रूबिंदू…
एखादा उन्मळून वाहिलेला भावनेचा कड गालावरून जेव्हा स्यंदन करत ओघळतो..
भर भावुकतेचा वाहून गेला तरी सल त्याचा उरी टोचतच राहतो…
आणि आणि या आवेगाची आठवण जेव्हा जेव्हा त्या क्षणाला येते तेव्हा तेव्हा ही अशीच आसवांची रिमझिम बरसून जाते…
मन गलबलून येते नि…
काळजाला भिडते असे काही तेव्हा शब्दात मांडले जातेच असे नाही.
.फक्त डोळेच सांगुन जातात सर्व काही…
समजण्या पलिकडचे जे कदापि उमजतच नाही…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈